Wednesday, 3 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०

****

** कोविड विरोधातली लढाई महाराष्ट्र समर्थपणे लढत असल्याचा सर्वांनी अभिमान बाळगावा- राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

** मुख्यमंत्र्यांच्या भाषणात महाराष्ट्रातले मुद्दे नसल्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

** औरंगाबाद जिल्ह्यात चार कोविड बाधित पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू

आणि

** परभणी इथं एका संगणक अभियंत्यांची सुमारे दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

****

कोविड विरोधातली लढाई महाराष्ट्र समर्थपणे लढत आहे, त्याचा सर्वांनी अभिमान बाळगावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या चर्चेला ते आज विधान सभेत उत्तर देत होते. विरोधकांनी आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून, महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अनेक कविता, अभंग आणि शेरोशायरीचा आधार घेत, आपले मुद्दे मांडले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, आरे मेट्रो प्रकरण, जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे, दिल्लीतलं कृषी कायद्यांविरोधातलं आंदोलन, चीन आणि पाकिस्तान सीमेवरची सुरक्षा. यासह अनेक मुद्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शरजील उस्मानीच्या वादग्रस्त भाषणाच्या मुद्यावर बोलताना, त्याला अटक करणारच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करणारच, त्यापूर्वी विधानसभेनं औरंगाबादच्या विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामांतर करण्याचा ठराव संमत केला आहे, केंद्र सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. आवाजी मतदानानं हा आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्याबद्दल विरोधकांनी सभात्याग केला. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, चौकातलं भाषण आणि सदनातलं भाषण यातला फरक मुख्यमंत्र्यांना अद्याप लक्षात आला नसल्याची टीका करत, मुख्यमंत्र्याच्या या भाषणात महाराष्ट्र कुठेही नसल्याचं सांगितलं. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर बोलणारे मुख्यमंत्री राज्यात कृषीपंपांची आणि सामान्यांची वीज तोडल्याच्या मुद्यावर काहीही बोलत नाही, हे खेदजनक असल्याचं, फडणवीस म्हणाले. चीन सीमा वादाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह विधान करून, सैनिकांचा अवमान केल्याची टीका फडणवीसांनी केली. कोविड संदर्भात विचारलेल्या एकाही मुद्याला ते उत्तर देऊ शकले नाही, मुख्यमंत्र्यांचं हे भाषण पूर्णपणे निराशाजनक असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. ३१ मार्चपर्यंत ही समिती स्थापन होऊन समितीला प्रथम चार महिन्यांची मुदत देण्यात येईल, त्यात आवश्यकतेनुसार दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल. एकूण सहा महिन्यात याबाबतचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असं पवार यांनी सांगितलं. या मोहिमे अंतर्गत वनविभागाकडून २८ कोटी २७ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती, ऑक्टोबर २०२० अखेर त्यापैकी सुमारे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाडं जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत असल्याची माहिती वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.

****

नागपूर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. आणि या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त या संस्थेमार्फत जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईल, असं मुंडे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यात आली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. जानेवारी अखेरपर्यंत मानिव अभिहस्तांतरणाचे १४ हजार ८२२ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १३ हजार ६५५ अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. उर्वरित एक हजार १६७ अर्जांवर कार्यवाही सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल. परंतु या प्रकरणात काही संवैधानिक तसंच कायदेशीर पेच असून, त्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची गरज असल्याचं, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाबाबत विधान परिषदेत सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणाबाबत येत्या ८ मार्चपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. केंद्र सरकारने त्यापूर्वी स्पष्ट भूमिका घेतली, तर मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतर राज्यांच्या आरक्षणांनाही लाभ मिळेल, असं चव्हाण म्हणाले.

****

महाराष्ट्रातील जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, आणि वन्यजीवांचं संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जागतिक वन्यजीव दिनाचं औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’ आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या या पक्षावरील लघुपटाचं प्रदर्शन आणि पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचं अनावरण पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते.

 

दरम्यान, जागतिक वन्‍यजीव दिनाच्या अनुषंगानं नांदेड जिल्हा परिषदेच्या परिसरातल्या वृक्षांवर पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था आज करण्यात आली. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक यांच्‍या उपस्थितीत वृक्षांवर पक्षांसाठी मातीच्‍या परळांमध्‍ये पाणी ठेवण्‍यात आलं.

*****

कर्णबधिरता आणि श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसंच यासंदर्भात जनजागृती वाढवण्यासाठी आज जगभरात जागतिक श्रवण दिन पाळता जातो. यानिमित्त नांदेड जिल्‍हा परिषदेत सुनो प्रकल्‍पाच्‍या भित्तीपत्रकाचं प्रकाशन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते आज करण्‍यात आलं. सुनो फाऊंडेशन आणि जिल्‍हा परिषदेच्‍या संयुक्‍त विद्यमाने जिल्हाभरातल्या प्राथमिक आरोग्‍य केंद्रातून लहान मुलांमधला बहिरेपणा ओळखणं, तपासणी आणि उपचार याविषयी जनजागृती केली जाणार असल्‍याचं वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार कोरोना विषाणू बाधित पुरुष रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १५ नविन कोविड बाधित रुग्ण आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ९३१ झाली असून एक हजार २७५ रुग्ण दगावले आहेत.

****

परभणी इथं एका संगणक अभियंत्यांची सुमारे दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. काल हा प्रकार घडला. श्रीनिवास गुट्टे असं या संगणक अभियंत्यांचं नाव असून, काल सकाळी त्यांना कंपनीतल्या वरिष्ठांच्या नावे एक ई मेल आला. या मेलमध्ये सांगितल्यानुसार गुट्टे यांनी एका व्यक्तीला २ लाख एक हजार ३०० रुपये पाठवले. मात्र वरिष्ठांशी फोनवरून बोलल्यावर त्यांनी असा काही मेल केलाच नसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक रामेश्वर तट हे अधिक तपास करत आहेत.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विधान भवनात भेट घेऊन परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क परत देण्याची मागणी केली. नुकत्याच झालेल्या विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीतही चौगुले यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं होतं. कुलगुरूंनी याबाबत शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असं उत्तर दिलं होतं. ज्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत, त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क परत करण्याबाबत राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देशित करावं, अशी मागणी चौगुले यांनी या निवेदनातून केली आहे.

//*************//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...