Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 09 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात मागील एका महिन्यापासून
कोरोना विषाणूचे दैनंदिन रुग्ण आढळण्याचं प्रमाण ५० हजारापेक्षा कमी झालं आहे. देशात काल दिवसभरात ३२ हजार ८० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४०२
जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख ३५ हजार ८५०
झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४१ हजार ३६० रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल ३६ हजार ६३५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. देशात आतापर्यंत ९२ लाख १५ हजार ५८१ रुग्ण बरे झाले असून, कोरोना
विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के इतकं झालं आहे. सध्या तीन लाख ७८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख २२
हजार ७१२ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी ९८ लाख ३६ हजार
७६७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
यांनी नागरिकांना, आपल्या जीवनातून या कुवृत्तीस समाप्त करण्याचं आवाहन केलं आहे.
भ्रष्टाचार सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी बाधाकारक आहे, भ्रष्टाचारामुळे दुर्बल वर्ग विकासापासून वंचित
राहतात तसंच समाजात मानवीय संवेदना आणि संस्कारांना समाप्त करतो, असं
उपराष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या दिल्लीतल्या संसद मार्गावर उभारण्यात येणाऱ्या संसद भवनाचं भूमिपूजन
करणार आहेत. नवीन संसद भवन आधुनिक आणि तंत्रज्ञान युक्त असेल, तसंच हे भवन उभारणीत
पर्यावरणयुक्त कार्यशैलीवर भर दिला जाणार आहे.
****
राज्यातील
उस्मानाबाद, गडचिरोली, नंदुरबार, आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांनी २०१८ च्या
तुलनेत मानव निर्देशांकात प्रगती करून आपलं मानांकन सुधारल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काल या जिल्ह्यातल्या विविध विभागांतील रिक्त
पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग - ३ ची पदं तातडीनं
भरण्याचे निर्देश दिले.
****
आर्थिक
गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये,
असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सक्तवसुली संचनालयाल - ईडीला दिले आहेत. ईडीच्या पथकानं
२४ नोव्हेंबर रोजी सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता, त्यानंतर त्यांना चौकशीसाठी
नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात
धाव घेतली होती. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल, तेव्हा आपण जाणार असल्याचं
सरनाईक यांनी सांगितलं.
****
जानेवारीत
होणाऱ्या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळ आणि विश्व मराठी परिषदेनं सात नि:शुल्क लेखन कार्यशाळांचं आयोजन केलं आहे. उद्यापासून
या कार्यशाळा सुरू होणार आहेत. त्यामध्ये भारतातील सर्व राज्यांसह ३५ देशातल्या मराठी
भाषिकांना सहभागी होता येणार आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेचा ३८वा वर्धापन दिन काल विविध कार्यक्रमांनी साधेपणानं साजरा झाला. यानिमित्त
काल गरवारे क्रीडा संकुल इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच कोविड
-19 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या २० डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी,
आणि स्वछता विभागातल्या १५ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद
शहरातल्या रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
लिमिटेडनं डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे. ‘स्ट्रिटस् फॉर पिपल’अंतर्गत शहरातल्या
चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली
असून, विजेत्यांना आकर्षित बक्षिस देण्यात येणार आहे. पैठण गेट ते गुलमंडी, क्रांती
चौक ते गोपाळ टि चौक, सिडकोतलं कॅनॉट परिसर, प्रियदर्शिनी गार्डन आणि एमजीएम दरम्यानच्या
रस्त्यांचा विकास याअंतर्गत करण्यात येणार आहे. स्पर्धकांना १७ डिसेंबरपर्यंत रस्त्यांचं
डिझाईन पाठवणं आवश्यक आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट औरंगाबाद स्मार्ट सिटी डॉट
इन या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
****
जालना
इथले जेष्ठ कवी प्राध्यापक लक्ष्मीकांत प्रामाणिक यांचं आज औरंगाबाद इथं वार्धाक्यानं
निधन झालं. प्रामाणिक हे मराठवाडा साहित्य परिषदेचे सभासद होते. साहित्यातील कवितेसह
समीक्षा लेखनाची त्यांची हातोटी होती.त्यांच्या पार्थिवावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात २०२० ते २०२५ या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण
काल काढण्यात आलं. यामध्ये औरंगाबाद मधल्या ११४, कन्नड तालुक्यात १३८, वैजापूर १३५,
गंगापूर १११, सिल्लोड १०२, पैठण १०८, फुलंब्री ७१, सोयगाव ४६ आणि खुलताबाद तालुक्यातल्या
३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
//*********//
No comments:
Post a Comment