Thursday, 9 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 09 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

पंतप्रधानांनी काल राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सदनात उमटले.

लोकसभेत आज कामकाज सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जगभरातल्या देशांना दहशतवादाविरोधातल्या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं. त्यानंतर मात्र गदारोळामुळे सदनाचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, मात्र लोकसभाध्यक्षांनी त्यांना वरिष्ठ सदनाचा मुद्दा लोकसभेत मांडण्याची परवानगी न दिल्यानं काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर सदस्यांनी याच मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

****

राष्ट्र उभारणीसाठी महिलांचं सक्षमीकरण या विषयावर आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं तीन दिवसीय राष्ट्रीय महिला संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून १२ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसदेसह देशाच्या सर्व राज्य विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधी तसंच देशभरात उच्च शिक्षण घेणारे सुमारे दहा हजार महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

****

तामिळनाडुमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी राज्यपाल सी विद्यासागर राव आज दुपारनंतर चेन्नई इथं पोहोचणार आहेत. कार्यवाहक मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांच्यात सत्तासंघर्ष सुरु असून, हे दोघंही आपापल्या समर्थकांसह आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. पनीरसेल्वम यांचा गट विरोधी पक्ष द्रमुकसोबत असल्याचा आरोप शशिकला यांनी केला आहे. तर आपल्याला अपमानित करुन राजीनामा देण्यास भाग पाडलं असल्याचं पनीरसेल्वम यांचं म्हणणं आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर पुढचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय विद्यापीठांनी दर तीन वर्षानंतर अभ्यासक्रमांची समीक्षा आणि संशोधन करावं, असं विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीनं सांगितलं आहे. यामुळे महाविद्यालय तसंच विद्यापीठांतल्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी अधिक सक्षम बनवता येईल, असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अभ्यासक्रमांच्या समीक्षा आणि संशोधनात, विविध कौशल्याची मागणी आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

कौटुंबिक हिंसाचापासून महिलांचं संरक्षण कायदा अधिनियम -२००५ बाबत जनजागृती कार्यशाळा हिंगोली इथं पार पडली. जिल्हा सत्र न्यायाधीएम आर नातू यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच महिलांच्या संरक्षणासाठी हा कायदा तयार करण्यात आला असल्याचं ते म्हणाले.

****

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तेंडुलकर दुबे स्मृती पुरस्कार फॉयझे जलाली, शीना खालीद, भारवी, अजित सिंग पालावत आणि अशिष पाठोडे या पाच प्रतिभावान कलाकारांना जाहिर झाला आहे. एक लाख रुपयांचा हा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते येत्या २६ फेब्रुवारीला पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे.

****

पुणे इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सात सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण १५ पदकं मिळवली. राज्याची अदिती परब या स्पर्धेत सर्वात वेगवान धावपटू ठरली. पश्चिम बंगालच्या संघानं सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावलं.

****

रसायन तंत्रज्ञान संस्थेनं स्थापनेपासूनच विज्ञान क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ जीन मारी लेन आणि रॉबर्ट एच ग्रब्बस, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

देशातल्या आणि राज्यातल्या प्रथेनुसार अनुसूचित जाती आणि जमाती तसंच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यास समाज घटकातील असतात, त्याचप्रमाणे ओबीसी आयोगाचा अध्यक्षही याच वर्गातील असावा, अशी मागणी प्राध्यापक हरी नरके यांनी केली आहे. पुणे इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्य सरकारनं प्रथमच ओबीसी खाते निर्माण केल्यानंतर घेतलेला पहिलाच निर्णय ओबीसीविरोधी असल्याची टीका नरके यांनी यावेळी केली.  

//******//

No comments: