Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 9 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशात
सध्या मोठ्या प्रमाणावर परदेशी थेट गुंतवणूक होत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरूण
जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत र्अथसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते.
देशातल्या सर्व राज्यांमध्ये अधिकाधिक परदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी निकोप स्पर्धा
सुरू असल्याचं, जेटली म्हणाले. आगामी आर्थिक वर्षासाठी केलेल्या तरतुदी मान्य होऊन
तत्काळ एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करता यावी, यासाठीच अर्थसंकल्पाची तारीख
२८ फेब्रुवारीवरून एक फेब्रुवारी केल्याचं जेटली म्हणाले. वस्तू सेवा करामुळे कोणालाही
करावर कर भरावा लागणार नसल्याचं, जेटली यांनी सांगितलं.
दरम्यान,
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज आज पूर्ण झालं. आज सायंकाळी
दोन्ही सदनांचं कामकाज येत्या ९ मार्चपर्यंत स्थगित झालं.
****
केंद्रीय
अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज नवी दिल्ली इथं
निर्यात पुरस्कार प्रदान केले. उद्योग निर्यात क्षेत्रात विविध विभागांमध्ये
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्याच्या या उपक्रमाचं अनंत गीते यांनी
यावेळी कौतुक केलं. निर्यातीला प्रोत्साहन हा “मेक इन इंडिया” उपक्रमातला महत्वाचा
भाग असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
महामार्गांची माहिती देणारी सेवा आकाशवाणीवरून सुरू करणार
असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत बोलत होते.
याअंतर्गत देशातल्या १३ राज्यातल्या १२ राष्ट्रीय महामार्गांवरच्या वाहतुकीची माहिती
देण्यात येणार आहे. ही सेवा सर्वप्रथम दिल्ली - जयपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सुरु
होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तामिळनाडूमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर प्रभारी राज्यपाल सी विद्यासागर राव आज चेन्नईत पोहोचले. राज्यपालांची
भेट घेण्यासाठी कार्यवाहक मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम हे सध्या राजभवनावर दाखल झाले असून,
सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला
राज्यपालांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर चेन्नईत राजभवनाबाहेर शशिकला यांच्या
अनेक समर्थकांनी गर्दी केली होती. निदर्शनं करणाऱ्या या समर्थकांना पोलिसांनी अटक केली.
तामिळनाडूत उद्भवलेली परिस्थिती म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचं
अंतर्गत संकट असल्याचं, विरोधी पक्ष डीएमकेनं म्हटलं आहे. या घटनेशी आपल्या पक्षाचा
काहीही संबंध नसल्याचं डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी स्पष्ट केलं. या परिस्थितीत
राज्यपालांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या.
****
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ११ संशयितांना मध्यप्रदेशात
आज अटक करण्यात आली. मध्यप्रदेशाचे दहशतवाद प्रतिबंधक पथकाचे प्रमुख संजीव शर्मा यांनी
आज भोपाळ इथं ही माहिती दिली. भोपाळ, जबलपूर, सतना आणि ग्वाल्हेर इथं हे सर्वजण समांतर
टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचं निदर्शनास आलं असून, यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचं,
शर्मा यांनी सांगितलं.
****
रेल्वे गाड्यामंध्ये अवैध जाहिराती लावणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेनं
कारवाई केली आहे. यासंदर्भात स्थापन विशेष पथकानं उपनगरीय रेल्वेगाड्यांमधल्या ५१३ अवैध जाहिरातदारांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून दंडापोटी
चार लाख २५ हजार रुपये वसूल करण्यात आले
आहेत.
****
लातूर इथल्या तेल कारखाना दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, कारखान्यात सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध करुन
दिली जात नाहीत तोपर्यंत कारखाना पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. ते आज लातूर इथं पत्रकारांशी
बोलत होते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानं लातूर जिल्हा परिषदेच्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला वचननामा आज सादर केला. जिल्ह्याचे पालक मंत्री संभाजी
पाटील निलंगेकर, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येत्या १२ तारखेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूर इथं सभा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात
आली.
****
भारत-बांगलादेश दरम्यान खेळवल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून हैदराबादमध्ये इथं सुरुवात
झाली. पहिल्या दिवस अखेर भारताच्या मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या
बळावर ९० षटकात तीन बाद ३५६ धावा झाल्या. कोहली १११ आणि अजिंक्य रहाणे ४५ धावांवर नाबाद
आहे.
****
राष्ट्रीय जंतनाशक
दिन उद्या पाळण्यात येणार आहे. देशातल्या ३४ कोटी मुलांना जंतनाशक गोळ्यांचं वितरण
करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सी के मिश्रा
यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दली.
****
No comments:
Post a Comment