Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
06 March 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** नागरिकत्व
सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या
नोंदणीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती नियुक्त
** औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरण करण्याचा
प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर
होणार
** औरंगाबाद शहरात बेकायदेशिर
फलक लावणाऱ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्याची औरंगाबाद
खंडपीठाची महापालिकेला परवानगी
आणि
** जालन्यातल्या ओम साईराम स्टील कारखान्यात
वितळलेल्या लोखंडाचा रस अंगावर पडल्यानं पाच कामगारांचा मृत्यू
****
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय
नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी सहा
मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल
विधानसभेत केली. यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला असून, परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत जितेंद्र आव्हाड, विजय
वडेट्टीवार, सुनिल केदार, नवाब मलिक
आणि उदय सामंत यांचा समावेश असेल.
****
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाचं नामकरण
छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव काल राज्य मंत्रीमंडळाच्या
बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत
केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र
शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी विधानसभेत सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद शहराचं संभाजीनगर
नामकरण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली असल्याचं औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी
भानुदास पालवे यांनी सांगितलं. यासंदर्भात रेल्वे तसंच टपाल कार्यालयांसह इतर विभागांकडून
ना हरकत प्रमाणपत्रं मिळवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचं ते म्हणाले.
***
आगामी आर्थिक
वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर होणार आहे. अर्थमंत्री
अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी
काल विधानसभेत २०१९ -२० चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला.
राज्याचा आर्थिक विकासाचा दर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा
अंदाज या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. या अहवालात दिलेल्या
आकडेवारीनुसार, कृषी आणि संबंधित क्षेत्रात तीन पूर्णांक एक दशांश
टक्के, उद्योग क्षेत्रात तीन पूर्णांक तीन दशांश टक्के,
तर सेवा क्षेत्रात सात पूर्णांक सहा दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे.
****
अंबाजोगाई
जिल्हा जाहीर करण्याबाबतचा मुद्दा आमदार विनायक मेटे तसंच आमदार सुरेश धस यांनी काल
विधान परिषदेत उपस्थित केला. जिल्हा प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेली
बहुतांश प्रशासकीय कार्यालयं अंबाजोगाई इथं कार्यरत असल्यामुळे, स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी अपेक्षित असलेला मोठा खर्चही होणार नाही,
याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,
असं सांगितलं.
****
नागरिकांनी
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना
विषाणुच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेत काल चर्चा झाली,
या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात सध्या या
विषाणुच्या प्रादुर्भावाचा धोका नसला, तरीही
राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या
असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. होळी, धुलिवंदन,
आणि रंगपंचमीचा सण काळजीपुर्वक साजरा करण्याचं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
नांदेडच्या
शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचं रॅगिंग
होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला.
सरकारनं हे प्रकार थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी फडणवीस
यांनी केली.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी-ईपीएफच्या व्याजदरात शुन्य पूर्णांक एक पाच दशांश टक्क्यांनी कमी केला असून आता
तो साडे आठ टक्के इतका झाला आहे. यापूर्वी हा व्याजदर आठ पूर्णांक सहा पाच शतांश टक्के इतका होता. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा गेल्या सात वर्षातला सर्वात कमी व्याजदर
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरात
बेकायदेशिर फलक लावणाऱ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसुल
करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महानगरपालिकेला दिली
आहे. अनधिकृत फलक लावणारा, प्रकाशक,
संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्यास ज्याला शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्याकडून,
किंवा ज्याने शुभेच्छा दिल्या त्या व्यक्तीकडून हा दंड वसूल करण्याचे
आदेश न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भातल्या पुढच्या सुनावणीच्या
वेळी आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
जालना औद्योगिक
वसाहतीमधल्या ओम साईराम स्टील कारखान्यात काल वितळलेल्या लोखंडाचा रस अंगावर
पडल्यानं पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. भंगार
वितळल्यानंतर तयार झालेलं लोखंडांचं पाणी क्रेनद्वारे साच्यात ओतताना हा अपघात
झाला. जखमी कामगारांना उपचारासाठी औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात
आल्याचं पोलिस अधिक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या
महिलांसाठी अनेक योजना असून, महिलांना त्या योजनांचा लाभ होत आहे.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चिंचपूर ढगे
इथल्या सुषमा सांगळे यांनी प्रधानंमत्री सुरक्षित मातृत्व अभियानाबद्दल त्यांचा अनुभव सांगितला.
मी चिंचपूर ढगे राहणारी आहे. प्राथमिक आरोग्य
केंद्र वालवड येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत तपासणी साठी आली आहे.
आणि माझ्या बि.पी, शुगर, एचबी या तपासण्या झाल्या आहेत. आणि या सगळ्या सुविधा गोळ्या
औषध वगेरे डेमो मोफत देत आहेत. त्यामुळे माझ्या सारख्या गरोदर माताना येथे लाभ मिळत
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थाननं
२६ फेब्रुवारी पासून भाविकांच्या सुरक्षेसाठी एक वर्ष मुदतीचा अपघात विमा उतरवला आहे.
यात भाविकाचा दुर्दैवाने मंदीरात मृत्यू झाल्यास त्यास दोन लाख
रुपये मिळणार आहे. कायमस्वरुपी व्यंग तसंच जखमी झालेल्या भाविकांनाही
मदतीची तरतूद या विम्यात करण्यात आली आहे.
****
धुलिवंदन आणि
रंगपंचमी सणांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात देवसिंगा
आणि वागदरी या गावातले महिला बचतगट नैसर्गिक रंग तयार करून देतात. यंदा
या रंगांना इतर जिल्ह्यातूनही मागणी आहे. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर...
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा आणि वागदरी
या गावात नैसर्गिक रंगनिर्मिती तयार करण्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांनी मक्याच्या
पिठात खाण्याच्या पदार्थात वापरणारे रंग मिसळून वेगवेगळे रंग तयार केले आहेत. पर्यावरणपूरक
रंगांच्या निर्मितीमुळं निसर्ग सांगत वस्तूंचा वापर वाढविण्याचा संदेश या महिलांनी
दिला आहे. रासायनिक रांगांपासून उद्धभवणाऱ्या शारिरीक इजा टाळण्यासाठी या नैसर्गिक
रंगांचा वापर वाढल्यास महिला बचत गटाच्या महिलाचं सक्षमीकरण तर होईलच शिवाय शारिरीक
दुष्परिणामांपासून होणारे नुकसानही टाळता येणार आहे.
देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
नांदेड जिल्ह्याच्या
कंधार आणि लोहा तालुक्यात आगामी काळात होत असलेल्या ग्रामीण पंचायत निवडणूक बिनविरोध
करणाऱ्या गावांना पाच लाख रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा लोहा विधानसभा मतदार संघाचे
आमदार शामसुंदर शिंदे यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते.
या निधीतून गावांच्या विकास कामांसाठी उपयोग करता येईल, ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमुळे गावा - गावात संघर्ष
होऊ नये अशी आपेक्षा आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
नांदेड इथल्या
प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे पत्रकार पुरस्कार काल जाहीर झाले. वर्ष
२०१८चा पत्रभूषण सुधाकर पत्रकारिता पुरस्कार नांदेडचे जेष्ठ पत्रकार
पंढरीनाथ बोकारे यांना, तर २०१९ च्या पुरस्कारासाठी नांदेडच्या
दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली.
****
महिला टी ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात होणार आहे. काल
उपांत्य फेरीतला पहिला सामना रद्द झाल्यावर गुणांच्या आधारावर भारतीय संघ अंतिम फेरीत
दाखल झाला, तर पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया
संघानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला जागतिक महिला दिनी सिडने
इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment