Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 14 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
कारर्किदीबरोबरच विद्यार्थ्यांचं
व्यक्तिमत्व घडवण्यालाही महत्व देण्याचं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं आवाहन
·
राज्यातल्या
पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा अखेरचा
दिवस; मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा परीषद - पंचायत समित्यांचा समावेश
·
राज्यातल्या
शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्यास सरकारला कायम पाठिंबा देऊ- शिवसेना
आणि
·
बांगलादेशविरूद्धचा
एकमेव कसोटी क्रिकेट सामना भारतानं १०८ धावांनी जिंकला
******
शिक्षण संस्थांनी
विद्यार्थ्यांची कारर्किद घडवण्याइतकंच व्यक्तिमत्व घडवण्यालाही महत्व द्यावं, असं
आवाहन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं, सरस्वती भुवन
शिक्षण संस्थेच्या, शारदा मंदिर प्रशालेच्या शताब्दी पूर्ती समारोहात त्या काल बोलत
होत्या. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात महाजन म्हणाल्या.....
करियर
बिल्डींगच्या जोडीने कॅरेक्टर बिल्डींग हे शाळेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. जे आयुष्यात
तुम्हाला मिळतं, मग ते पैसा असो, संस्कार असो, त्याच्याहून जास्त देण्याचा प्रयत्न
करायचा असतो. उपभोग ही आपली संस्कृती नाहीये. मुलं जर मैदानावर खेळताना त्यांची ढोपरं,
कोपरं फुटली नाहीत तर त्या मुलांची त्या मातीशी ओळख कशी होणार. या खेळण्यामुळे अनेकांना
गुण येत असतात. एकत्र कसं खेळायचं टीमवर्क ज्याला म्हणतो, या अनेकाअनेक गोष्टी महत्वाच्या
आहेत.
शारदा मंदिर प्रशालेच्या
सेवानिवृत्त शिक्षिका रत्नप्रभा गोगटे, ज्येष्ठ विद्यार्थिनी स्वातंत्र्यसेनानी ताराबाई
लड्डा, क्रीडापटू राशी जाखेटे यांचा सुमित्रा
महाजन यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी शाळेत
जाऊन विद्यार्थीनींशीही थेट संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली.
****
माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी
या उद्देशानं, त्यांच्या अभ्यासक्रमात ‘निवडणूक साक्षरता’ हा विषय सुरु करावा, अशी सूचना, निवडणूक
आयोगानं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे. १५ ते १७ वर्ष वयोगटातली ही
मुलं मुली, भावी मतदार असणार आहेत. त्यामुळे
त्यांना या वयातच मतदानाबाबत शिक्षण देणं आवश्यक असल्याचं, आयोगानं म्हटलं आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयानं, राष्ट्रीय शिक्षण
संशोधन आणि प्रशिक्षण परीषद -एन सी ई आर टी ला सांगून निवडणूक
साक्षरतेविषयक एक पुस्तिका तयार करण्यासही आयोगानं सांगितलं आहे.
****
अनुसूचित जाती आणि जमातीच्या दहावीच्या
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृती योजनेत, १ हजार
४१५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार
झाल्याचं, विशेष तपास समितीच्या निदर्शनास आलं आहे.
केंद्र सरकार देत असलेल्या या शिष्यवृत्तीमध्ये,
२०१० ते २०१५ या काळात घोटाळा झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर, राज्य सरकारनं विशेष पोलिस
महानिरीक्षक डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचं विशेष तपास पथक
स्थापन केलं. या पथकानं आतापर्यंत एकूण संस्थापैकी,
१२ टक्के संस्थाची तपासणी केली असून, यात हा गैरव्यवहार आढळून आला आहे. यानुसार पथकानं
आता पर्यंत १४ गुन्हे दाखल केले आहेत. विद्यार्थ्यांचे
बनावट बँक खाते देणं, जातीची वर्ग वारी बदलणं, एकापेक्षा
अधिक अर्जांवर एकाच विद्यार्थ्याचं छायाचित्र लावून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती
घेणं, असे गैरव्यवहार समितीला तपासात आढळून
आले आहेत.
****
राज्यात कृषी जनगणना सुरू असून, यावर्षा
अखेरपर्यंत या गणनेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असं कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी
काल मुंबईत सांगितलं. पीक पध्दती आणि जमीन मालकीसंदर्भातली माहिती जनगणनेच्या माध्यमातून
उपलब्ध झाल्यानंतर सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल, असं ते म्हणाले. कृषी धारण,
पीकपध्दती, शेतकऱ्यांचे विविध प्रकार आणि इतर निगडित माहिती असे निकष जनगणनेसाठी लावण्यात
आले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या पहिल्या
टप्प्यात निवडणूक होणाऱ्या, १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा, आज प्रचाराचा अखेरचा
दिवस आहे. यात मराठवाड्यातल्या आठही जिल्हा परीषद आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. गुरूवारी या ठिकाणी मतदान होणार आहे. यामुळे सर्वच
राजकीय पक्षांनी या १५ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. जिल्हा परीषदेच्या ८५५ जागांसाठी, ४ हजार
२७८; तर १६५ पंचायत समित्यांच्या एकूण १ हजार, ७१२
जागांसाठी, ७ हजार, ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जवळपास सर्वच गट आणि गणात बहुरंगी लढती होत असून, उमेदवारांसह
राजकीय पक्षांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे.
सभा, फेऱ्यांसह घरोघर जात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गाव न गाव पिंजून
काढलं आहे.
****
पुणे महानगरपालिका
निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. काल मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यात चार सभा झाल्या. बाणेर इथं झालेल्या
प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर
जोरदार टीका केली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पिंपरी-चिंचडवमध्ये प्रचारसभा घेत भाजपवर कठोर टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येण्यासाठी भाजपनं शेतकऱ्यांचं कर्ज
माफ करण्याचं आश्वासन दिलं आहे, महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असून अगोदर इथल्या शेतकऱ्यांचं
कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली. असं झाल्यास शिवसेना भाजपला कायम पाठिंबा
देईल, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेनं भाजपाचा
पाठिंबा काढून घेतला, तर
राष्ट्रवादी काँग्रेस मध्यावधी निवडणुकीची मागणी करेल, असं मत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल व्यक्त केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत केलं
जात आहे.आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
लातूर जिल्ह्यात
शिवसेना जिल्हा परिषदेच्या ३९ जागा लढवत असली तरी, अध्यक्ष निवडताना मात्र शिवसेनेची
भूमिका निर्णायक राहणार असल्याचा दावा, राज्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते परिवहन मंत्री
दिवाकर रावते यांनी केला आहे. लातूर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी रावते
यांनी शिवसेनेचा लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वचननामा प्रकाशित केला.
****
नाट्यांकुर संस्थेच्या अडतीसाव्या बालनाट्य
महोत्सवाचा शुभारंभ जालना इथं काल नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात
आला. नाट्यांकुरच्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता या संस्थेनं जालना शहराची सांस्कृतिक
शहर अशी ओळख निर्माण केली, असे गौरवोद्गार गोरंट्याल यांनी यावेळी काढले.
****
अहमदनगर इथल्या भारतीय संस्कृती सेवा
प्रतिष्ठानच्यावतीनं दिला जाणारा पंडित मदन गोपाल व्यास पुरस्कार, यावर्षी लातूरच्या
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी लातूर इथं हा पुरस्कार
प्रदान केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत व्यास यांनी
काल वार्ताहरांशी बोलताना दिली.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या
वैद्यकीय क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल ही निवड झाली असून, प्रतिष्ठानच्यावतीनं,
डॉ. अशोक कुकडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत, असं व्यास यांनी यावेळी सांगितलं.
****
हैदराबाद इथं काल
झालेला, भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी सामना भारतानं, १०८ धावांनी जिंकला आहे. काल
सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात बांग्लादेशचा संघ २५० धावात सर्वबाद झाला.
भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी चार, तर इशांत शर्मानं दोन
बळी घेतले. पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला. या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा सर्वात कमी ४५ कसोटी सामन्यात २५० बळी मिळवणारा पहिला
गोलंदाज ठरला, तर विराट
कोहली हा सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा हा सलग सहावा
कसोटी मालिका विजय आहे.
****
परळी इथं, येत्या
२७ फेब्रुवारीला चौथ्या बीड जिल्हा शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, डॉ वीरा
राठोड यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण साहित्यिक नागनाथ
बडे यांची निवड झाली आहे. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन आणि शिक्षक गौरव
पुरस्कार वितरण, आदी कार्यक्रम होणार आहेत.
//*****//
No comments:
Post a Comment