Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· देशभरातल्या महामार्गांलगत ट्रक तसंच टॅक्सी चालकांसाठी विश्रामभवन उभारण्यात येणार- भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांची घोषणा
· विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत-कुलपती रमेश बैस यांचे निर्देश
· ९७वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विभागीय नाट्य संमेलन तसंच वेरुळ अजिंठा महोत्सवाला प्रारंभ
आणि
· यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या बळावर इंग्लंडविरोधातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर ३३६ धावा
****
देशभरातल्या महामार्गांलगत ट्रक तसंच टॅक्सी चालकांसाठी विश्रामभवन उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो च्या उद्घाटनानंतर बोलत होते. ट्रक आणि टॅक्सीचालक हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत, या विश्रामभवनांमुळे चालकांचं आरोग्य उत्तम राहिल, तसंच अपघातांच्या प्रमाणात घट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले....
‘‘इन भवनों मे ड्राईवरों के लिए भोजन, पीने के साफ पानी, शैचालय पार्किंग व आराम करने की पूरी व्यवस्था होगी. सरकार की तय्यारी इस योजना के पहले चरण मे देश भर मे एसे एक हजार भवन बनाने से शुरुआत करने की है. यह भवन ड्राईवर्स की ईज़ ऑफ लिविंग और ईज़ ऑफ ट्राव्हेलिंग दोनों बढायेंगे. इससे उनकी सेहत भी ठीक रहेगी और दुर्घटनाओं को रोकने मे भी बहोत मदद मिलेगी.’’
इलेक्ट्रीक वाहनं, ग्रीन हायड्रोजन, रूफ टॉप सोलर पॅनेल, जलवाहतुक, आदी विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. देशात विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर आपल्या सरकारचा भर असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
****
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर संसदेत कालपासून चर्चा सुरु झाली. लोकसभेत भाजपच्या खासदार हिना गावित यांनी तर राज्यसभेत भाजपच्या कविता पाटीदार यांनी या चर्चेला प्रारंभ केला. काँग्रेस नेते खासदार डी के सुरेश यांनी केलेल्या टिप्पणीचे काल संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत, हे प्रकरण आचार समितीकडे पाठवून, सुरेश यांच्यावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सदनातून सभात्याग केला.
****
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचारू करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत. काल मुंबईत राजभवनात कुलगुरुंच्या संयुक्त मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. विद्यापीठांनी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
****
महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला बळ प्राप्त होईल, असा विश्वास महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी यावेळी व्यक्त केला.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जनाधिकार कार्यक्रमाच्या माध्यमातून काल पालघर इथं जनतेशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षातर्फे उद्या ४ फेब्रुवारीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबवण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यभरात सलोखा योजनेतून आतापर्यंत ५८५ शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या योजने अंतर्गत अमरावती विभागातून सर्वाधिक १४४ दावे निकाली काढण्यात आले, त्या पाठोपाठ लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे विभागाचा समावेश आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहिमेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले मुकूंद लाड तसंच वर्षा बोरडे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली...
****
९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. समाजात वागावं कसं, याची शिकवण साहित्यातून मिळते, असं महाजन यांनी नमूद केलं. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं भरलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं शोभणे यांनी सांगितलं. तर पुढच्या तीन वर्षांनी होणारं शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार होण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. दरम्यान, काल सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, उद्योजक अशोक जैन, यांच्यासह राज्यभरातून साहित्यिक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाले आहेत.
****
रंगभूमी तसंच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही, उद्योग मंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी दिली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त काल बीड इथं विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालक मंत्री धनंजय मुंडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यावेळी उपस्थित होते. जागर उपक्रमातंर्गत राज्यभर नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक घडतील, अशी अपेक्षा सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, बीड औद्योगिक विकासासाठी ७५ कोटीं रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जाणार असल्याची घोषणा, सामंत यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कालपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सोनेरी महल परिसरात आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. काल या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचं भरतनाट्यम्, पंडिता अनुराधा पाल यांचं स्त्री शक्तीवर आधारित पाच वाद्यांचं सादरीकरण आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे तसंच प्रियंका बर्वे यांचं सादरीकरण झालं. आज या महोत्सवात अमान आणि अयान अली बंगश यांचं सरोद वादन, तसंच प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं सादरीकरण होणार आहे.
****
पं.सी.आर व्यास यांच्या जन्मशताब्दी निमित्त अंबाजोगाई इथं गुणीजन संगीत समारोहाला कालपासून प्रारंभ झाला. काल या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांचं सतार वादन झालं, प्रसाद पाध्ये यांच्यातबल्यासोबत सतारीच्या जुगलबंदीला रसिकांची विशेष दाद मिळाली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उभारलेल्या हज हाऊसचं काल अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह हज हाऊस कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. हज हाऊसची ही इमारत हज यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. शहरातील आमखास मैदानावर दीडशे कोटी रुपये खर्च करून फुटबॉल मैदान उभारले जाईल, नारेगाव इथं हज कमिटीच्या चाळीस एकर जागेवर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 'केजी टू पीजी' शिक्षणाची सुविधा दिली जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
****
क्रिकेट
सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या बळावर इंग्लंडविरोधातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३६ धावा केल्या आहेत. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. काल खेळ थांबला तेव्हा यशस्वी जैस्वाल १७९ तर रविचंद्रन अश्विन पाच धावांवर खेळत होते.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नेपाळचा १३२ धावांनी पराभव करुन भारताने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करत सचिन धस च्या ११६ धावांच्या बळावर २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला नेपाळचा संघ १६५ धावाच करु शकला.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उद्या प्राचार्य बी.के.सबनीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाला दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठवता येईल. स्पर्धेचं हे एकोणीसावं वर्ष आहे.
****
नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांना ३१ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या चार तारखेला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षण कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेड इथं उद्या या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment