Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद
शहराचं संभाजीनगर नामकरण करण्याची प्रक्रिया राज्यसरकारनं सुरू केली आहे. यासंदर्भात
रेल्वे तसंच टपाल कार्यालयांसह इतर विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रं मिळवण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास
पालवे यांनी ही माहिती दिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुमारे पंचवीस
वर्षांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण केल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबाद दौऱ्यादरम्यान,
हा मुद्दा उपस्थित केला होता.
****
राज्याचा आर्थिक
विकासाचा दर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून
वर्तवण्यात आला आहे. २०१९ -२० चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज विधीमंडळासमोर सादर करण्यात
आला. या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार कृषी आणि संबंधित क्षेत्रात तीन पूर्णांक एक
दशांश टक्के, उद्योग क्षेत्रात तीन पूर्णांक तीन दशांश टक्के तर सेवा क्षेत्रात सात
पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे.
दरम्यान आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत
सादर होणार आहे.
****
अंबाजोगाई जिल्हा
जाहीर करण्याबाबतचा मुद्दा आमदार विनायक मेटे यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला.
जिल्हा प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेली बहुतांश प्रशासकीय कार्यालयं अंबाजोगाई
इथं कार्यरत असल्यामुळे, स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी अपेक्षित असलेला मोठा खर्चही
होणार नाही, याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी
याबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
****
अंधश्रद्धा निर्मूनल
समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं ठाणे जिल्ह्यातल्या खाडीतून एक पिस्तुल हस्तगत
केलं आहे. सापडलेलं हे पिस्तुल दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेलंच पिस्तुल आहे किंवा
नाही, हे या पिस्तुलाच्या बॅलेस्टिक चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया
सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चौघा दोषींना येत्या २० मार्च रोजी
फाशी दिली जाणार आहे. दिल्लीतल्या पटियाला न्यायालयानं आज नवीन डेथ वॉरंट जारी केलं.
यानुसार या चौघा दोषींना २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता फासावर लकटवण्यात येणार आहे.
दरम्यान, या चौघांना एकाच वेळी फासावर देण्याच्या दिल्ली
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च
न्यायालय येत्या २३ मार्चला सुनावणी घेणार आहे. या चौघांच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी
२० मार्च ही तारीख निश्चित झाल्याचं, महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या
निदर्शनास आणून दिलं, मात्र न्यायालयानं २३ मार्चला सुनावणी घेण्याचा निर्णय कायम ठेवत,
या प्रकरणी यापुढे स्थगिती दिली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
****
दिल्ली हिंसाचाराच्या
मुद्यावरून लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवसापासून
गदारोळ केल्याप्रकरणी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित
केलं आहे. गौरव गोगोई, टी एन प्रताप, माणिक टागोर, आर उन्नीथन, डीन कुरियाकोसे, बेनी
बेहनन आणि गुरजीत सिंह अशी निलंबित खासदारांची नावं असून, चालू अधिवेशनाच्या कार्यकाळासाठी
हे निलंबन लागू असणार आहे.
****
तुळजापूर इथल्या श्रीतुळजाभवानी मंदीर
संस्थानने २६ फेब्रुवारी पासून भाविकांच्या सुरक्षेसाठी एक
वर्ष मुदतीचा अपघात विमा उतरवला आहे. यात भाविकाचा दुर्दैवाने मंदीरात मृत्यु झाल्यास त्यास
दोन लाख रुपये मिळणार आहे. कायमस्वरुपी व्यंग तसंच जखमी झालेल्या भाविकांनाही
मदतीची तरतूद या विम्यात करण्यात आली आहे.
****
सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर
शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याप्रकरणी अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या न्यायालयात
तक्रार केली होती. त्यानुसार महास्वामी यांच्यासह तहसील कार्यालयातले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
****
राष्ट्रीय
समाज पक्षाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्यामाध्यमातून २९ हजार शेतकऱ्यांच्या
नावाने तब्बल ३२८ कोटी रुपये पीक कर्ज घेतल्याप्रकरणी गेल्या सुमारे वर्षभरापासून गुट्टे
हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम
सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात होणार आहे. आज उपांत्य फेरीतला पहिला सामना रद्द
झाल्यावर गुणांच्या आधारावर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला
*****
***
No comments:
Post a Comment