आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१७ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
५
वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याबाबत सरकार कटिबध्द असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री
राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय कृषी अनुसंधान परिषद - आयसीएआरच्या
वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सहयोगी क्षेत्रासाठीच्या
निधीत २४ टक्के वाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले. उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ, नवीन
तंत्रज्ञानाचा विकास, कृषी क्षेत्रात आणलेलं वैविध्य आदींमुळे यशाचे नवे मापदंड निर्माण
झाले असून, चांगला मौसमी पाऊस आणि सरकारनं हाती घेतलेल्या विविध योजनांमुळे यावर्षात
विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
भविष्यात शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेतकऱ्यांना
समृद्ध करण्याचा सरकारचा मानस आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर इथं ते प्रचार सभेत बोलत होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असून, लवकरव
११ हजार खेडी दुष्काळमुक्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात ९८ टक्के
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी देण्यात सरकार यशस्वी झाल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
सततच्या हवामान बदलांमुळे २०२० सालापर्यंत दूध उत्पादनात
वर्षागणिक ३० लाख टनापेक्षा जास्त घट होण्याची शक्यता दूध उत्पादन क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी
व्यक्त केली आहे. भारतीय डेअरी संघटनेतर्फे मुंबईत आयोजित ४५व्या डेअरी उद्योग परिषदेत
सहभागी तज्ज्ञांनी हे मत मांडलं. तापमानात होणाऱ्या वाढीमुळे दुधाची स्थानिक मागणी
पूर्ण करणं अवघड होणार असून, हळूहळू दरडोई वापरावरही घट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे
डेअरी उद्योगाला याचा फटका बसेल, असं राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप राठी
यांनी सांगितलं.
****
सक्तवसुली संचालनालयानं वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर
नाईक याच्या सहयोगी अमिर गजधरला अवैध अर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबई
इथं अटक केली. संचालनालयानं नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी
संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अघोषित मालमत्तेत त्याच्या मित्राचाही सहभाग
असल्याचं समोर आलं आहे.
//*******//
No comments:
Post a Comment