Monday, 23 October 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.10.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 October 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      मराठा आरक्षणाबाबत घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊ-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार.

·      दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या;शिर्डीचं साईमंदिर तसंच नागपूरच्या दीक्षाभूमीवर नागरिकांची गर्दी.

·      भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचं आज निधन.

आणि

·      पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत बारा पदके जिंकून भारतीय खेळाडूंच्या विजयी अभियानाला दणदणीत प्रारंभ. 

****

मराठा आरक्षणाबाबत घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली असून आपण त्यांच्या भूमिकेसोबत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठीची पद्धती निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बिहारमध्ये या जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.  

****

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायलाच हवं, या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. यानंतर कोणतीही मुदत न देता जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर २८ ऑक्टोबरपासून गावागावात साखळी उपोषणही केलं जाणार आहे. त्यासोबतच नेत्यांना गावबंदी करण्याची तयारी या आंदोलकांनी केली आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यावर कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला घटनात्मक पद्धतीने हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण मिळाले पाहिजे असं म्हटलं आहे. केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी करू नका, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. आरक्षण हिंदू मराठा म्हणून आणि ५० टक्क्यांच्या आतच मिळायला हवं, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

****

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, ओबीसी समाजाच्या विकासाकरिता मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे निधी खर्च करावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचं पत्रक एका शिष्टमंडळानं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सादर केलं.

****

धनगर समाजाला अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.

****

अंमली पदार्थ प्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा इथल्या एका कारखान्यावर मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं आज कारवाई केली. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचं साहित्य जप्त केल्याची माहिती सध्या समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या मोठ्या कारवाईनंतर अंमली पदार्थ प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई झाली आहे.

****

अश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमीचा सण उद्या साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या या दसरा सणासाठी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, सोने-चांदीची आभुषणं आणि कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा, फुलून गेल्या आहेत.

आज नवरात्रोत्सवाचीही सांगता होत आहे. यानिमित्तानं विविध ठिकाणची देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या आणि दुर्गुणावर सद्गुणाच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्य, न्याय, करुणा आणि धैर्य या मूल्यांना आत्मसात करण्याचा आणि जपण्याचा हा सण सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

****

उद्याच्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथं दीक्षाभूमीवर अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते आज पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यंदा दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यावर्षी २५ लाखाच्या वर अनुयायी येण्याची शक्यता असून श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो धम्मचक्र हे यंदाच्या धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असल्याचं, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितलं.

****

शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आजपासून गुरुवारपर्यंत साईबाबांचा १०५ वा पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्‍या हस्‍ते या सोहळ्याचा प्रारंभ करण्‍यात आला. दरम्यान, उद्या विजयादशमीला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार असल्याचं, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं आहे.  

****

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बेदी यांनी १९६६ ते १९७९ दरम्यानच्या क्रिकेट कारकिर्दीत ६७ कसोटी सामन्यात २६६ तर १० एकदिवसीय सामन्यात सात बळी घेतले. २२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं. बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा आणि युवककल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या पॅरा एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बारा पदके जिंकून आपलं विजयी अभियान धडाक्यात सुरू केलं आहे. यामध्ये पाच सुवर्ण, पाच रौप्य तर दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. नेमबाजीत अवनी लेखरा हिने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तर ५० मीटर मिक्स पिस्तुल प्रकारात १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवाल याने रौप्यपदक पटकावलं.

उंच उडीच्या टी - फोर्टी सेवन प्रकारात भारताच्या निशादकुमारनं सुवर्णपदक पटकावलं.  तर टी - सिक्टी थ्री प्रकारातली तिन्ही पदकं भारतीय खेळांडूंनी जिंकली. यात शैलेश कुमारनं सुवर्ण, मरियप्पन थंगवेलूनं रजत आणि रामसिंह पढियार यानं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेतही भारतानं तिन्ही पदकं पटकावली. यात प्रणव सूरमानं सुवर्ण, धर्मवीरने रौप्य तर अमीत सिरोहा याने कांस्य पदक मिळवलं. भारताच्या मोनू घंघास याला गोळा फेक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं.

****

अबू धाबी मास्टर्स २०२३ या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडानं सामिया इमाद फारुकीचा पराभर करुन महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. १६ वर्षांच्या उन्नती हुडानं इमाद फारुकीला २१-१६, २२-१० अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केलं.

****

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, सात बाद २८२ धावा करत अफगाणिस्तानसमोर २८३ धावांचं आव्हान दिलं आहे.

****

गोवा इथं झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने बॅडमिंटन सांघिक खेळात पुरुष तसंच महिला गटात रौप्य पदक पटकावलं. पदक विजेत्या पुरुष संघात छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रथमेश कुलकर्णी याचा समावेश होता. प्रथमेश हा छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

****

भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल तसंच वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्याकरता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. नाशिक इथं छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सहा नोव्हेंबर रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे यांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...