Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 February
2020
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** उद्योग आणि तरूणांना केंद्रस्थानी ठेऊन सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आकांक्षी भारत, सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि समाज संरक्षणाचं उद्दिष्ट
** वैयक्तिक कर रचना वैकल्पिक; कोणतीही
सवलत आणि कपात नसलेल्या कर रचनेत मोठी घट
** शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी १६ सूत्री कार्यक्रम
** प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प असल्याची पंतप्रधानांची
प्रतिक्रिया तर गंभीर आव्हांनाकडे दुर्लक्ष करणार अर्थसंकल्प असल्याचा विरोधी पक्षाचा
दावा
** गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारचे
आदेश
आणि
** भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज अंतिम टी- ट्वेंटी क्रिकेट सामना
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प काल सादर केला. उद्योग क्षेत्र आणि युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन हा अर्थसंकल्प
तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. आकांक्षी भारत, म्हणजे
शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रावर
भर, सगळ्यांचा आर्थिक विकास आणि
समाजाचं संरक्षण हे या अर्थसंकल्पाचे तीन प्रमुख भाग असल्याचं त्या म्हणाल्या.
वैयक्तिक करदात्यांसाठीच्या कर रचनेत मोठ्या कपातीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आता पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल, पाच लाख ते साडे सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी १० टक्के
कर भरावा लागेल, साडे सात ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या
उत्पन्नासाठी १५ टक्के, दहा
ते साडे बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २० टक्के, साडे बारा ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २५ टक्के आणि १५ लाख रुपयांपेक्षा
अधिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर प्रस्तावित आहे. मात्र
आयकराचे दर कमी करताना अर्थमंत्र्यांनी करसवलती आणि कर कपातींच्या
सर्व सवलती काढून घेतल्या आहेत. त्याचबरोबर नवी आयकर व्यवस्था करदात्यांसाठी ऐच्छिक केली आहे. यापूर्वीची जुनी आयकर व्यवस्थाही कायम ठेवली
असून त्यामध्ये गुंतवणुकीच्या आधारे करात सूट देणाऱ्या कररचनेद्वारेही करदात्यांना
करनिर्धारण करून विवरणपत्र दाखल करता येईल. मात्र १०० हून अधिक करसवलती आणि कर कपातींपैकी ७० सवलती कमी करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
उद्योग जगतासाठी लाभांश वितरण कर हटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी
या अर्थसंकल्पात केली. आता
कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही. मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल.
औद्योगिक कर २२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. देशांतर्गत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाही
१५ टक्के कर लागू होईल असं त्यांनी सांगितलं.
शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपये, कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटी रुपये, मागासवर्गीय विकासासाठी ८५ हजार कोटी, अनुसूचित जातीसाठी ८५ हजार कोटी, अनुसूचित जमातीसाठी ५३ हजार कोटी, महिलांकरता विशिष्ट कार्यक्रमांसाठी २८ हजार ६०० कोटी तर पोषण कार्यक्रमासाठी ३५
हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेटचं जाळ पसरवण्यासाठी सहा हजार कोटी रूपयांची
तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
युवकांच्या स्टार्ट अप्सना प्राधान्य देण्यात येईल. अभियांत्रिकी, व्यवस्थापन
क्षेत्रातल्या पदवीधर युवकांना या प्रकल्पांमध्ये संधी मिळणार असून मोठ्या प्रमाणात
नोकऱ्यांच्या संधी मिळतील, पायाभूत
सुविधा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असून, आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग अशा विविध क्षेत्रांमध्ये मिळून येत्या पाच वर्षांमध्ये
१०० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात प्रस्तावित १६ सूत्री
कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर
पंप, शेतीवर गुंतवणूक, जैविक शेती- शून्य
खर्चाची शेती या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. २०२० पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचादेखील अर्थमंत्र्यांनी आपल्या
भाषणात पुनरूच्चार केला. शेतकऱ्यांसाठीच्या
पीक कर्जाचं उद्दिष्टही १५ लाख कोटी रूपयांपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय २० लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे वीज पंप उभारण्यास
आर्थिक मदत दिली जाईल, तसंच
पडिक आणि नापिक जमिनीवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ग्रीड्सला वीज पुरवठा करण्यास परवानगी
दिली जाणार आहे. देशभरात ५०० मत्स्य उत्पादक
शेतकरी संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक खाजगी भागीदारीतून किसान
रेलची स्थापना करेल. देशातल्या
१०० सर्वाधिक अवर्षणग्रस्त जिल्ह्यांसाठी व्यापक योजनांही अर्थसंकल्पात प्रस्तावित
करण्यात आल्या आहेत.
देशभरात नऊ हजार किलोमीटरची आर्थिक मार्गिका, दोन हजार किलोमीटरचे सागरी महामार्ग, दोन हजार किलोमीटरचे धोरणात्मक महामार्ग प्रस्तावित असून दिल्ली- मुंबई मार्गिका २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं त्या म्हणाल्या
औषधं स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये
जनऔषधी केंद्राचा विस्तार करणं, मिशन इंद्रधनुष मध्ये १२ नवीन आजारांचा समावेश, प्रधानमंत्री
जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची स्थापना करणं, टीबी हारेगा, देश जितेगा
अभियानाअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं
अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ६९ हजार कोटी रुपयांची
तरतूद आहे.
****
हा
अर्थसंकल्प प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्पातल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला
उभारी मिळून तिचा पाया भक्कम होईल, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मात्र, अर्थव्यवस्थेसमोरच्या गंभीर
आव्हानांकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प, अशी टीका केली आहे. मागणीत होणारी घट आणि
गुंतवणुकीचा अभाव या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष दिलेलं नाही,
आगामी वर्षात विकासाला बळ देणारी एकही बाब या अर्थसंकल्पात नसल्याचं चिदंबरम म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,
हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचं भान हरपून
देशातले तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्य
माणसांना स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आय. डी. बी. आय आणि एलआयसीमधली भागीदारी विकणं,
रेल्वेचं खाजगीकरण,
यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडवतात, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या मुद्यावर टीका करत,
ग्रामीण भारताला पुन्हा निराश करणारा अर्थ संकल्प असल्याचं म्हटलं आहे.
उद्योग जगताकडून या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, सी आय
आय - अर्थात भारतीय उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी, सूक्ष्म आणि
लघू उद्योगांसाठीची अधिक तरतुदीची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले...
स्मॉल अँड
मिडीयम एंटरप्राइजेस साठी फक्त एक हजार कोटी रुपयांची डेपची प्रोविजन केलेली आहे. सिडबी
च्या Through भारताचा विचार करता अत्यंत छोटी रक्कम आहे त्याच्यामुळे M.S.E.B चा प्रॉब्लेम
सुटेल असं वाटत नाही मिल्क प्रोसेसिंग कॅपॅसिटी डबल करण्यासाठी या बजेटमध्ये प्रोविजन
दिलेले आहेत स्टार्टअप करता २५ कोटी रुपये हे शंभर कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि
सात वर्षाचे लिमिट हे दहा वर्ष करण्यात आलेला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पोलिस आणि उत्पादन शुल्क
विभागानं कडक कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. गृह विभागानं काल यासंदर्भातला
शासनादेश जारी केला असून, किल्ल्यांवर मद्यपान तसंच गैरवर्तन रोखण्यासाठी योग्य ती
खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
****
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा तिसरा पद्मपाणि जीवनगौरव
पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांना जाहीर झाला
आहे. हा पुरस्कार नऊ फेब्रुवारीला चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात भावे यांना
प्रदान करण्यात येणार आहे.
****
मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही युवा पिढीवर असून, युवकांनी साहित्य निर्मितीच्या
संदर्भात सजक राहण्याची आवश्यकता साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केली
आहे. जालना इथं काल अठराव्या प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या
उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. साहित्याची श्रेष्ठता आणि महत्त्व हे लेखकाच्या अनुभूतीवर
आधारित असतं, त्यामुळे युवा साहित्यिकांनी आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक असलं पाहिजे,
असं ते म्हणाले.
****
क्रिकेट - भारत आणि न्यूझीलँड दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा
पाचवा सामना आज होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता सामन्याला
सुरुवात होईल. मालिकेत भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
देशातल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
येत्या नऊ तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
केलं आहे. मनसेनं लातूर इथं भरवलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल राज ठाकरे यांच्या उपस्थितीत
समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी गुलमीर खान यांची काल बिनविरोध
निवड झाली. तसंच अन्य विषय समितींच्या सभापतींचीही बिनविरोध निवड झाली.
****
परभणी इथं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक असलेल्या सय्यद हजर शाह तुराबूल हक्क साहेब
यांच्या ऊर्स यात्रेस काल जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या उपस्थितीत मानाच्या संदल
मिरवणुकीनं सुरुवात झाली.
****
उस्मानाबाद तालुक्यात तेर इथं उत्तरेश्वर मंदिरातल्या सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी
काल रथसप्तमीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. सहाव्या शतकातल्या या मंदिरात काल
रथसप्तमीनिमीत्त सूर्यनारायणाच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली.
****
बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला
दोन दिवसीय संपात काल औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात
राष्ट्रीयकृत बॅंकांमधले अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment