Monday, 19 February 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 19 February 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      शिवजयंतीचा आज राज्यभरात उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता

·      काँग्रेस नेत्या, माजी मंत्री रजनी सातव यांचं निधन

      आणि 

·      राजकोट कसोटीत भारताचा इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यभर उत्साह असून, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा होणार आहे. त्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार असून शिवरायांचा पाळणा आणि अन्य कार्यक्रमही होतील. किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गडावर अकराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातल्या घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचं आवाहन करुन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीनगर इथं मध्यरात्री १२ वाजता शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. शहरातल्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात शिवप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी केली. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जोगदंड यांचं, रयतेचे राजे छत्रपती शिवराय, या विषयावर व्याख्यान होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ११ ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहनांसाठी गोपाळ टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक हा रस्ता बंद राहणार आहे. तसच सिडको परिसरातही एन १२, टीव्ही सेंटर, बळीराम पाटील चौक, बजरंग चौक या मार्गावरची वहातूक बंद असेल. सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठवाड्यात सर्वत्र शिवजयंतीनिमित्त दुचाकी रॅली, ध्वजारोहण, शिवगीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने काल झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीला मान्यता दिली. यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातली अधिसूचना लवकरच संबंधित मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल, अशी माहिती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या दहा वर्षात भाजप सरकारच्या काळात कांदा प्रश्नावर अनेक तोडगे काढण्यात आले असून, कांद्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. 

दरम्यान, निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचं, या निर्णयातून स्पष्ट झाल्याचं सांगून, विखे पाटील यांनी, केंद्र सरकारचे आभार मानले.

****

काँग्रेस नेत्या, राज्याच्या माजी मंत्री रजनी सातव यांचं काल नांदेड इथं अल्पशा आजाराने निधन झालं, त्या ७६ वर्षांच्या होत्या.

रजनी सातव यांनी १९८० साली कळमनुरी विधानसभा निवडणूक जिकूंन राजकीय कारकिर्दिला सुरुवात केली होती. राज्याच्या आरोग्य मंत्री, महसूल आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहिलं. सलग दोन वेळा त्यांनी कळमनुरी विधानसभेचं नेतृत्व केलं. १९८७ साली त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष झाल्या, तसंच १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहीलं. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत. रजनी सातव यांच्या पार्थिव देहावर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळाव्यात ते काल बोलत होते. अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणार्या विविध योजनांची पवार यांनी यावेळी माहिती दिली.

****

राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला आजपासून सुरुवात होत आहे. चार मार्चपर्यंत चालणार्या या मोहिमेत शासकीय रुग्णालय, किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेच्या रुग्णालयात ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.

****

दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या पवित्र गोदावरी नदीची ‘गोदा आरती’ कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला. आता या गोदा आरतीसाठी ११ प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट पथदिवे, तसंच एलईडी आणि विद्युतीकरण अशी कामं वेगानं करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं.

****

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीच्या वतीनं आज मुंबईत चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेश होणार आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातले प्रतिनीधी, तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.  

****

राजकोट इथं झालेल्या तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी भारताने दुसरा डाव ४३० धावांवर घोषित करुन, इंग्लंडसमोर ५५६ धावांचं लक्ष्य ठेवलं. या डावात यशस्वी जयस्वालनं नाबाद २१४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १२२ धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजानं पाच, कुलदीप यादवनं दोन, जसप्रित बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात ११२ धावा आणि दोन बळी, तर दुसर्या डावात पाच बळी घेणारा रविंद्र जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.

****

मलेशिया इथं आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं प्रथमच विजेतेपद पटकावलं आहे. काल या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला.

****

नांदेडमध्ये सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी समारोप होणार आहे.

दरम्यान, महोत्सवात नंदगिरी किल्ल्यावर आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला काल नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट दिली. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आयटीआय परिसरात भव्य शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन काल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

लातूर तालुक्यात निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले,  बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबिय उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

****

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या नांदेड- वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाला कालपासून सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातल्या मनाठा इथं रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांनी भूमीपूजन करुन या कामाला सुरुवात केली. एकूण २८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचं काम येत्या तीन वर्षात होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...