Friday, 5 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 March 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०

****

** राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर; आर्थिक विकास दरात आठ टक्के घसरणीची शक्यता

** शासनाच्या नाकर्त्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

** राज्य महिला आयोगाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं येत्या महिला दिनी उद्घाटन

आणि

** औरंगाबाद इथं आज चार कोविड बाधितांचा मृत्यू; तर जालन्यात नवे २०२ रुग्ण

****

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. त्यात २०२०-२१ च्या अंदाजानुसार राज्याच्या आर्थिक विकास दरात आठ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात यंदा ११ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र उद्योग क्षेत्रात ११ पूर्णांक ३ दशांश टक्के घट होण्याची तर सेवा क्षेत्रात ९ टक्के घट होण्याची शक्यता अपेक्षित आहे. 

जून ते ऑक्टेबर-२०२० या कालावधीत राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण ४ हजार ३७४ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ४ जानेवारी २०२१ पर्यंत राज्यातल्या १ कोटी २ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ९ हजार ४९६ कोटी ३८ लाख रुपये जमा झाले, असं या अहवालात नमूद आहे.

सन-२०२० मधे ऑक्टोबरपर्यंत राज्यात ३७ हजार ८८७ कोटी रुपये प्रस्तावित गुंतवणुकीच्या २४७ प्रकल्पांची नोंदणी झाली. तर सप्टेंबरपर्यंत राज्यात थेट परदेशी गुंतवणूक २७ हजार १४३ कोटी रुपये होती. एप्रिल २००० पासून राज्यातली थेट परदेशी गुंतवणूक ८ लाख १८ हजार ५२२ कोटी रुपये असून, हे प्रमाण देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या २७ पूर्णांक ७ दशांश टक्के असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फटका इतर मागासवर्ग - ओबीसी बांधवाना बसू नये, ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता, तसंच दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली जाईल, विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक घेऊन, पुढची कायदेशीर व्यूहरचना निश्चित केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

शासनाच्या नाकर्त्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर परिणाम झाला असून हे आरक्षण धोक्यात आलं असल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारने पंधरा महिन्यांच्या काळात आयोग नेमून, इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येचा अभ्यास करून, त्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण निश्चित केलं असतं, तर आज आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, असं दरेकर म्हणाले.

****

राज्यभरात विविध पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पीक विमा गोळा करूनही प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळत असल्याप्रकरणी सर्वपक्षीय सदस्यांनी आज सरकारला चांगलंच धारेवर धरलं. याबाबत २०१९ प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळावा अशी मागणी तर विरोधकांनी केली. यासाठी लवकरच स्वतंत्र धोरण ठरवलं जात असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं. 

****

महाराष्ट्र पालिका सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झालं. या विधेयकाद्वारे राज्य सरकार अमर्यादित अधिकार घेऊन निवडणूक पुढं ढकलू इच्छित असल्याचा आरोप करत विरोधकांनी या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला. मात्र, निवडणूक आयोग त्यांना हवं तेव्हा निर्णय घेऊन निवडणूक घेऊ शकतो, सध्या कोविड काळाच्या पार्श्वभूमीवर या सुधारणा केल्या असून, सरकार कोणतेही अमर्यादित अधिकार घेत नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांच्या खुलाशानंतर हे विधेयक कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झालं.

****

राज्यसरकार संवेदनशील आहे का असा सवाल, भाजपचे डॉ संजय कुटे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. परवा रात्री मुंबईत आझाद मैदानातल्या आंदोलकांवर अंधारात लाठीमार करणं, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक मुलींना जबरदस्तीने उपनगरी रेल्वेत बसवून पाठवून देणं, आदी घटनांचा उल्लेख करत, कुटे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही, मंत्री तसंच घटक पक्षांचे नेते कोविड नियम पाळत नाहीत, याकडे लक्ष वेधत सर्वत्र मनमानी चालू असल्याची टीका कुटे यांनी केली.

****

राज्यात इयत्ता दहावी तसंच बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान सभेत स्पष्ट केलं. या संदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ही माहिती दिली. दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

****

राज्य महिला आयोगाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं येत्या महिला दिनी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्यशासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाने राज्यातल्या प्रत्येक विभाग स्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार औरंगाबाद इथं ज्युबली पार्क चौकाजवळ हे विभागीय कार्यालय कार्यरत होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,  नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारीचं तत्काळ निवारण करण्यासाठी काम केलं जाईल.

*****

औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू झाला, यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात २६ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ६७० झाली असून एक हजार २८३ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४७  हजार ७४२ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २०२ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १६ हजार २३१ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ११९ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.

****

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं जाहीर केलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात ईज ऑफ लिव्हिंग राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात औरंगाबाद शहरानं ३४ वा क्रमांक पटकावला आहे. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नागरिकांच्या जीवन गुणवत्तेत शहरानं १३ वं स्थानं पटकावलं आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये औरंगाबाद ४७ व्या क्रमांकावर असून महापालिकेनं कार्यनिर्देशांकात ४७ वा क्रमांक पटकावला असल्याची माहिती पांडेय यांनी दिली. शहरातल्या नागरिकांच्या मदतीनं विकासकामांचा वेग असाच कायम राहिला तर पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला क्रमांक शहर पटकावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचं अभिनंदन केलं. औरंगाबाद शहरातल्या सर्व सेवांचा चांगला दर्जा राखू आणि आपलं शहर सुपर औरंगाबाद शहर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीची नवी योजना पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल.परंतू यंदा उन्हाळ्यात नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावू नये म्हणून उपाय योजना करण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी राबवण्यात आलेल्या श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला मराठवाडा आणि खानदेशातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या महिनाभरात राबवलेल्या अभियानात, देवगिरी प्रांत म्हणजे, मराठवाडा आणि खानदेशातल्या ११ जिल्ह्यातल्या ३३ लाख ६६ हजार ६०३ कुटूंबाशी संपर्क साधण्यात आला, या कुटुंबांनी एकूण ४५ कोटी सहा लाख २५ हजार ३०५ रुपये निधी समर्पण केल्याचं, आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. देवगिरी प्रांत अभियान प्रमुख संजय आप्पा बारगजे यांनी ही माहिती दिली. लातूर जिल्ह्यातल्या २ लाख ८९ हजार ८९ कुटुंबीयांकडून समर्पित झालेल्या ३ कोटी ३७ लाख ६१ हजार ४९३ रुपये निधीचाही यात समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला आहे.

****

क्रिकेट -

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात सात गडी गमावत २९४ धावा करुन, ८९ धावांची आघाडी घेतली आहे. ऋषभ पंतनं ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं १०१ धावा झळकावल्या. कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल शून्यावर बाद झाले, रोहित शर्माने ४९ तर अजिंक्य राहणेनं २७ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर  ६० तर अक्षर पटेल ११ धावांवर खेळत आहेत. 

//***************//

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...