Friday, 17 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      किरकोळ अपवाद वगळता पहिल्या टप्प्यातलं जिल्हा परीषद आणि पंचायत समित्यांसाठीचं मतदान शांततेत; सरासरी ७० टक्के मतदान

·      मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना नाममात्र शुल्कात कायदेविषयक सुविधा उपलब्ध होणार

·      डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट कार्डच्या व्यापारी सवलत दरात कपात

आणि

·      औरंगाबाद इथं उद्यापासून महिला शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू होणार  

****

राज्यातल्या १५ जिल्हा परिष आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचं मतदान किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडलं. एकूण सरासरी ७० टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ७० टक्के, बीड ७१ टक्के तर लातूर जिल्ह्यात ६९ टक्के मतदान झालं. मतदानाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर....

लातूर तालुक्यातील २० मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केले होते. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन मतदान केलं. परंतू अहमदपूर तालुक्यातील शेंद्री सुलेमान गावच्या ग्रामस्थांनी बहिष्कार कायम ठेवला. जळकोट तालुक्यातील धनगरवाडी इथं प्रथमच मतदान केंद्र झाल्यामुळे मतदारांनी आनंद व्यक्त केला.

****

हिंगोली जिल्ह्यात ७० टक्के, जालना ७० टक्के, नांदेड ७१ टक्के मतदान झालं. जिल्ह्यातल्या सहा गावातल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यामध्ये वागदरवाडी, बितनाळ, तुराटी, बोथी, सोनपेठवाडी, पळसवाडीतांडा या गावांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका गावातही मतदानावर बहिष्कार घालण्यात आला होता. परभणी जिल्ह्यात ७२ टक्के  तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झालं, अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….

जिल्ह्यातील एक हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर आणि दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान यंत्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या दोनशे सत्तावन्न तर पंचायत समित्यांच्या चारशे सत्त्याहत्तर मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. मतदान शांततेत पार पडलं. कळंब तालुक्यातील फोंदला, लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी, भूम तालुक्यातील माळेवाडी, आणि तुळजापूर तालुक्यातील धनेगाव गावातील ग्रामस्थांनी या मतदानावर बहिष्कार घातला. सर्व मतदान केंद्रांवर चुरशीनं मतदान झाल्यानं आणि बहुरंगी लढतीमुळं निकाल निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

****

जळगाव जिल्ह्यात ६५टक्के, अहमदनगर जिल्ह्यात ७१टक्के मतदान झालं, जिल्ह्यातल्या पांगरमल इथं बनावट दारूमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्यानं, तिथल्या नागरिकांनी निवडणुकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात ६८ टक्के, यवतमाळ ७० टक्के, वर्धा ६५ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ७२टक्के मतदान झालं.  गडचिरोली जिल्हा परीषदेसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. आज झालेल्या मतदानामध्ये जवळपास ७२ टक्के लोकांनी मतदान केलं. 

येत्या २३ फेब्रुवारीला या मतदानाची मोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण सात हजार ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

. के. पलानीसामी यांनी काल तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. प्रभारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाल्यामुळे तुरुंगात जावं लागलं असून, काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. त्यानंतर विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड झालेल्या पलानिसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन, सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार काल राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. पलानिसामी यांना येत्या १५ दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

****

मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना कायदेविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष योजना आखली आहे. या अंतर्गत मासिक साठ हजार किंवा वार्षिक साडे सात लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना नाममात्र शुल्क भरून, कायदेविषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे गरीब नागरिकांनाही सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

****

गर्भलिंग निदान चाचणीबाबतची माहिती, तपशील आणि जाहिराती आपल्या संकेत स्थळावरून हटवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहू या शोध यंत्र -सर्च इंजिन्सना सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.यापूर्वीही न्यायालयानं या तीन्ही सर्च इंजिन्सना, अशाप्रकारचे आदेश दिले होते. याशिवाय अनेक शोध सूत्र शब्द ‘सर्च की- वर्ड’ बंद करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

परवाना क्रमांक, परवानाधारकाचे नाव आणि कालावधी याचा उल्लेख नसलेले सर्व बेकायदा जाहिरात फलक आणि, बॅनर्स निवडणुकीपूर्वी हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. जनहित मंचच्यावतीनं या फलक आणि बॅनर्सविरूद्ध न्यायालयात याचिका दाखल झाली असून तिच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हे आदेश दिले. यासंदर्भात संबंधितांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य करावं, कोपर्डी आणि अन्य ठिकाणी घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा करावी, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक- अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सरकारी परिपत्र मराठीत द्यावीत, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी काल मराठा समाजानं कर्नाटकातल्या बेळगाव इथं मराठा क्रांती मोर्चा काढला. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

****

छोट्या दुकानदारांना डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं डेबिट कार्डच्या व्यापारी सवलत दरात कपात केली आहे. वार्षिक उत्पन्न २० लाख रुपये असणारे व्यापारी, शिक्षण संस्था आणि  सरकारी रुग्णालय यासारख्या श्रेणीतील व्यापाऱ्यांसाठी हे शुल्क आता शून्य पूर्णांक ४० टक्के एवढं केलं जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या नव्या दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

****

सोनं तारण ठेऊन दोन लाख रूपयांपर्यंतचं कर्ज देण्यास क्षेत्रीय ग्रामीण बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये इतकी होती. यासंबंधीची अधिसूचना काल रिझर्व्ह बँकेनं जारी केली.

****

औरंगाबाद आणि बीड इथं पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. काल स्वराज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

****

औरंगाबाद इथं उद्यापासून महिला शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू केला जाणार आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या सावता माळी शेतकरी आठवडी बाजार योजने अंतर्गत ही आठवडी बाजाराची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरात हा बाजार भरणार आहे.

****

औरंगाबादमधले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयावर काल सात ते आठ कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी पँथर सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्तच्या व्याख्यानप्रसंगी झालेल्या तोडफोडीच्या घटनेच्या वादातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

***

वीजबील थकबाकीच्या वसुलीमध्ये कुचराई करणाऱ्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि जळगाव परिमंडळातल्या नऊ अधिकाऱ्यांना महावितरण कंपनीनं निलंबित केलं आहे, तर ४० अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. वीज बील थकबाकी वसुलीसाठी महवितरणनं मोहिम सुरू केली आहे. ग्राहकांकडून वीज बिलाबाबत तक्रारी आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देशही महावितरणनं सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबईहून जयपूर आणि अजमेरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा ते जयपूर ही गाडी चार मे ते २९ जून दरम्यान दर गुरुवारी, तर बांद्रा ते अजमेर ही गाडी एक मे ते २६ जून दरम्यान दर सोमवारी सोडण्यात येणार आहे.

//******//

No comments: