Monday, 22 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2021

Time 7.10am to 7.25am

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय

** भाजपसह अनेक पक्षांकडून गृहमंत्र्यांवर कारवाईची मागणी; भाजपचं राज्यभरात आंदोलन

** शाळकरी मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याला राज्य सरकारचं सर्वोच्च प्राधान्य

** जीएसटीचा भरणा रोखीने करण्याची कोणतीही सूचना नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट

** राज्यात नवे ३० हजार ५३५ कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल ३१ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ४१ रुग्णांची नोंद

** नांदेड जिल्ह्यात २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पाच एप्रिल पर्यंत संचारबंदी

आणि

** स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आजपासून सुरु होणाऱ्या परीक्षा तुर्तास स्थगित

****

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत. या प्रकरणाची निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या मार्फत चौकशी करण्याची सूचना पवार यांनी केली.

****

दरम्यान, निवृत्त पोलिस महासंचालक विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी करू शकतात का, असा प्रश्न  विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलिस दलातील बदल्या तसंच नेमणुकीसाठी होणाऱ्या गैरव्यवहारासंदर्भात, तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी, तसंच वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनीही, गृह विभागाच्या कारभाराबद्दल यापूर्वी अहवाल सादर केला होता, मात्र या बाबत सरकारनं काहीही कारवाई केली नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. या आरोपाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवायची नसेल, तर न्यायालयाच्या देखरेखीमध्ये चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी भाजप आंदोलन करतच राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

****

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांचा तपास केंद्रीय संस्थांनी करून, पुढील कारवाई करावी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पोलीस अधिकाऱ्यांमार्फत खंडणी गोळा करायला लावणं हे राज्यासाठी लांच्छनास्पद असून, या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही, नैतिकतेच्या दृष्टीनं अनिल देशमुख यांनी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे.

 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी, गृहमंत्र्यांवरचे आरोप गंभीर असून, यामुळे काही बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते.

 

जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी, या प्रकरणी देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसं न झाल्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, असही भोसले यांनी म्हटलं आहे.

****

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तातडीनं राजीनामा द्यावा या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, यांच्या नेतृत्वात, लातूर इथं शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात, तर उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. परभणी इथंही पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन करून, जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. नांदेड इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळानं, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत, गृहमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली. मुंबई, नागपूर, नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम आदी ठिकाणीही, भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

****

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं दोघांना अटक केली आहे, त्यांना काल न्यायालयासमोर हजर केलं असता, येत्या तीस तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींमधील एकजण `लखन भय्या` खोट्या चकमकी प्रकरणी निलंबित पोलिस कर्मचारी असून, दुसरा बुकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

****

शाळकरी मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. जागतिक कथाकथन दिवसाच्या औचित्यानं ‘गोष्टींचा शनिवार’, या कथा वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच एकात्मिक बाल विकास सेवा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं, ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला. मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचा भाग असलेल्या कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर जीएसटीचा रोख रकमेच्या स्वरुपात भरणा करावा यासाठी, करदात्यांना दूरध्वनी किंवा व्हॉट्सअ‍ॅप वरून संपर्क केला जात नसल्याचा खुलासा, केंद्र सरकारनं केला आहे. वस्तू आणि सेवाकर अधिकारी अशा तऱ्हेनं करदात्यांशी संपर्क साधत असल्याची कथित माहिती, प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसंच सीमाशुल्क मंडळानं अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचं, सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात काल ३० हजार ५३५ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २४ लाख ७९ हजार ६८२ झाली आहे. काल ९९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ३९९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १५ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ३१४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २२ लाख १४ हजार ८६७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८९ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख १० हजार १२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या चार हजार ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११, नांदेड जिल्ह्यातल्या नऊ, जालना चार, परभणी तसंच लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४३२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९२७, जालना ५२७, लातूर ३७७, बीड ३६६, परभणी २२१, उस्मानाबाद ११७ तर हिंगोली जिल्ह्यात ७४ नवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबादमध्ये ‘सप्ताहांत संपूर्ण टाळेबंदीला’, कालही नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा, जिल्हा बँक निवडणूक, तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बाहेर पडलेले उमेदवार वगळता, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

****

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याची आवश्यकता, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. काल औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयाला भेट देऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शहरानजिक वाळूज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काल भेट देऊन, यंत्रणेला अधिक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

****

नांदेड जिल्ह्यात २४ मार्चला मध्यरात्री १२ वाजेपासून पाच एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. या काळात शाळा महाविद्यालयं, धार्मिक स्थळं, शॉपिंग मॉल, सार्वजनिक तसंच खासगी वाहतुक, मंगल कार्यालयं, केश कर्तनालयं, उद्यानं, क्रीडांगणं, सर्व प्रकारची बांधकामं तसंच मोर्चे आंदोलनं पूर्णपणे बंद राहतील. उपाहारगृहांना घरपोहोच सेवा देता येईल. दूध, भाजी आणि फळं विक्री मर्यादित स्वरुपात सुरू असेल. सर्व बँका, घरगुती गॅस वितरण, पेट्रोल तसंच गॅस पंप, ई कॉमर्स सेवा, सर्व दवाखाने, औषधी दुकानं आणि वैद्यकीय सेवांशी निगडित वाहतुक सुरू राहील.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविडसंदर्भात गंभीर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी तसंच मास्कचा वापर करा, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. वारंवार सूचना देऊन, तसंच कारवाई करूनही ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक विना मास्क फिरत असल्याबद्दल, त्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत ९० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर गंभीर रुग्णांना रुग्णखाटा मिळण्यात अडचणी येतात, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आज २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्च पासून सुरु झाल्या आहेत, त्या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही सत्रात काल अनेक उमेदवार गैरहजर राहिले. मराठवाड्यात ३८ हजार ७२७ उमेदवार ही परीक्षा देणार होते, मात्र सुमारे १२ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली नाही. परभणी जिल्ह्यात सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेला एक हजार ३९९, तर तर दुपारच्या सत्रात झालेल्या परीक्षेला, एक हजार ४०९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. औरंगाबाद इथं एका परीक्षा केंद्रावर, कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णानं `पीपीई कीट` घालून परीक्षा दिली. 

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काल सरासरी ९४ टक्के मतदान झालं. फुलंब्री, सोयगाव आणि पैठणमध्ये शंभर टक्के मतदान झाल्याचं निवडणूक अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितलं.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी काल एक हजार ५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.

 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलने पाच जागा जिंकल्या, सुरेश धस गट तसंच जयदत्त क्षीरसागर गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली. काँग्रेसचे राजकुमार मोदी अपक्ष म्हणून विजयी झाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कालही अनेक भागात गारपिटीसह पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात घाटनांद्रा, अंभई, गोळेगाव परिसरात गारपीट झाल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यातही काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात गारपिटीसह पाऊस झाला.

****

काल जागतिक वन दिनाचं औचित्य साधून, लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या हत्ती बेट या वन पर्यटन स्थळी, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक व्यक्तीनं किमान एका वृक्षाचं संवर्धन करण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. वृक्षारोपणानंतर वृक्ष शंभर टक्के जगले पाहिजेत, यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश, बनसोडे यांनी दिले.

****

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराची, ७१ हजार रूपये ऑनलाईन घेवून फसवणूक केल्याचा प्रकार, बीड जिल्ह्यात धारूर इथं उघडकीस आला आहे. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

//*******//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...