Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
04 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०३ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
राज्य विधी मंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विधानसभेत राम मंदिर समर्पण निधी
गोळा करण्यावरुन गदारोळ झाला. या सर्व गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित
करण्यात आलं. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी
घेणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपती राजवट लागली तर
रडू नका तसंच घटनेची पायमल्ली करु नका
असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, जळगाव शहरातील शासकीय
आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना
पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात
ठेवला. पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
देशात कोविड आजाराचे रुग्ण बरे
होण्याचा दर ९७ पूर्णांक ०३ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत १४ हजाराहून
अधिक रुग्ण कोविड संसर्ग मुक्त झाले असून आतापर्यंत १ कोटी ८ लाखांहून अधिक रुग्ण
कोविड संसर्ग मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १७ हजार ४०७ रुग्णांचा अहवाल
बाधित आला असून, ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोविडबाधितांची एकूण संख्या १ कोटी
११ लाख ५६ हजाराहून अधिक झाली असून
आतापर्यंत १ लाख ५७ हजारावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १ लाख ७३ हजार
४१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, देशात आतापर्यंत १ कोटी
६६ लाखांहून अधिक नागरीकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. गेल्या २४
तासांत ९४ हजार ४५२ नागरीकांना कोविड प्रतिबंधक लस टोचण्यात आली. देशात आतापर्यंत
एकूण २१ कोटी ९१ लाख नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली असल्याची माहिती
केंद्रीय मंत्रालयानं दिली आहे.
****
महसूल विभागाशी संबंधित
ई-फेरफार प्रणालीत राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा
समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यानं विभागात आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार
नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेत जमिनीवर बोजा लावणे अशी
कामं इ-फेरफार अंतर्गत करण्यात आली आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचे
माजी आमदार माणिकराव गावंडे यांच आज पहाटे निधन झालं. त्यांच्यावर बोथाकाजी या
त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावंडे हे १९७२ ते १९७८ तसंच १९८५ ते
१९८९ या कालावधीत खामगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते.
त्यांनी राज्य निवड मंडळाचे अध्यक्षपद देखील भुषवलं होतं.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू
असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि अखेरचा सामना
अहमदाबाद इथं खेळला जात आहे. इंग्लडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार इंग्लड संघाच्या चार बाद ८८ धावा झाल्या आहेत.
****
सोलापूर इथं विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंतोपरी
प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं विमानतळ सल्लागार समितीचे चेअरमन आणि खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी
म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं विमानतळ सल्लागार समितीत झालेल्या
बैठकीत बोलत होते. सोलापूरची विमानसेवा सुरु झाल्यास शहराचा चौफेर
विकास होण्यास मदत होणार असून यासंबंधित सूचना महास्वामी यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्याची एकूण
कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची संख्या ५१ हजार २८७ झाली आहे. आतापर्यंत ४७ हजार ५६४
रुग्ण बरे होवून घरी परतले असून सध्या २ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २७८ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद इथल्या ‘प्राध्यापक प्रल्हाद
लुलेकर प्रतिष्ठान’च्या वतीने या वर्षापासून मराठी
साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ दिला
जाणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्या ‘समकालीन भारत: जातिअंताची दिशा’ या वैचारिक ग्रंथाला
घोषित करण्यात आला आहे. १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप
आहे.
****
हिंगोली इथं दहा ते पंधरा
वर्षापासून नगर पालिकेची थकबाकी थकवणाऱ्या शहरातल्या तीन शाळांना काल सील ठोकण्यात
आलं. कारवाई करण्यात आलेल्या शाळांमध्ये शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेची जुनी
मल्टीपर्पज हायस्कुल तसंच जिल्हा परिषद कन्या शाळेचा समावेश आहे. या तीनही
शाळांकडे एकूण २१ लाख २४ हजार ७४४ रुपये कर थकबाकी आहे.
****
जम्मू कश्मीरच्या पुलवामा
जिल्ह्यात अवंतीपोरा या भागातील सीर पस्तूना इथं राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस
दलानं संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनच्या या दहशतवादी
संघटनेचा अड्डा उद्धवस्त केला आहे. या कारवाईत दहशतवाद्यांच्या लपण्याचं ठिकाण
उद्धवस्त करुन या ठिकाणाहून संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment