Wednesday, 3 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

मागच्या भारतीय जनता पक्ष सरकारच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची समितीमार्फत चौकशी करणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही समिती ३१ मार्च पर्यंत जाहीर करण्यात येईल, आणि सहा महिन्यात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

राज्यात शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर निधी, अतिवृष्टी, बोंडअळी, गारपीट बाधित शेतकऱ्यांना मदत, यासंदर्भात विरोधी पक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन मिळालं नसल्याकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सरकारनं यासंदर्भात उत्तर द्यावं, शेतीपिकांचं सर्वेक्षण कधी करणार ते सागावं, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राज्य सरकारनं यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली.

****

दरम्यान, विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शनावरच्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी या चर्चेत सहभागी होत, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यात सरकारला यश आल्याचं नमूद केलं. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, शिवभोजन, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना केलेली मदत, आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना, या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची महामारी असल्याची टीका केली. सरकारकडे कोणत्याच प्रकारचा कृती आराखडा नसल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चर्चेला उत्तर देणार आहेत.     

****

केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे शिक्षणाला रोजगारक्षम बनवण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदींसंदर्भात आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रानंतर शिक्षण, कौशल्य, संशोधनावर भर दिला गेला असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. आत्नमिर्भर भारताच्या निर्माणासाठी देशातल्या युवकांमध्ये आत्मविश्वास आवश्यक असून, जो त्यांचं शिक्षण, ज्ञान, आणि कौशल्यावर आधारित असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. 

****

केंद्र सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सरकारनं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सर्व सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करता येतील, तसंच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश आपापल्या स्तरात कोविड लसीचे डोस साठवून ठेऊ शकत नाही, असंही केंद्र सरकारनं या पत्रकात स्पष्ट केलं आहे. 

****

देशभरातल्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांपैकी सध्या एक पूर्णांक ५१ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. देशाचा कोविड-१९ मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्के झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यात ४० हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण असून, देशाच्या तुलनेत ही टक्केवारी ७५ टक्के आहे. गेल्या दोन आठवड्यात नव्याने बाधित होणाऱ्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ झाली असून, देशभरात सध्या एक लाख ६८ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

आपले व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी छतावरील सौरउर्जा प्रणालीचा वापर करण्याचं आणि त्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या कर्जाचा लाभ घेण्याचं आवाहन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये छतावरील सौर प्रणालीच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. छतावरील सौरप्रणाली बसवण्यासाठी बिगर मानांकित उद्योगांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी, जागतिक बँकेसोबत एका कर्ज हमी कार्यक्रमासंदर्भात काम सुरु असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि अश्विनी पोनाप्पा यांच्या जोडीनं इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या एका मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एक सिक्की रेड्डी यांच्या जोडीला ब्रिटनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

****

इजिप्त मध्ये सुरु असलेल्या आयएसएफ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनिषा कार हिनं उत्तम कामगिरी करत, महिला ट्रप प्रकारात सातवं स्थान मिळवलं. महिला ट्रप प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात तिला केवळ एक गुण कमी पडला. 

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.

//******//

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...