Sunday, 12 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१२ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

देशभरातल्या जिल्हा न्यायालयांमध्ये तसंच उच्च न्यायालयांमध्ये काल आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये सुमारे साडे तीन लाख खटले निकाली काढण्यात आले आहेत. याअंतर्गत सुमारे एक हजार १८५ कोटी रुपये रकमेबाबत यशस्वी तडजोड करण्यात आली. राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणांमार्फत आयोजित या लोकअदालतींमध्ये मोटर अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरणं, आयकर आणि विक्रीकर प्रकरणं तसंच भूसंपादनासह अन्य अनेक प्रकारची प्रकरणं सामोपचारानं मिटवण्यात आली.

****

कर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी बँकांना मोठा वाव असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. धोरणात्मक व्याजदराची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अनुत्पादक कर्जासारख्या समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक परिणाम होऊ शकेल, असं ते म्हणाले. छोट्या बचतींवरील व्याजदर निश्चित करण्याचं सूत्र अंमलात आणणंही सोयीचं होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिjkढोण इथं विनापरवाना ध्वनीक्षेपक वापरल्याप्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या उमेदवारांविरुद्ध आचारसंहित भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उमेदवरांविरोधात ग्रामविकास अधिकारी अशोक आमले यांनी तक्रार दाखल केली. विना परवाना ध्वनिक्षेपकाबरोबरच भित्तीपत्रकं सार्वजनिक ठिकाणी लावल्याचंही त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.

****





अंधांच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. बंगळुरु इथं सकाळी अकरा वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारत पाकिस्तान सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. उपान्त्य फेरीत भारतानं श्रीलंकेचा तर पाकिस्ताननं इंग्लंडचा पराभव केला.

//********//

No comments: