Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 February
2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २० फेब्रुवारी २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** पीक कर्ज घेताना विमा बंधनकारक नाही- केंद्र सरकारचा
निर्णय
** श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त
मंडळाच्या अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास तर मंदीर बांधकाम समितीचे प्रमुख म्हणून नृपेंद्र मिश्रा यांची
नियुक्ती
** महात्मा जोतिबा
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आकस्मिक निधीतून १० हजार कोटी रूपये उपलब्ध करून देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांच्या कामांसाठी १५२ कोटी
रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारची
मंजुरी
** भारतीय जनता पक्षाचे माजी औरंगाबाद शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह नगरसेवक गजानन बारवाल यांचा शिवसेनेत प्रवेश
आणि
** राज्यभरात शिवजयंती
महोत्सव उत्साहात साजरा
****
प्रधानमंत्री पीक
वीमा योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय काल
केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे. आतापर्यंत पीक कर्ज घेताना पीक
वीमा घेणं बंधनकारक होतं, मात्र काही शेतकरी संघटना आणि राज्यांनी आक्षेप
घेतल्यानंतर ही योजना आता वैकल्पिक करण्यात आली आहे. याअंतर्गत पिकांच्या नुकसानीचा अंदाज आणि आढावा घेण्यासाठी तसंच
दाव्यांची पडताळणी करण्यासाठी द्विस्तरीय प्रक्रिया राबवली जाणार आहे. येत्या पाच वर्षात
१० हजार नव्या शेतकरी उत्पादन संघटना स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
दुग्ध व्यवसायाशी संबंधित ९५ लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या दरात अडीच टक्के सूट
देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीनं घेतला आहे. दुसऱ्या श्वेतक्रांतीच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल
असून, यासाठी चार हजार ४५८ कोटी रुपये मंत्रिमंडळानं मंजूर केले आहेत.
महिलांच्या प्रजनन हक्कांच्या
संरक्षणासाठी मदतकारी प्रजनन तंत्रज्ञान नियमन विधेयक-२०२०ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीय मान्यता देण्यात आली. याअंतर्गत
राष्ट्रीय पातळीवर एका मंडळाची स्थापना करण्यात येणार असून, हे मंडळ रुग्णालयात
आवश्यक सामग्री, प्रयोगशाळा,
तपासणीच्या सुविधा, तज्ञ मनुष्यबळ आणि
रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची वागणूक याविषयीचे दिशानिर्देश जाहीर करणार आहे.
प्रसूतीपूर्व-लिंगनिदान चिकित्सा भ्रूणविक्री करणं, तसंच अशा बेकायदेशीर प्रक्रियांसाठी
संस्था किंवा रॅकेट चालवणं यासाठी कडक शिक्षेची तरतूद या विधेयकात केली आहे.
****
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाच्या
अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास यांची, तर सचिवपदी चंपत राय यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. मंडळाच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. मंदीर बांधकाम समितीचे प्रमुख
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा
यांची, तर कोषाध्यक्षपदी पुण्याचे स्वामी
गोविंद देवगिरी यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. अयोध्येत राम मंदीर
उभारणीच्या कामाला वेग देण्याच्या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मंदीर बांधकामासाठी येणाऱ्या देणग्या स्वीकारण्यासाठी
भारतीय स्टेट बँकेत खातं उघडण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात
आला. चंपत राय यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
****
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेसाठी १० हजार कोटी रूपयांचा निधी आकस्मिक निधीतून उपलब्ध करून
देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. यासंदर्भातला अध्यादेश विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानं तसंच
राज्यपालांच्या मान्यतेनं निर्गमित करण्यात येईल.
राज्यातल्या सर्व शासकीय
आणि अनुदानीत शाळांमधल्या सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांमधला दृष्टीदोष निवारण्यासाठी
त्यांना मोफत चष्मे पुरवण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या योजनेसाठी
सुमारे २० कोटी रुपये अनावर्ती आणि पाच कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या
पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचवण्यात येईल.
****
औरंगाबाद शहरातल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल १५२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली. मुंबईत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर,
औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद महानगरपालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ,
तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे ही कामं केली जाणार आहेत.
या निधीची नगर विकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती
केली जाईल, असाही निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
भारतीय जनता पक्षाचे औरंगाबादचे माजी शहराध्यक्ष
किशनचंद तनवाणी आणि विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक गजानन बारवाल यांनी काल शिवसेनेत
प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश
केल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९० वा जयंती उत्सव काल
राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी इथं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी राज्य शासन प्रतिबद्ध
आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. किल्ले
शिवनेरीच्या नूतनीकरण आणि विकासासाठी, तेवीस कोटी रुपये निधीची
त्यांनी यावेळी घोषणा केली. २०१८ मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी,
आंदोलकांवर दाखल झालेले खटले मागे घेण्यात येतील, असं ठाकरे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
यावेळी केलेल्या भाषणात, शिवनेरी किल्ल्याचं ऐतिहासिक स्वरूप
जतन करत नूतनीकरण करणार असल्याचं सांगितलं.
****
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीनं, दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात काल शिवजयंती सोहळा साजरा झाला.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह दहा देशांच्या राजदूतांनी,
शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना, पहिला
'छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार' प्रदान
करण्यात आला.
****
राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण
करणारे शिवराय, आम्ही आजच्या
संदर्भात समजून घेतले पाहिजेत, असं मत शिवविचारवंत गंगाधर बनबरे
यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, छत्रपती शिवाजी
महाराज जयंती निमित्त ‘लढायांपलिकडील शिवाजी महाराज’ या विषयावर ते काल बोलत होते. ते म्हणाले....
आजच्या वर्तमानातलं बंड काय आहे? हे समजून घेऊन वाटचाल
करणं ही शिवचरित्राची एक नवी पर्यायी व्यवस्था असेल. आज अत्याचार वाढले. बलात्कार होत आहेत, पोरींना जाळून मारलं जातयं हे करणारे कोण आहेत? म्हणून मुलींना
जिजाऊ समजले पाहिजे. ती बंड करुन उठेल आणि शोषण करणा–या ज्या दिवशी मातीत गाडायला शिकेल
तेव्हा या देशातील गुलामी संपेल.
जालना शहरातून काल शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा
काढण्यात आली. हिंगोली इथं
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव
सोहळा पार पडला, तर वसमत इथं शिवपालखी काढण्यात आली.
औरंगाबादच्या शहरातल्या क्रांती चौकात, महाराजांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. औरंगाबाद इथल्या विभागीय कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए विरोधात
निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांनी काल शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलं. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिल्याचं या आंदोलनाचे समन्वयक अहमद
जलीस यांनी सांगितलं.
लातूर इथं युवा शिवस्पंदन समुहानं यंदा प्रथमच महिलांची पारंपारिक
वेशभूषेत तीन किलोमीटर अंतर चालण्याची स्पर्धा घेतली. निलंगा इथं युवक, युवती महिलांसह हजारो नागरिकांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा शिवसंकल्प
केला.
बीड शहरातून विविध कला पथकाचं सादरीकरण झालं. तसंच सर्वधर्मसमभाव रॅली काढण्यात आली.
उस्मानाबाद इथंही श्री साई
परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. परभणी इथं काढलेल्या मिरवणुकीत घोडेस्वार,
झांज पथक सहभागी झाले होते.
नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड जिल्ह्यात शिवजयंती ऊत्सवानिमित्त
शालेय विद्यार्थ्यांनी सायकलवर भगवे झेंडे लावून फेऱ्या काढल्या.
लोहा तालुक्यातल्या माळाकोळी नजिकच्या भिल्लू नाईक तांड्यावर गतवर्षी शिवजयंतीच्या मुहुर्तावर दुष्काळ मुक्तीचा निर्धार करून कामास सुरूवात करण्यात आली होती. काल एक वर्षानंतर
दुष्काळमुक्त झालेल्या या तांड्यानं पाण्यानं
तुडूंब भरलेल्या तलाव काठावर शिव जयंती साजरी केली. अधिक माहिती देत आहेत आमचे
वार्ताहर…
भिल्लू नाईक तांडा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीनं
गतवर्षी जलस्वराज्य परिवाराचे जलमित्र दीपक मोराळे आणि बाबूराव केंद्रे यांनी पुढाकार
घेऊन लोकसहभागातून जलसंवर्धनाच्या कामाला शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरुवात केली गावकऱ्यांनी
पाहता -पाहता २१ तलाव तयार केले हे तलाव सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे
पाण्याने भरून ओसंडून वाहू लागले भिल्लू नाईक तांडा वरील शेतकऱ्यांनी तलावाच्या पाण्यावर यंदा गहू हरभरा जनावरांसाठी
हिरवा चारा अशी पिकं घेतली आहे. काल शेतकऱ्याने या ठिकाणी पाण्याने भरलेल्या तलावाच्या काठावर शिवजयंती
उत्साहात साजरी केली.
- आनंद कल्याणकर, आकाशवाणी वार्ताहर, नांदेड.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार राबवत असलेल्या
लोकाभिमुख योजनांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तसंच
अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर इथं गंजगोलाई परिसरात शिवभोजन
थाळी केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते.
****
No comments:
Post a Comment