Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 March 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – ०३ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** विधीमंडळात निर्णय
होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी खंडीत न करण्याची सरकारची घोषणा.
** शेतकऱ्यांना दिवसा आणि पुरेशी वीज देण्याला
शासनाचं प्राधान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
** औरंगाबाद-अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित
रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात
** राज्यात सात
हजार ८६३ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ७६५ बाधित तर आठ जणांचा मृत्यू
** लातूर जिल्ह्यात
महानगरपालिकेसह, नगर परिषद क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या
दिवशीच्या पहाटे ५
वाजेपर्यंत संचारबंदी लागू
** औरंगाबाद शहरात रुग्ण संख्या आणि गर्दीच्या ठिकाणी टाळेबंदी लावण्याचा
महापालिका प्रशासकाचा इशारा; परभणी जिल्ह्यात मात्र टाळेबंदी लावण्यास व्यापाऱ्यांसह उद्योजकांचा विरोध
आणि
** औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
एप्रिल अखेरपर्यंत पदव्युत्तर परीक्षा
****
कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात
विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी खंडीत करु नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत बोलत होते.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास
स्थगित करून विजेच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी केली. त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक घेत चर्चा
करण्याची सरकारची तयारी असल्याचं पवार यांनी सांगितलं. वीज जोडणी
खंडीत करण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार
मानले.
****
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी
वीज देण्याला शासनाचं प्राधान्य असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते काल विधानभवनात करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
संपूर्ण देश टाळेबंदीत असताना, शेतकरी बांधव मात्र
कर्तव्यावर होते, इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात
काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या मागे सरकार ठामपणे उभं राहील,
असं आश्वासन त्यांनी दिलं. महाकृषी ऊर्जा अभियानाची
प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
****
राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार
प्रस्तावाच्या चर्चेला काल विधानसभेत सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
या चर्चेत सहभागी होत, सरकार फेसबुक लाईव्हमध्ये मग्न असल्याची
टीका केली. राज्य सरकारचा 'माझे कुटुंब
माझी जबाबदारी' ते 'मी जबाबदार'
हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा असून, शिक्षणक्षेत्रात
सरकारचा वाढता हस्तक्षेप, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण, यावर भाष्य करत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली
असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात कोविडचा प्रभाव एवढा का
वाढतो आहे, असा सवालही त्यांनी केला. कोविड
प्रतिबंधक टूल किट आणि धानखरेदीत घोटाळा झाल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी
चर्चेत सहभागी होत, कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन करुन अनेक महत्वाची कामं
केल्याचं नमूद केलं.
शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी, कोविड पार्श्वभूमीवर राज्य
सरकारनं अभिमानास्पद कामगिरी केल्याचं मत व्यक्त केलं. सीमावासीयांवर
सातत्यानं अन्याय होत असल्यामुळे हा भाग केंद्रशासित करावा, अशी
मागणी त्यांनी केली.
****
राज्यात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत
हुक्का पार्लर सुरू असेल, तिथल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात
येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
विधान परिषदेत सदस्य रवींद्र फाटक तसंच महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या
तासात विचारलेल्या प्रश्नाला, ते उत्तर देत होते.
****
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची
कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर
देताना ते बोलत होते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत,
२१७ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १०३ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली.
कृषी विभागातली रिक्त पदं लवकरात
लवकर भरण्यात येतील, असं कृषीमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गात, एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर
असून, त्यापैकी १८ हजार ६२२ पदं भरलेली आहेत तर आठ हजार ८८० पदं
रिक्त आहेत.
****
राज्यात अवैध रेती उत्खननाला प्रतिबंध
करण्यासाठी, तहसील तसंच उपविभागीय स्तरावर भरारी पथकांमार्फत मोठ्या प्रमाणात दंडात्मक
कारवाई करण्यात आली आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी
विधान परिषदेत ही माहिती दिली. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी
धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं असून, त्याबाबत महसूल मंत्री,
गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची आपल्या दालनात बैठक घेणार असल्याचं
सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितलं.
****
लातूर तालुक्यातील रायवाडी इथं गावकऱ्यांनी
बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाने हटवला आहे. महाराजांचा पुतळा पूर्ववत
उभारावा, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधान
सभेत केली. अवैध बांधकामे आणि बेसुमार वाळू उपशावर कारवाई होत
नाही, मात्र महाराजांचा पुतळा काढण्यात तत्परता दाखवली जाते,
अशी टीका निलंगेकर यांनी केली.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या
दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरचे
सहव्याधी असलेले रुग्ण तसंच ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयात
ही लस मोफत मिळणार असून, खासगी रुग्णालयात लसीची किंमत २५० रुपये
प्रति डोस द्यावी लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी ३५ हजार कोटी रुपये राखून ठेवले
आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील,
याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं. या निधीतून ७५
कोटी लोकसंख्येचं म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करता येणं शक्य
आहे. असं असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत
आहे?, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे.
****
औरंगाबाद-अहमदनगर या १२० किलोमीटर
अंतराच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
या अंतरात पर्यटन स्थळं, व्यापारी पेठा तसंच महत्त्वाच्या
बाजारपेठा किती आहेत, औरंगाबाद पुणे-नगर
साठी बसवाहतुकीतून किती उत्पन्न मिळतं, या मार्गावर मालवाहतुक
किती आहे, या बाबी तपासल्या जाणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे औरंगाबाद रेल्वेने थेट पुण्याशी जोडलं जाणार असून,
हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन
मार्च १९३० साली नाशिक इथं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. दरवर्षी दोन मार्च रोजी
या सत्याग्रहाचं स्मरण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं. कालही या मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम झाले. कोविड
प्रादुर्भावामुळे छोट्या स्वरूपात आणि आरोग्य नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमांना
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली.
****
राज्यात काल सात हजार ८६३ नव्या
कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ६९
हजार ३३० झाली आहे. काल ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५२ हजार २३८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४१
शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार ३३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले.
राज्यात आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० रुग्ण, कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ८९ शतांश
टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७९ हजार ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ७६५ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली, तर आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर, जालना
तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३२५ रुग्ण आढळले. जालना
जिल्ह्यात १२२, नांदेड
९३, हिंगोली ५६, बीड आणि लातूर
प्रत्येकी ४९, उस्मानाबाद ४०, तर परभणी
जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यात लातूर शहर महानगरपालिकेसह, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर नगर परिषद क्षेत्रात,
कालपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली
आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले.
या आदेशातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहतुक, औषधी दुकानं, रुग्णालयं यांना आदेश लागू राहणार नाही, असं या आदेशात
म्हटलं आहे
दरम्यान, यंदा कोविड प्रादुर्भावामुळे
लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा,
पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. देवस्थानच्या प्रशासक
तथा धर्मादाय उपायुक्त यू.एस.पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त
ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र होणार आहेत. शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक
तसंच माळी समाजाचा पुष्पाभिषेक फक्त पाच जणांच्या उपस्थितीत होईल.
दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात
येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी दोन मानकऱ्यांच्या
हस्ते या काठ्यांचे गाभाऱ्यातच पूजन होईल. यात्रा कालावधीत केले
जाणारे भजन-कीर्तन तसंच काकडा फक्त ११ लोकांच्या उपस्थितीत केला
जाईल. शिवरात्री निमित्त भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा
निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
औरंगाबाद शहारत कोरोना विषाणू बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागात रुग्ण वाढले आहेत, जिथे गर्दी होत असेल, अशा भागात टाळेबंदी लावण्याचा इशारा महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिला आहे. नागरीकांकडून नियमांचं पालन होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यास
व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
काल झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोविडचा
वाढता प्रादूर्भाव पाहता किमान सात दिवसांची टाळेबंदी करावी लागेल, असं नमूद केलं, मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण टाळेबंदीला
विरोध दर्शवत रात्रीच्या संचारबंदीला सहमती दर्शविली आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत यशस्वीपणे पार पाडाव्यात, असं कुलगुरु डॉ.
प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद तसंच
उस्मानाबाद इथल्या विभागप्रमुखांची काल बैठक झाली, त्यावेळी ते
बोलत होते. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ऑनलाईन,
ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा यशस्वीपणे पार
पाडाव्यात, असं कुलगुरु म्हणाले.
दरम्यान, कुलगुरु डॉ. येवले यांनी काल औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन सपत्निक कोविड
लस घेतली. उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले तसंच निवृत्त
शिक्षक, कर्मचारी, प्राचार्य आणि ज्येष्ठ
नागरिकांनी कोविड लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता
अवचार यांनीही छावणीतील आरोग्य केंद्रात जाऊन काल कोविड लस घेतली.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा
तालुक्यातल्या शिवणी जामगा इथं जातीय तणावातून हल्ला झालेल्या कुटुंबीयांची केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल भेट घेतली. जातीय तणावातून निर्माण
होणाऱ्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही, असे हल्ले हे
मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून, यात कोणाचा तरी जीव
जाणं ही प्रवृत्ती गंभीर असल्याचं मत, आठवले यांनी यावेळी
व्यक्त केलं.
****
कॅन किड्स किड्स कॅन या स्वयंसेवी
संस्थेच्या बाल कर्करोगविरोधी जनजागृती अभियानात, राज्य परिवहन महामंडळ सहभागी झालं आहे.
कॅनकिड्स किड्सकॅन ही संस्था संपूर्ण देशभरात बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे
कार्य करते. या संस्थेचे बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे फलक एसटी
बसेसवर निःशुल्क लावण्यात आले आहेत. सकारात्मक सामाजिक बदलांमध्ये
एसटी महामंडळ कृतिशील सहभाग नोंदवत आहे.
****
परभणी जिल्ह्यातलं जांभूळ बेट हे
पर्यटन स्थळ व्हावं म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे. पालम तालुक्यात जांभूळबेटाला
भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जांभूळ बेटाचा सर्वांगीण
विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेणार असल्याचंही टाकसाळे यांनी सांगितलं.
या भागातल्या काटेरी बाभळी काढून त्या ठिकाणी फळझाडांची लागवड करणार
असल्याचं टाकसाळे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिशोर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक
रणजीत कासले याला, वीस हजार रुपायांच्या लाचेची मागणी केल्याचं सिद्ध झाल्यानं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. पोस्को कायद्यांतर्गत
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कासले यांनं ही लाच मागितली होती.
तर दुसऱ्या एका घटनेत देवगाव रंगारी
पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक शैलेश जोगदंड यांनी बळजबरीने २५ हजार रुपये लाच देणाऱ्या वाळू माफियाला पकडून दिलं. बळेगावात बेकायदा वाळू उपसा
आणि वाहतूक करण्याचं काम गोकुळ सुर्यवंशी हा करत होता. देवगाव
रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची वाहतूक करु द्यावी, यासाठी त्यानं पोलिस उपनिरीक्षक जोगदंड यांना लाच देण्याचा प्रयत्न केला.
जोदगंड यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर,
सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव ग्रामीण रुग्णालयातला
कनिष्ट लिपिक प्रमोद सीतापे याला तीन हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत सेवा
अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या मंजुर झालेल्या लाभाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमध्ये
कांद्याचे भाव गेल्या काही दिवसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांनी घसरले आहेत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी
चिंतेत आहे. काल लाल कांद्याला किमान एक हजार रुपये ते कमाल सरासरी
२५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. पांढऱ्या कांद्याला किमान ८६०
रुपये तर कमाल सरासरी बाराशे ५० रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
//********//
No comments:
Post a Comment