Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
·
३३ कोटी
वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या समितीमार्फत तर नागपूर इथल्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची विशेष पथका मार्फत चौकशी.
·
जळगावच्या शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून
नृत्य करायला भाग पाडल्याच्या घटनेच्या तपासासाठी चार जणांची समिती स्थापन.
· राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार दर्शक ठराव
आवाजी मतदानानं मंजूर, विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रतिवाद.
·
मराठा
आरक्षण प्रकरणी कायदेशीर पेचात केंद्र सरकारच्या सहकार्याची गरज - अशोक चव्हाण.
· राज्यात नऊ हजार ८५५ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ८७१ बाधित तर पंधरा जणांचा मृत्यू.
आणि
·
भारत आणि
इंग्लंड यांच्यात आजपासून चौथा क्रिकेट कसोटी सामना.
****
गेल्या सरकारच्या काळात झालेल्या ३३ कोटी
वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार
आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ३१ मार्चपर्यंत
ही समिती स्थापन होऊन समितीला प्रथम चार महिन्यांची मुदत देण्यात येईल, त्यात आवश्यकतेनुसार दोन महिन्यांची मुदतवाढ
देण्यात येईल. एकूण सहा महिन्यात याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर केला जाईल,
असं पवार यांनी सांगितलं. या मोहिमे
अंतर्गत वनविभागाकडून २८ कोटी २७ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२० अखेर त्यापैकी सुमारे ७५
टक्क्यांपेक्षा अधिक झाडं जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत असल्याची माहिती
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
****
नागपूर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता
प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल,
आणि या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी
आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं
आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त या संस्थेमार्फत जे कार्यक्रम घेण्यात आले
त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी
पथकामार्फत केली जाईल, असं
मुंडे यांनी सांगितलं.
****
जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला
वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याच्या घटनेचा तपास
करण्यासाठी चार जणांची समिती नेमण्यात आली असून ही समिती येत्या दोन दिवसात अहवाल
देईल, असं गृहमंत्री अनिल
देशमुख यांनी काल विधानसभेत सांगितलं. त्यानुसार उपजिल्हाधिकारप तृप्ती धोडमिसे
यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कांचन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे आणि मानसोपचार तज्ज्ञ कांचन नारखेडे यांची
समिती चौकशी करत आहे. वसतीगृहात असलेल्या एकूण १८ मुली पैकी ५ मुलींना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने
निरीक्षणगृहात हलवण्यात आलं आहे. तर एका मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं
आहे. सध्या वसतिगृहात १२ मुली आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार
दर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर झाला. या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा जोरदार प्रतिवाद केला. चर्चेत विरोधकांनी
उपस्थित केलेल्या मुद्यांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. कोरोनाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी केलेली टीका चुकीची असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या
आणि कोरोनामुळं झालेल्या मृत्यूंची संख्या १०० टक्के खरी असून राज्य सरकारनं कुठलीही
आकडेवारी लपवलेली नाही. राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे
रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. स्थलांतरित
मजुरांसाठी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचा गरीबांना कसा फायदा झाला, याची उजळणी त्यांनी केली. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करुन राज्यातल्या परिस्थितीवर
टीका करणाऱ्यांनी विचार करावा, असं ते म्हणाले. कोरोना लढ्यासाठी
मदत देताना राज्याऐवजी पीएम केअर फंडाला निधी देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर
त्यांनी टीका केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान
करण्यासाठी केंद्र सरकारकडून विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच
वेगळा विदर्भ करण्याच्या मागणीचा विचार विरोधी पक्षीयांनी सोडून
द्यावा, असा टोलाही त्यांनी हाणला. शार्जिल उस्मानीला सरकार अटक
करणारच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं
मदत करावी असंही ते म्हणाले.
कर्नाटकातल्या मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी
मदत करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या मुद्यावर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करायला हवा या मागणीचा त्यांना पुनरुच्चार केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर हरकतीचा मुद्दा मांडू न दिल्याबद्दल
विरोधकांनी सभात्याग केला. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, चौकातलं भाषण आणि सदनातलं भाषण
यातला फरक मुख्यमंत्र्यांना अद्याप लक्षात आला नसल्याची टीका करत, मुख्यमंत्र्याच्या या भाषणात महाराष्ट्र कुठेही नसल्याचं सांगितलं.
****
राज्यातल्या गृहनिर्माण संस्थांचे मानीव
अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून या
प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यात आली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी
विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. जानेवारी अखेरपर्यंत
मानिव अभिहस्तांतरणाचे १४ हजार ८२२ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १३ हजार ६५५ अर्जांवर कार्यवाही करुन
प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. उर्वरित एक हजार १६७ अर्जांवर कार्यवाही सुरु
असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी
राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल. परंतु या प्रकरणात काही संवैधानिक तसंच
कायदेशीर पेच असून, त्यासाठी
केंद्र सरकारनं सहकार्य
करण्याची गरज असल्याचं, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम
मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाबाबत विधान परिषदेत सदस्य
शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या
प्रकरणाबाबत येत्या ८ मार्चपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. केंद्र सरकारने
त्यापूर्वी काही मुद्यांवर स्पष्ट भूमिका घेतली, तर मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतर राज्यांच्या
आरक्षणांनाही लाभ मिळेल, असं
चव्हाण म्हणाले.
****
राज्यात शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर निधी, अतिवृष्टी, बोंडअळी, गारपीट बाधित
शेतकऱ्यांना मदत, यासंदर्भात
विरोधी पक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना
अद्याप प्रोत्साहन निधी मिळाला नसल्याकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सरकारनं यासंदर्भात उत्तर
द्यावं, शेतीपिकांचं सर्वेक्षण
कधी करणार ते सांगावं, असं ते
म्हणाले. राज्य सरकारनं यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
झिरवाळ यांनी यावेळी केली.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय
सामंत यांची विधान भवनात भेट घेऊन परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क परत
देण्याची मागणी केली. नुकत्याच झालेल्या विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीतही चौगुले
यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं होतं. कुलगुरूंनी याबाबत शासनाच्या निर्देशानुसार
कार्यवाही करण्यात येईल, असं उत्तर दिलं होतं. ज्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत, त्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा
शुल्क परत करण्याबाबत राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देशित
करावं, अशी मागणी चौगुले यांनी
या निवेदनातून केली आहे.
****
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण लवकरात लवकर
करण्यात यावं, असं आमदार
अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. पैठण इथल्या
संतपीठाच्या कामास गती देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. औरंगाबाद इथलं
क्रिडा विद्यापीठ, विमानतळ
विस्तारीकरण या मुद्यांकडे लक्ष वेधत, दानवे यांनी, औरंगाबाद
शहरात शिवाजीनगर इथल्या नियोजित भुयारी मार्गासाठी राज्यशासनानं आपला वाटा तत्काळ
उचलावा अशी मागणी केली.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवावी,
तसंच औरंगाबाद शहरातील विस्तारित
मालमत्ताधारकांना लवकरात लवकर पीआर कार्ड मिळावेत, अशी मागणीही आमदार दानवे यांनी काल विधान परिषदेत
केली.
****
महाराष्ट्रातील जैव विविधता टिकविण्यासाठी
आपण सामूहिक प्रयत्न करावेत आणि वन्यजीवांचं संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल
राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जागतिक वन्यजीव दिनाचं
औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’
आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या या पक्षावरील लघुपटाचं प्रदर्शन
आणि पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचं अनावरण पवार यांच्या
हस्ते काल मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, जागतिक वन्यजीव दिनाच्या अनुषंगानं नांदेड जिल्हा
परिषदेच्या परिसरातल्या वृक्षांवर पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था काल करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत
जिल्हा परिषद परिसरतल्या झाडांवर पक्ष्यांसाठी मातीच्या परळांमध्ये पाणी ठेवण्यात
आलं.
****
राज्यात काल नऊ हजार ८५५ नव्या कोविड
रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ७९ हजार १८५ झाली आहे. काल ४२
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार २८० झाली असून
मृत्यूदर दोन पूर्णांक ४०
शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार ५५९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले.
राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविडमुक्तीचा दर ९३
पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ८२ हजार ३४३ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली तर पंधरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सात, बीड
जिल्ह्यातल्या चार, जालना
जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर
आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३७१ रुग्ण आढळले. जालना
जिल्ह्यात १९२, नांदेड ६९,
बीड ८०, लातूर ४८, परभणी ५९, उस्मानाबाद १६ तर हिंगोली जिल्ह्यात
३६ नवे रुग्ण आढळून आले.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल तिसऱ्या दिवशी एकूण २९ उमेदवारी
अर्ज दाखल झाले. यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा सेवा सहकारी
सोसायटी मतदार संघातून, माजी
खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी बिलोली सेवा सहकारी
सोसायटी तर बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी किनवट सेवा सहकारी सोसायटी
मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
कर्णबधिरता आणि श्रवणशक्तीचे नुकसान
टाळण्यासाठी तसंच यासंदर्भात जनजागृती वाढवण्यासाठी ३ मार्च हा दिवस जगभरात जागतिक
श्रवण दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त काल नांदेड जिल्हा परिषदेत सुनो
प्रकल्पाच्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांच्या हस्ते करण्यात आलं. सुनो फाऊंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त
विद्यमाने जिल्हाभरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून लहान मुलांमधला बहिरेपणा
ओळखणं, तपासणी आणि उपचार
याविषयी जनजागृती केली जाणार असल्याचं वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितलं.
****
जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने लातूर
इथल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना प्रकल्प आणि पुरणमल लाहोटी शासकीय
तंत्रनिकेतनच्या वतीनं वाचा उपचार तज्ञ सपना अशोक डाके, यांनी श्रवण इंद्रियाकडे होणारे दुर्लक्ष आणि
प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मार्गदर्शन केलं. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन
केंद्रात २५ दिव्यांगांची मोफत तपासणी करण्यात आली.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या
चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि अखेरचा सामना आजपासून अहमदाबाद
इथं सुरू होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन एक
अशा फरकानं भारत आघाडीवर आहे. दरम्यान, या मालिकेनंतर दोन्ही संघात पाच टी ट्वेंटी सामन्यांची तर तीन एकदिवसीय
सामन्यांची मालिका होणार आहे. टी ट्वेंटी मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी
मैदानावर तर एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात राज्य क्रिकेट संघटनेच्या
मैदानावर खेळवली जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती स्वच्छ
आणि सुंदर व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला विटेकर आणि मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझा गाव सुंदर गाव
उपक्रम राबवण्यात येत आहे. सोनपेठ तालुक्यात विटा खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये काल
हा उपक्रम राबवण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा तसंच स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड,
गोदावरी नदीकाठावर घाटाचं उद्घाटन
तसंच जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी यावेळी करण्यात आली.
****
हिंगोली इथं दहा ते पंधरा वर्षापासून नगर
पालिकेची थकबाकी थकवणाऱ्या शहरातल्या तीन शाळांना काल सील ठोकण्यात आलं. कारवाई
करण्यात आलेल्या शाळांमध्ये शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेची जुनी मल्टीपर्पज हायस्कुल
तसंच जिल्हा परिषद कन्या शाळेचा समावेश आहे. या तीनही शाळांकडे एकूण २१ लाख २४
हजार ७४४ रुपये कर थकबाकी आहे.
****
औरंगाबाद इथल्या प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर
प्रतिष्ठान’च्या वतीने या
वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ दिला जाणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार
डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्या ‘समकालीन भारत : जातिअंताची दिशा’ या वैचारिक ग्रंथाला घोषित करण्यात आला आहे. १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी इथं एका संगणक अभियंत्यांची सुमारे
दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. मंगळवारी हा प्रकार घडला. श्रीनिवास गुट्टे
असं या संगणक अभियंत्यांचं नाव असून, मंगळवारी सकाळी त्यांना कंपनीतल्या वरिष्ठांच्या नावे एक ई मेल आला. या
मेलमध्ये सांगितल्यानुसार गुट्टे यांनी एका व्यक्तीला २ लाख एक हजार ३०० रुपये
पाठवले. मात्र वरिष्ठांशी फोनवरून बोलल्यावर त्यांनी असा काही मेल केलाच नसल्याचं
स्पष्ट झालं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक रामेश्वर तट हे
अधिक तपास करत आहेत.
****
No comments:
Post a Comment