Friday, 10 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१० फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ठाणे जिल्ह्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. बुधवारी रात्री भिवंडी इथं रिक्षाचालकांच्या मारहाणीनंतर एसटी चालकाचा मृत्यू झाला होता, याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी बंद सुरू केला आहे. बसस्थानक परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालय - आरटीओमध्ये येत्या एक मार्च पासून ऑनलाईन पध्दतीनं शुल्क भरणा केलेले अर्ज स्वीकारले जाणार असल्याचं औरंगाबादच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. हे कामकाज करण्यासाठी यापुढे तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या शिबीर कार्यालयात शुल्क स्वीकरण्याचं कामकाज बंद करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत, राज्यातल्या प्रत्येक उपविभागीय स्तरावर दक्षता आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. 

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पेडन्यूजला आळा घालण्यासाठी, जाहिरात प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कार्यरत असून, उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर असल्याचं परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितलं. परभणी इथं जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

//****//

No comments: