Tuesday, 23 January 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.01.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी ते भारत पर्व चा शुभारंभ करणार असून, हा कार्यक्रम ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भारताची सांस्कृतिक तसंच समृद्ध विविधता यातून अधोरेखित केली जाणार आहे.

****

देशवासीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कायम लक्षात ठेवतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यसंग्रामासाठी नेताजींनी असाधारण कटिबद्धता दाखवली. त्यांच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे स्वातंत्र्यसंग्रामावर प्रभाव पडला, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे.

****

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिर आजपासून सर्वांसाठी खुलं झालं आहे. भाविकांसाठी अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

****

आकाशवाणीनं ‘आराधना’ ही नवी वाहिनी सुरू केली आहे. ही डिजीटल वाहिनी यू ट्युब आणि न्यूज ऑन एआयआर अॅपवर ‘आकाशवाणी आराधना’ नावानं उपलब्ध असेल. भारतीय सभ्यता, सांस्कृतिक लवचिकता आणि वसुधैव कुटुंबकमची संकल्पना या वाहिनीतून प्रतिबिंबित होईल, असं आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक डॉ. वसुधा गुप्ता यांनी सांगितलं.

****

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावं असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. नागरिकांनीही अचूक माहिती देऊन सर्वेक्षणाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं मुसंडी मारत पदकांची लयलूट केली. स्पर्धेच्या कालच्या तिसऱ्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी योगासने, जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी, सायकलिंग या प्रकारांत ११ पदकं जिंकली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...