Tuesday, 23 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.01.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 January 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात नेताजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यावेळी उपस्थित होते.

पराक्रम दिनानिमित्त आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. यावेळी ते भारत पर्व चा शुभारंभ करणार असून, हा कार्यक्रम ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भारताची सांस्कृतिक तसंच समृद्ध विविधता यातून अधोरेखित केली जाणार आहे.

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमीट ठसा उमटवणारे बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. त्यांचे नेतृत्वगुण, विचारांप्रती असलेली कटिबद्धता, तसंच वंचितांसाठी दिलेला लढा यामुळे लाखो लोकांच्या हृदयात त्यांची स्मृती चिरंतन राहतील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****


प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी राज्याचा भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराजया संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचं जीवनकार्य यात दाखवण्यात येणार आहे.

****

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सर्वेक्षणाला सहकार्य करावं असं आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

****

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आधिवेधनाला आज नाशिक इथं सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आरक्षण मोर्चामध्ये मराठा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आज हा मोर्चा रांजणगाव इथं दाखल झाला. मोर्चाची गर्दी पाहता स्थानिक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल केला आहे. आज हा मोर्चा रांजणगाव इथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी- खराडी इथं मुक्कामी थांबणार आहे. तर उद्या पिंपरी-चिंचवड परिसरातून लोणावळा इथं मुक्कामी जाणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी काल यशस्वीपणे पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते. अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या लाभक क्षेत्रातल्या शेतकर्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, मात्र आता पाण्याची प्रतिक्षा संपली असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. ८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातल्या ६९ गावांना याचा लाभ होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला आजपासून सुरुवात झाली. अभ्यासक डॉ विजय कुमार वावळे यांनी 'द प्रॉब्लेस ऑफ द रूपी ग्रंथ आणि आजची प्रासंगिकता', या विषयावर भाष्य केलं. विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्र विषयावर अधिक संशोधन करावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****

धाराशिव जिल्ह्यात पारधी तसंच इतर आदिवासी समाजातल्या युवकांना गुन्हेगारी पासून परावृत्त करणं तसंच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "पहाट" उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत धाराशिव इथं काल दोन दिवसीय रोजगार मेळाव्याला प्रारंभ झाला, चार कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.

****

चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल राज्याला पहिलं सुवर्ण पदक मिळालं. जिम्नॅस्टिक्समध्ये आर्यन दवंडे यानं आर्टिस्टिक प्रकारात हे पदक जिंकलं. सायकलिंगमध्ये मुलींच्या गटात महाराष्ट्राला कांस्य, तर मुलांच्या गटात रौप्य पदक मिळालं. तलवारबाजी या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या माही अरदवाड हिनं सुवर्ण पदक पटकावलं. स्पर्धेच्या कालच्या तिसऱ्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी योगासने, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, सायकलिंग या प्रकारांत ११ पदकं जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य तर ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...