Tuesday, 2 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.03.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २ मार्च २०२१

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत, राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर, चर्चा होणार आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधकांचं वीज दरवाढीविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन सुरु आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

****

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानाची आढावा बैठक झाली. ही योजना अधिक बळकट करण्यासाठी, आणि आणखी तीन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन २०३५ पर्यंत सकल नोंदणी गुणोत्तर ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी योजना आखण्यास त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना सांगितलं. नोकरीचं कौशल्य असलेले सात कोटी विद्यार्थी आपल्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून उत्तीर्ण व्हायला हवेत, असं ते म्हणाले. शिक्षणामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळाली पाहिजे यावर निशंक यांनी भर दिला.

****

केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाच्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन योजनेच्या माध्यमातून; महाराष्ट्र पर्यटन संचालनालय; मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहे. याद्वारे पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरू उमेदवारांना; प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड तयार केले जाणार आहेत. राज्यस्तरावर तसंच विविध पर्यटन स्थळांवर टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी या उमेदवारांना मिळणार आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरी इथल्या महावितरण उपकेंद्रातला वरिष्ठ तंत्रज्ञ राजू घाडगे याला काल ११ हजार रुपये लाच घेताना, रंगेहाथ अटक करण्यात आली. कृषी पंपाचं कोटेशन मंजूर करून देण्यासाठी त्यानं स्वत:साठी ५ हजार तर इतरांसाठी १४ हजार अशी एकोणीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

****

परभणी जिल्ह्यात सौरपंपाच्या अनुदान अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी एक हजार रुपये लाच घेणारा महावितरण कंपनीच्या सहय्यक अभियंता सुधाकर जाधव याच्या सह अन्य एका कंत्राटी कर्मचाऱ्याला काल पकडण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

****

परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या मौजे तिडी पिंपळगाव शिवारात काही कोंबड्या बर्ड फ्ल्यूने दगावल्या होत्या, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तिडी पिंपळगाव इथल्या बाधित कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीनं नष्ट करण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...