Wednesday, 19 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 पंतप्रधान पीक विमा योजना ऐच्छिक करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेणात आला. या निर्णयामुळे बँका शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून कर्जाची रक्कम कापून घेऊ शकणार नाहीत. देशात दहा हजार कृषी उत्पादन संघटना स्थापन करून त्यांना सहा हजार कोटी रुपये निधी देण्यासही आजच्या या बैठकीत मान्यता देण्यात आली. या माध्यमातून दीड लाखावर रोजगार निर्मितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 बाविसावा कायदा आयोग स्थापन करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. स्वच्छ भारत योजनेच्या दुसरा टप्प्याला सुरुवात करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

 धवलक्रांती अर्थात दुग्ध उद्योगाला चालना देण्यासाठी चार हजार पाचशे अट्ठावन्न कोटी रुपये खर्चाच्या योजनेला आज मंजुरी देण्यात आली. याशिवाय, व्याज अनुदान योजनेचा लाभ दोन टक्क्यांवरून अडीच टक्के, इतका करण्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
****

 शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीनं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळा साजरा झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह दहा देशांच्या राजदूतांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना पहिला 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार' यावेळी प्रदान करण्यात आला.
****

 शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी राज्य शासन प्रतिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवजयंतीनिमित्त ते आज किल्ले शिवनेरी इथे बोलत होते. किल्ले शिवनेरीच्या नूतनीकरण आणि विकासासाठी तेवीस कोटी रुपयांच्या निधीची त्यांनी यावेळी घोषणा केली. २०१८ मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आंदोलकांवर दाखल झालेले खटले मागे घेण्यात येतील, असं ठाकरे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते. शिवनेरी किल्ल्याचं ऐतिहासिक स्वरूप जतन करत नूतनीकरण करणार असल्याचं सांगितलं.
****

 मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

 राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करणारे शिवराय आम्ही आजच्या संदर्भात समजून घेतले पाहिजेत, असं मत शिवविचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘लढायांपलिकडील शिवाजी महाराज’ या विषयावर बोलत होते. महाराजांनी २६६ गडकिल्ल्यांपैकी एकही गडाचा किल्लेदार स्वत:च्या नातेवाईकाला बनवलं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

 जालना शहरातून आज शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, तर हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथं शिवपालखी काढण्यात आली.

 लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथे युवक, युवती महिलांसह हजारो नागरिकांनी आज मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा शिवसंकल्प केला. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.

परभणी, नांदेड, बीड इथेही अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत.
****

 राज्यात महाविकास आघाडीचं सरकार राबवत असलेल्या लोकाभिमुख योजनांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर इथं गंजगोलाई परिसरात शिवभोजन थाळी केंद्राचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लातूर शहराला उजनी धरणाचं पाणी धनेगाव धरणामार्फत मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 भारतीय जनता पक्षाचे औरंगाबादचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक गजानन बारवाल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
****

 औरंगाबाद इथल्या विभागीय कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए विरोधात निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांनी आज शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलं. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिल्याचं या आंदोलनाचे समन्वयक अहमद जलीस यांनी सांगितलं.
*****
***

No comments: