Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन
· पक्ष चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
· पीएम उषा अभियानाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला अनुदान मंजूर
आणि
· हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी
सविस्तर बातम्या
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आज होणार आहे. सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल.
दरम्यान, इतर कुणाचंही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते काल जुन्नर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
पक्ष चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला काल दिले. या अर्जानंतर आठवडाभरात निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष चिन्ह द्यावं, असंही न्यायालयानं सांगितल्याची माहिती, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षांना त्यांचं त्यांचं पक्ष नाव वापरण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे.
****
राज्यभरात कालपासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा राबवण्यात येत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव इथं यानिमित्त आरोग्यवर्धक शिवजयंतीचा संकल्प केला. या अभियानात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात मोफत सल्ल्यासाठी १०४ हा नि:शुल्क क्रमांक सुरु केला आहे. यादरम्यान राज्यातल्या शासकीय आणि मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथं या मोहिमेचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
****
प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान - पीएम उषाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूतून दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. यावेळी ते उच्च शिक्षणाविषयी तसंच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत.
पीएम उषा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर झालं आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला देखील पीएम उषा अभियानाअंतर्गत २० कोटी रुपयांचं अनुदान मिळणार असून, यातून मुख्यतः विद्यापीठात मुलींचं वसतीगृह, सौरऊर्जा, कौशल्य विकास इत्यादींचा विकास करण्यात येणार असल्याचं कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी शासन दरबारी जरूर प्रयत्न करू, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन महिन्यातून एकदा गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. मुंबईत काल गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात सहकार भारतीनं आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली.
पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरी इथं शिवजन्म सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करून शिवरायांचा पाळणा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
आग्रा इथल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या दिवाण-ए-खास समोरील प्रांगणात देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आग्रा इथं ज्या कोठीमध्ये शिवाजी महाराज कैद होते त्याठिकाणी संग्रहालय करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाड्यात सर्वत्र शिवजयंती जल्लोषात साजरी झाली. अनेक ठिकाणी दुचाकी फेरी, गायनाचे कार्यक्रम, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता.
यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रयतेचे राजे छत्रपती शिवराय या विषयावर स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांचं व्याख्यान झालं. शिवजयंतीनिमित्त काल विद्यापीठात मिरवणूक काढण्यात आली.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विद्यापीठ परिसरात विद्यार्थी, अधिकारी- कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याची पालखीद्वारे मिरवणूक काढली.
नांदेड इथं सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, या महोत्सवाचा काल समारोप झाला.
****
हिंगोली इथं शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपस्थितांनी मानवंदना दिली.
****
बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजयंती उत्साहात साजरी झाली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची शासकीय पूजा करण्यात आले.
****
धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. याशिवाय श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं ऑटोरिक्षा रॅली काढण्यात आली. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची काल भवानी तलवार अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
****
लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करुन आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
जालना शहरासह जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांसह, पक्ष, संघटनांच्यावतीनं शिवजयंती विविध उपक्रमांनी, उत्साहात साजरी झाली. जालना शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
****
परभणी शहरात आणि जिल्ह्याभरात मिरवणुका, पथनाट्य आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी झाली. परभणी शहरातून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली.
****
विकसित भारत सकंल्प यात्रेअंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यानगर आणि गारखेडा परिसरात जनजागृती करण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत राजेश वक्ते आणि रविंद्र निळकंठे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
गुवाहाटी इथं चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. ११ दिवस चालणारी ही स्पर्धा सात शहरांमध्ये खेळवली जाणार असून, यात साडे चार हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment