Thursday, 4 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.03.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक ४ मार्च २०२१

****

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपोरा या भागातील सीर पस्तूना इथं राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलानं संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त केला आहे. या कारवाईत दहशतवाद्यांच्या लपण्याचं ठिकाण उद्धवस्त करुन या ठिकाणाहून संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण ३७१ रुग्णांना कोविडची लागण झाली आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ५१ हजार २८७ झाली आहे. आतापर्यंत ४७ हजार ५६४ रुग्ण बरे होवून घरी परतले असून सध्या २ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २७८ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

****

औरंगाबाद इथल्या ‘प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान’च्या वतीने या वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ दिला जाणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्या ‘समकालीन भारत : जातीअंताची दिशा’ या वैचारिक ग्रंथाला घोषित करण्यात आला आहे. १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

हिंगोली इथं दहा ते पंधरा वर्षापासून नगर पालिकेची थकबाकी थकवणाऱ्या शहरातल्या तीन शाळांना काल सील ठोकण्यात आलं. कारवाई करण्यात आलेल्या शाळांमध्ये शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेची जुनी मल्टीपर्पज हायस्कुल तसंच जिल्हा परिषद कन्या शाळेचा समावेश आहे. या तीनही शाळांकडे एकूण २१ लाख २४ हजार ७४४ रुपये कर थकबाकी आहे.

****

जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याच्या घटनेचा तपास करण्यासाठी चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या दोन दिवसात अहवाल देईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत सांगितलं.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबाद इथं खेळला जात आहे. इंग्लडच्या संघान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार इंग्लड संघाच्या ३ बाद ३७ धावा झाल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...