Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेला आरोग्य सुविधा सहजरित्या उपलब्ध
करून देण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त;पुण्यात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला
राष्ट्रपती ध्वज प्रदान
·
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या
दौऱ्यावर
·
उद्या ४३व्या मराठवाडा
साहित्य संमेलनाचे उद्घाटन
आणि
·
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आज चौथा टी ट्वेंटी सामना
****
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेला आरोग्य
सुविधा सहजरित्या उपलब्ध करून देण्याची आवश्यकता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त
केली आहे. त्या आज नागपूर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाचं उद्घाटन
केल्यानंतर बोलत होत्या. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी
दिवंगत डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लेक्चर
हॉलचे राष्ट्रपती मुर्मू यांनी रिमोटची कळ दाबून उद्घाटन केलं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या
हिरक महोत्सवानिमित्त एका टपाल तिकिटाचं तसंच गेल्या ७५ वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या
एका स्मरणिकेचं आणि कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं.
या महाविद्यालयाच्या १९४७ च्या पहिल्या बॅचचे
पहिले विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार या ९६ वर्षीय डॉक्टरांचा तसंच माजी विद्यार्थ्यांचा
यावेळी शाल आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
उद्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या एकशे अकराव्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून
उपस्थित राहणार आहेत.
त्यापूर्वी आज सकाळी राष्ट्रपतींनी पुण्यात
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. हा लष्करातला सर्वोच्च
सन्मान आहे. पुण्याच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयांना आपल्या ७५ वर्षांच्या
गौरवशाली इतिहासात, देशात तसेच विदेशात, वैद्यकीय सेवा देण्याचं केलेलं कार्य, कौतुकास्पद असल्याचं त्या म्हणाल्या. वैद्यकीय
क्षेत्रात नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वापराचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या, अमृत महोत्सवी वर्षा निमित्त टपाल तिकीट
आणि ७५ रुपयांच्या नाण्याचंही प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. त्यांच्या
हस्ते प्रज्ञा या आर्म्ड फोर्सेस सेंटर फॉर कमिंग कॉम्प्युटेशनल मेडिसिन या केंद्राचं
उद्घाटन झालं. हे केंद्र सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयांना अत्याधुनिक आरोग्य
संशोधन क्षेत्रात जागतिक संस्था बनवण्यात मदत करेल असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी
व्यक्त केला.
****
विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामीण भागांमध्ये
जनजागृती करत असून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थीकडूनही नागरिकांना
दिली जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावोगावी भरवल्या जात असलेल्या शिबीरांमधून
आयुष्मान भारत गोल्डन कार्डबाबत माहिती तसंच ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक पहायला मिळत
असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
अकोला जिल्ह्यातील कुरणखेड इथं विकसित भारत
संकल्प यात्रेच्या माध्यमातून जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्वला योजना, मुद्रा योजना यासह विविध योजनांची माहिती चित्ररथाद्वारे देण्यात आली. यावेळी गावातील
लाभार्थी योगेश विजयकर यांनी आपला अनुभव व्यक्त केला.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी, असं उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यात कर्जत इथं पक्षाच्या वैचारिक
मंथन शिबीरात बोलत होते. वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा
समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही आम्ही सगळे करत आहोत. सरकार म्हणून आमच्यात मतभेद
नाहीत, असंही पवार यांनी नमूद केलं. सरकारमध्ये
सामील होण्यापूर्वी साहेबांची भेट घेऊन त्यांना कल्पना दिली होती, मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले असा थेट आरोप अजित पवार यांनी केला.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शनिवारी छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गंगापूर इथं आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य
संमेलनाचं उद्घाटन उद्या पवार यांच्या हस्ते होणार आहे. श्री मुक्तानंद महाविद्यालयात
उभारण्यात आलेल्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगरीत सकाळी ११ वाजता हा उद्घाटन
सोहळा होणार आहे. या नंतर उपमुख्यमंत्री गंगापूर इथं तहसील कार्यालयात छत्रपती संभाजीनगर
जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने
पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरडीएसएस योजना
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या दोन
योजनांमुळे राज्याच्या वीज क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा होणार असून या क्षेत्राचा कायापालट
होईल, असा विश्वास एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र
संचालक विश्वास पाठक यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी खासदार सय्यद इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात आरडीएसएस योजनेद्वारे तीन हजार ३७४ कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात
आली आहेत. आगामी १८ महिन्यात ही कामं पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बी.सी.सी.आय.
ने, आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय
क्रिकेट संघाची काल घोषणा केली. कसोटी सामन्यासाठी संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार
असून, एक दिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा
के. एल. राहुल कडे सोपवण्यात आली आहे. तर, सुर्याकुमार यादव, टी - ट्वेंटी सामन्यांचं नेतृत्व करेल. या दौऱ्यात दोन-कसोटी सामने, तीन-एक दिवसीय आणि तीन टी-ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत.
****
दरम्यान,
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना, आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
भारत, या मालिकेत दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
लातूर शहरात पोलीस दलातर्फे, येत्या रविवारी, लातूर पोलीस मॅराथॉन २०२३ चं आयोजन करण्यात
आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून,
सामाजिक बांधिलकी
जपण्यासाठी आणि तरुण मुलं व्यसनापासून दूर राहण्यासाठी "चला चांगले छंद जपूया" असा या मॅरॅथॉन चा संदेश असणार आहे.
****
जालना इथं आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. नवीन मोंढा पसिरातील पांजरापोळ आयोजित या सभेसाठी
मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल होत आहेत. सध्या शहरातून जरांगे यांची मिरवणूक काढण्यात
येत असून, सदर मिरवणूक काही वेळातच सभास्थळी पोहचल्यानंतर
जरांगे पाटील जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात, गोजेगाव इथं झालेल्या मुसळधार पावसात २६ वर्षीय शेतकरी राजू शंकर जायभाये, यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, राज्य शासनातर्फे मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. गोपीनाथराव
मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ मिळवून देण्याच्या सूचना ही पालकमंत्र्यांनी
अधिकाऱ्यांना दिल्या.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या हासोरी
गावात, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे
धक्के जाणवत आहेत. संकटकाळात नागरिकांना सुरक्षित आसरा घेता यावा यासाठी ९५२, तात्पुरते निवारे उभारण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या मागणीची
दखल घेऊन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी फेर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
****
राज्यातल्या स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था असलेल्या ॲक्शन फॉर ॲग्रीकल्चरल रिन्युअल
इन महाराष्ट्र - अफार्म या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते
प्रमोद देशमुख यांची फेरनिवड झाली आहे. देशमुख हे नांदेड जिल्ह्यातल्या
सगरोळी इथल्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आहेत. याआधी
२०१८ मध्ये त्यांची अफार्मचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
****
No comments:
Post a Comment