Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला
यांना तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास प्रतिबंध करावा, अशा आशयाची याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे, मात्र या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च
न्यायालयानं नकार दिला आहे. शशिकला यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा खटला सुरू असल्यानं,
या खटल्याचा निकाल जाहीर होईपर्यंत शशिकला यांना तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
घेण्यास मनाई करावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. शशिकला यांनी सरकार स्थापनेचा दावा
केला असून, १३० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे सादर केलं आहे.
दरम्यान, शशिकला यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना एका पंचतारांकित
रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात असून, यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयानं
पोलिस प्रशासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
****
सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मिळणाऱ्या अनुदानित धान्यासाठी
आता आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सरकारनं आधार क्रमांक नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत
मुदत दिली आहे. अन्न आणि ग्राहक विभागानं याबाबतची अधिसूचना जारी केली. ३० जूननंतर
शिधापत्रिकेशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर हे स्वस्त धान्य ग्राहकांना मिळणार नाही
असंही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
भारत पूर्ण ताकदीनिशी दहशतवादाविरोधात लढण्यास कटीबद्ध असल्याचं
परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय सुरक्षा
दल - एनएसजीच्या १७व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी या दोन दिवसीय समेलनाचं उद्घाटन केलं. आज या संमेलनाचा
समारोप होत आहे.
****
सर्व विद्यापीठांमध्ये हुतात्मा जवानांच्या पाल्यांसाठी काही
जागा आरक्षित असाव्यात, अशी मागणी प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी केली
आहे. पौडवाल यांच्या संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल राज्यपाल सी विद्यासागर राव
यांच्या हस्ते येत्या अठरा तारखेला पौडवाल यांचा गौरव होणार आहे. या पार्श्वभूमीवर
पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या सत्कार सोहळ्यात सूर्योदय फाउंडेशनच्या
वतीनं पाच हुतात्म्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत दिली जाणार असल्याचं,
पौडवाल यांनी सांगितलं.
****
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मे २०१७ पर्यंत हिंगोली
जिल्ह्यातला नागरी भाग निर्मल करण्याचे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी
यांनी दिले आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं
आवाहनही त्यांनी केलं.
****
बीड इथं रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. शेतीमध्ये अभिनव उपक्रम
राबविणाऱ्या २१ शेतकऱ्यांना रेडिओ किसान मित्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
सुविधांचा अभाव आढळल्यानं लातूर जिल्ह्यातल्या ३६ दिव्यांग शाळांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागानं नोटिसा बजावल्या आहेत. ‘ब’ दर्जाच्या
या शाळा आहेत, याआधीही जिल्ह्यातल्या ‘क’ दर्जाच्या
शाळांना सुविधेअभावी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
****
मुलींना जनमानसात सन्मानानं जगण्यासाठी
अधिकारी वर्गानं आपलं योगदान जास्तीत जास्त द्यावं, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं आयोजित जिल्हास्तरीय मनोधैर्य
चमू प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी
वैद्य, पोलिस आणि न्याय व्यवस्थेनं योग्य काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय नाट्य विद्यालय - एनएसडीच्या
पुणे इथं आयोजित भारत रंग महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक रामगोपाल बजाज यांच्या
हस्ते करण्यात आलं. १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात तीन परदेशी आणि तीन
भारतीय भाषांमधली नाटकं सादर करण्यात येणार आहेत.
****
शासनाच्या एकूण तरतुदीपैकी किती टक्के
रक्कम भाषेच्या विकासासाठी खर्च व्हावी याचे निकष ठरवून त्यासाठी आवश्यक असल्यास उपकर
लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी
केली आहे. विधान परिषदेवर नियुक्त सदस्य निवडीत कला, विज्ञान आणि साहित्य क्षेत्राकडे
दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान हैदराबाद
इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीनं द्विशतक झळकावलं. शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद ५२३ धावा
झाल्या होत्या. रिद्धीमान सहा २४ तर आर अश्विन १३ धावांवर खेळत आहे. कोहलीनं २०४, मुरली विजयनं १०८, चेतेश्वर पुजारानं ८३ आणि अजिंक्य
रहाणेनं ८२ धावा केल्या.
//*******//
No comments:
Post a Comment