Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
· पुढच्या पाच वर्षात विकसित भारताच्या दिशेनं उंच झेप घ्यायची असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
· कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारने
हटवली
· नाशिक इथल्या पवित्र गोदावरी नदीची 'गोदा आरती' कायमस्वरूपी
होणार
आणि
· राजकोट कसोटीत भारताचा इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय
****
पुढचे पाच वर्ष देशासाठी महत्वपूर्ण असून, या
काळात विकसित भारताच्या दिशेनं उंच झेप घ्यायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी
बोलत होते. गेल्या दहा वर्षात अनेक धाडसी निर्णय घेऊन एक टप्पा आपल्या सरकारनं गाठला
आहे, देशासाठी आणखी खूप काही करायचं आहे, असं ते म्हणाले. देश आपल्या
संस्कृती आणि इतिहासाचा स्वीकार करुन भविष्य निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी
नमूद केलं. त्याआधी या अधिवेशनात संमत झालेल्या ठरावात विरोधी पक्षावर कडाडून टीका
करण्यात आली. त्यांच्या नकारात्मक, संकुचित आणि भ्रष्टवृत्तीमुळे
देशाला योगदान देण्याची क्षमता विरोधकांमधे नाही, असं या ठरावात म्हटलं
आहे.
****
जैन मुनी आचार्य विद्यासागर जी महाराज यांच्या
निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचे विचार
आणि प्रार्थना त्यांच्या भक्तांसोबत असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनीही आचार्य विद्यासागर
यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आचार्य विद्यासागर यांनी प्रवचनं, लिखाण
आणि काव्याच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केलं, असं
राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवर टाकलेली बंदी केंद्र
सरकारने मागे घेतली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या
समितीने आज झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. देशात कांद्याचं उत्पादन
घटल्यानं आणि भाववाढ झाल्यानं सरकारने आठ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी
जाहीर केली होती. गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा साठा पाहता सरकारने ही बंदी उठवली
आहे. यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे.
दरम्यान, कांदा निर्यात बंदी उठवून
केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचं महसूल मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. निर्यात बंदी होती तरी नाफेड मार्फत कांदा
खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली
होती. राज्य सरकारने साडेतीनशे रुपयांचं अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्र
आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचं आजच्या निर्णयातून
स्पष्ट झाल्याचं सांगून,
विखे पाटील यांनी, केंद्र सरकारचे आभार मानले.
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या
पवित्र गोदावरी नदीची 'गोदा आरती'
कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी
११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात
आला आहे. याबद्दलची कार्यवाही जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती गठीत करण्यात आली
आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठका घेवून
पाठपुरावा केला होता. आता या गोदा आरतीसाठी ११ प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहेत.
भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट पथदिवे, तसंच
एलईडी आणि विद्युतीकरण अशी कामं वेगाने करण्यात येतील, असं
जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या
पार्श्वभूमीवर सहकार भारतीच्या वतीनं उद्या मुंबईत चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय
महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय
सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे या
अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातले प्रतिनिधी,
तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील
प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' यासह अन्य पुरस्कार येत्या
२२ फेब्रुवारीला मुंबईत वरळी इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
यांना,
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश
वाडकर यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतंच राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती
व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार
असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या
आजच्या चौथ्या दिवशी भारताने दुसरा डाव ४३० धावांवर घोषित करुन, इंग्लंडसमोर
५५६ धावांचं लक्ष्य ठेवलं. या डावात यशस्वी जयस्वालनं नाबाद २१४ धावा केल्या. या आव्हानाचा
पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १२२ धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजानं पाच, कुलदीप
यादवनं दोन,
जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी
एक गडी बाद केला. पहिल्या डावात ११२ धावा आणि दोन बळी, तर
दुसऱ्या डावात पाच बळी घेणारा रविंद्र जडेजा सामनावीर
पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक
अशी आघाडी घेतली आहे.
****
मलेशिया इथं आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये
भारतीय महिला संघानं आज प्रथमच विजेतेपद मिळवलं आहे. आज या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी
झालेल्या सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला. आघाडीची खेळाडू
पी. व्ही. सिंधू हिनं पहिल्या एकेरीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय
नोंदवत संघाला एक-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला
यांनी नंतर दुहेरीची लढत जिंकून संघाला दोन-शून्य अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाला
त्या नंतरच्या दोन सामन्यांत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अनमोल खरब हिनं पाचव्या
निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत भारतीय महिला संघाचा विजय निश्चित
केला.
****
शिवजयंतीनिमित्त महासंस्कृती महोत्सवात नांदेड
इथं नंदगिरी किल्ल्यावर सुरू छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत
आहेत. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन
विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत उद्या आयटीआय इथं रांगोळी
स्पर्धा आणि प्रदर्शन होणार आहे.
****
लातूर तालुक्यात निवळी इथल्या विलास सहकारी
साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती
पुतळ्याचं अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस
नेते बाळासाहेब थोरात,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार
अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबिय उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं तब्बल
२२ बैलांना कोंबून नांदेडकडे जाणारा ट्रक नागरिकांनी आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडला.
याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वारंगा फाटा इथं नागरिकांना अगोदरच याबाबत
सूचना केली. त्यामुळे नागरिकांनी वारंगा फाटा इथं महामार्गावर काही वाहने आडवी उभी
करून तो ट्रक अडवला.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी नगर पंचायत
क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती
नागरिकांना देण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वराज्य सप्ताह राबवला जात आहे. या अंतर्गत
आज शहरातल्या के एस के महाविद्यालयात छत्रपती शिवरायांवर आधारित रांगोळी आणि वक्तृत्व
स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रांगोळीतून
शिवरायांचा इतिहास साकारण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व
स्पर्धेतून शिवविचारांचा जागर केला.
****
अमरावती जिल्ह्यात नांदगाव-खंडेश्वर-यवतमाळ
मार्गावर आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात चार कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला. इतर
दहा खेळाडू गंभीर जखमी झाले. अमरावती इथले हे खेळाडू यवतमाळ इथं एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सनं
निघाले होते,
समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर ट्रकनं खेळाडूंच्या बसला धडक
दिल्यानं हा अपघात झाला. जखमी झालेल्या दहा कबड्डीपटूंना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं आहे.
****
प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाचे
कुलगुरू प्रकाश महानवर यांनी आज ही माहिती दिली. बहुविध शिक्षण, संशोधन
आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या अभियानात राज्यातल्या आणखी तीन
विद्यापीठांची निवड झाली अशून, येत्या २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ते उच्च शिक्षणाविषयी तसंच विद्यापीठांविषयी
संबोधित करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment