Wednesday, 24 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.01.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 January 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान जाहीर

·      २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवणं, हेच सरकारचं उद्दीष्ट-भारत पर्व उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यात नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ;मराठवाड्यात एक लाखावर नवे मतदार 

आणि

·      डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विजय फुलारी यांची नियुक्ती

सविस्तर बातम्या

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती भवनातून जारी काल करण्यात आलेल्या एका निवेदनातून याबाबतची घोषणा करण्यात आली. जननायक या नावानं लोकप्रिय असलेले ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.

****

२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवणं, हेच सरकारचं उद्दीष्ट असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारत पर्वाचं उद्घाटन करताना बोलत होते. देशाला आर्थिक, सांस्कृतिक आणि सामरिक दृष्ट्या सक्षम करण्याचा मानस पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम पर्वालाही पंतप्रधानांनी काल प्रारंभ केला. नेताजींची मूल्यं आणि त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. पराक्रम पर्व आणि भारत पर्व ही दोन्ही पर्वं येत्या एकतीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.

****

शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमीट ठसा उमटवणारे बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण कालपासून सुरू झालं. ३१ जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण ३६ जिल्हे, २७ महानगरपालिका आणि सात छावणी परिषदांमध्ये होणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कुणबी नोंदीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा आणि आंदोलन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले.

 

मागासवर्ग आयोग 24 बाय 7 काम करतोय. आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही कायदा करायचा आहे, तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे. आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, हे सरकार निर्णय घेणारं आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा काल पुण्यात पोहोचला. या मोर्चेकऱ्यांची उद्या २५ जानेवारीच्या रात्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी बाजार समिती आवारातल्या मराठा मोर्चाच्या कार्यालयात वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

****

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे ठराव, काल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. नाशिक इथं काल झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह राज्यभरातले पदाधिकारी उपस्थित होते. दानवे यांनी यावेळी बोलताना, कांदा निर्यात बंदीसह इतर मुद्यांवरून सरकारवर टीका केली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांची कागदपत्रं गहाळ झाल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी दरम्यान त्यांनी हा दावा केला. ही कागदपत्रं सांभाळण्याची जबाबदारी असलेली माणसं आता पक्ष सोडून गेली आहेत, आणि त्यांनी या कागदपत्रांचं काय केलं याची माहिती नाही, असं आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला 'महादुर्ग २०२४' हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनात स्थानिकांचा सहभाग वाढवावा, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन नियोजन करण्यात यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. येत्या १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवनेरी किल्ला परिसरात 'महादुर्ग २०२४' हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

****

 राज्यात नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषेदेत बोलत होते. अंतिम मतदार यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची वाढ होऊन मतदारांची एकूण संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठवाड्यात मतदारांची संख्या एक लाखाने वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४८ हजार १९२ मतदारांची वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यात १५ हजार १२९, बीड एक हजार ८०१, परभणी तीन हजार १७१, हिंगोली आठ हजार १०९, नांदेड तीन हजार २५८, धाराशिव २५ हजार ३२७, तर लातूर जिल्ह्यात २१ हजार २३८ मतदारांची वाढ झाली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात युवा मतदार नाव नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना छत्रपती संभाजीनगर विभागातून उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विजय फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी काल पत्राद्वारे ही नियुक्त जाहीर केली. फुलारी हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते १७ वे कुलगुरु आहेत.

नागपूर इथल्या सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद बारहाते यांची अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. कोल्हापूर इथल्या रेणुका सावंत आणि सतीश सावंत यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.

****

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाच्या शिध्याचा एक विशेष संच मिळणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणादाळ, मैदा आणि पोहे या साहित्याचा समावेश असेल. परभणी जिल्ह्यासाठी शासनाकडून तीन लाख तेरा हजार आठशे ब्याऐंशी शिधा संच मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी दिली.

****

शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेची काल भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर इथं विविद धार्मिक कार्यक्रम सुरु असून, राज्यासह इतर राज्यातले भाविकही याठिकाणी दाखल होत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला कालपासून सुरुवात झाली. अभ्यासक डॉ विजय कुमार वावळे यांनी 'द प्रॉब्लेस ऑफ द रूपी - हा ग्रंथ आणि आजची प्रासंगिकता', या विषयावर भाष्य केलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...