Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधातल्या भारत बंदला
संमिश्र प्रतिसाद; किरकोळ घटना वगळता पक्ष संघटनांची शांततेत निदर्शनं
** या बंदच्या माध्यमातून काही संघटना शेतकऱ्यांना भडकवत
असल्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आरोप
** मोठ्या प्रमाणात होणारी कच्च्या तेलाची आयात ही देशाच्या
अर्थव्यवस्थेसमोरची मोठी समस्या - केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी
** शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करू - कृषीमंत्री
दादा भुसे यांच आश्वासन
आणि
** जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यात
आज प्रत्येकी एका कोवीड बाधित रुग्णाचा मृत्यू
****
सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात विविध पक्ष संघटनांनी
पुकारलेल्या भारत बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. अनेक संघटनांनी
बंदला पाठिंबा जाहीर करत विविध मार्गांनी या कृषी कायद्यांना विरोध केला, तर अनेक संघटनांनी
या बंदमध्ये सहभागी होत नसल्याचं जाहीर करत, आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवल्याचं दिसून
आलं. काही किरकोळ घटना वगळता विविध पक्ष संघटनांनी शांततेत निदर्शनं केल्याचं दिसून
आलं.
****
सोलापुरात
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं, शहरातील विविध
भागातून घोषणाबाजी करत या कायद्यांना विरोध दर्शवला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस
तसंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडी तसंच
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही या बंदमध्ये सहभागी होत निर्दशने केली. यावेळी प्रशासनाला
भाजी भेट देवून या कायद्यांना निषेध करण्यात आला.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात भारत बंदचा फज्जा उडाल्याचा
दावा भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे. ते कणकवलीत बोलत होते. भारत
हा शेतकऱ्यांचा, सैनिकांचा आणि कष्टकऱ्यांचा असल्यानं, तो कधीच बंद होऊ शकत नाही, असं
जठार म्हणाले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीत आजपासून सुरू करण्यात आलेल्या
कांदा विक्रीला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.
****
धुळे शहरासह जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
धुळे शहरातल्या बाजारपेठा, दैनंदिन व्यवहार, शासकीय तसंच खासगी कार्यालयं, रिक्षा,
एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरु आहेत. मात्र बंदला पाठींबा देणाऱ्या विविध पक्ष, संघटनांनी
धुळे शहरातून जाणाऱ्या आग्रा मुंबई महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यानं काही काळ
वाहतुकीची कोंडी झाली होती.
****
सांगली इथं आंदोलनादरम्यान काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि
पोलीस यांच्यात झटापट झाली. कार्यकर्ते प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या प्रयत्नात असताना,
पोलिसांनी तो काढून घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या
बाजारपेठा आज सकाळपासून बहुतांशी बंद होत्या.
****
यवतमाळ इथं मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत, कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी
निदर्शनं केली.
****
बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस सह किसान संघर्ष समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांनी
एकत्र येऊन बंदमध्ये सहभाग नोंदवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
सकाळी मलकापूर इथं रेल्वे रोखून धरली, तर कॉंग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी नांदुरा
इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोखून धरला
होता.
****
बीड जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यात
सकाळी काही प्रमाणात बस वाहतूक ही बंद होती, मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या बस
गाड्यांची ये-जा सुरू होती. बीड शहरासह जिल्ह्यातल्या बाजारपेठा आज उशीरा उघडल्या,
भाजी मंडई देखील सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात शेतकरी संघटना
या बंदमध्ये सहभागी झाली नाही.
****
औरंगाबाद शहरात बंदला अल्प
प्रतिसाद दिसून आला, मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात
दिल्ली दरवाजा परिसरात आंदोलन करणाऱ्या डाव्या पक्षांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं. पैठण शहरात औषधी दुकानं वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठानं
बहुतांशी बंद होते. सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. वैजापूर
तालुक्यात मात्र व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजीपाला विक्रेत्यांपासून व्यापारी वर्गही या बंदमध्ये सहभागी झाल्यानं बाजारपेठांमध्ये
शुकशुकाट दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेची दुकानं वगळता, इतर आस्थापना
बंदमध्ये बहुतांशी सहभागी असल्याचं दिसून आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह
विविध शेतकरी आणि कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. लातूर शहरात काँग्रेस
पक्षाच्या वतीनं गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली, जिल्हाभरात बँकांचे व्यवहार, तसंच
एसटी महामंडळाची वाहतूक तुरळक स्वरूपात सुरू होती. दुपारनंतर मात्र प्रवासी नसल्यानं
अनेक बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या
****
जालना जिल्ह्यासह शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मुख्य बाजारपेठेत काही दुकानं बंद तर काही दुकानं सुरु होती, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
या बंदच्या माध्यमातून काही संघटना शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा
आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात
पत्रकार परिषदेत बोलत होते. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत. मात्र ज्यांचा
या कायद्यांना विरोध आहे, त्यांनी आगामी अधिवेशनात आपले मुद्दे मांडावेत, शेतकरी संघटनांनी
आक्रमक भूमिका न घेता सरकारला बदल सुचवावेत, तडजोडीची भूमिका घ्यावी, असं आवाहन आठवले
यांनी केलं.
****
मोठ्या प्रमाणात होणारी कच्च्या तेलाची आयात ही देशाच्या
अर्थव्यवस्थेसमोरची मोठी समस्या असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी
म्हटलं आहे. ‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल’ या विषयावर ऑनलाईन
प्रशिक्षण कार्यक्रमात गडकरी बोलत होते. जैविक इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनं हा यावरचा
पर्याय असल्याचं गडकरी म्हणाले. देशात ऊस, गहू, मका यांचं मुबलक उत्पादन होतं, या धान्यांपासून
इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजीची निर्मिती करावी लागणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग
बनवण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहायक कंपन्यांच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा, असं
आवाहन गडकरी यांनी केलं. देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वीजेसह, सौर ऊर्जा,
पवन ऊर्जेचा वापर करून सार्वजनिक तसंच खाजगी वाहतूक सुरु झाली तर एक चांगला पर्याय
लोकांनाही उपलब्ध होईल, याकडेही गडकरींनी लक्ष वेधलं.
****
आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५८ शस्त्रक्रिया समाविष्ट
केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने येत्या ११ डिसेंबरला अत्यावश्यक वगळता
सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या
डॉ ज्योती चिडगुपकर यांनी सोलापुरात ही माहिती दिली. सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने
या शस्त्रक्रियांच्या समावेशाबाबतची सूचना मागे घ्यावी, मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या
विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व ४ समित्या बरखास्त कराव्या, आदी
मागण्या आयएमएनं केल्या आहेत.
****
शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू,
अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी
इथं एका कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून बोलत होते. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यासह,
ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच
सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. 'विकेल ते पिकेल' या मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल करणं शेतकऱ्यांच्या हिताचं ठरणार
असल्याचं भुसे यांनी नमूद केलं.
****
कोरोना विषाणू
संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन कृषी पर्यटनाचे
प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज एका कोवीड
बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची एकूण
संख्या आता ३२७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळून आले.
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात
आज एका कोविडग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात आज पाच नवे
रुग्ण दाखल झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
जालना-औरंगाबाद मार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत
दुचाकीस्वार पती पत्नीचा मृत्यू झाला, बदनापूर
इथल्या पाथ्रीकर महाविद्यालयासमोर आज सकाळी हा अपघात झाला.
****
क्रिकेट
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आजच्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं
भारतीय संघावर बारा धावांनी विजय मिळवला. यजमान संघानं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर
१८७ धावांचं आव्हान ठेवलं, या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ मात्र निर्धारित
षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावाच करू शकला. भारतानं ही मालिका दोन एक अशी
जिंकली आहे.
****////****
No comments:
Post a Comment