Wednesday, 8 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काळे यांचा, साडे अकरा हजार मतांनी विजय

·      उत्तर भारताला भूकंपाचे जोरदार धक्के; कोणतीही जीवितहानी नाही

·      ‘जलयुक्त शिवार अभियाना’च्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र तज्ञांची समिती स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

आणि

·      माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बेकायदा जमीन खरेदी प्रकरणी, एक आठवड्याच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश

*****

      औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार, विक्रम काळे ११ हजार, ५५३ मतांनी विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, सतीश पत्की यांचा पराभव केला. १७व्या फेरी अखेर काळे यांना, २४ हजार, ४६४ मतं मिळाली, तर पत्की यांना १३ हजार, ५०६ मतं मिळाली. त्यानंतर, युनुस पटेल यांची ८२४ मतं काळे यांना, तर पत्की यांना, २२९ मतं हस्तांतरीत करण्यात आली. विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर काळे यांना, आज पहाटे विजयी घोषित करण्यात आलं. निवडणूक निर्वाचन अधिकारी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी काळे यांना निवडून आल्याचं प्रमाणपत्र प्रदान केलं. काळे या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत २० पैकी, १७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघात, भाजपाचे रणजीत पाटील, नाशिक पदवीधर मतदार संघात, काँगेसचे सुधीर तांबे, आणि कोकण शिक्षक मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाचे, बाळाराम पाटील विजयी झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा, आज शेवटचा दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.

****

उत्तर भारताकाल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंप मापकावर पूर्णाक, दशांश रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची नोंदली गेली आहे. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये जमिनीखाली ३३ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उशिरा रात्री उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली, त्याचबरोबर उत्तर भारतातल्या भूकंपानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला.

****

‘जलयुक्त शिवार अभियाना’ची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, शासकीय अधिकाऱ्यांशिवाय स्वतंत्र तज्ञांची समिती स्थापन करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. २०१९ पर्यंत, राज्य दुष्काळ मुक्त करण्याचं उद्दीष्ट जलयुक्त शिवार अभियानाचं आहे. गेल्या डिसेंबरमध्येच अशी समिती स्थापन करण्याचे आदेश, उच्च न्यायालयानं दिले होते. परंतु अद्यापही अशी समिती राज्य सरकारनं स्थापन केलेली नाही. राज्यात दुष्काळ असताना, नाशिक इथल्या कुंभमेळ्यासाठी, जुलै ते सप्टेंबर २०१५ दरम्यान, गंगापूर धरणातून पाणी सोडलं होतं. सरकारच्या या निर्णयाला, प्राध्यापक एच.एम.देसरडा यांनी आव्हान दिलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

****

बोगस भ्रमणध्वनी धारकांची ओळख पटवण्यासाठी एका वर्षाच्या आत यंत्रणा उभारा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकारला दिले. अशा बोगस भ्रमणध्वनींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच, बँकेचे सर्व व्यवहार आता भ्रमणध्वनी मार्फत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांची ओळख पटवणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन, सर्व भ्रमणध्वनी आधार क्रमांकाशी जोडणं आवश्यक आहे, असं महाअधिवक्ता, मुकुल रोहतगी यांनी यावेळेस सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. ‘लोकनिती फाऊंडेशन या अशासकीय स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काल हे आदेश दिले आहेत.

****

‘जॉली एल.एल.बी. भाग दोन’ या हिंदी चित्रपटातले न्यायालय आणि वकील यांची बदनामी करणारे आक्षेपार्ह प्रसंग काढून टाकून, चित्रपट प्रदर्शित करण्यास, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल चित्रपट निर्मात्यांना परवानगी दिली. या चित्रपटातल्या काही दृश्यांमधून न्यायालय आणि वकिलांची बदनामी होते, त्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशा आशयाची एक याचिका, औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. आक्षेपार्ह दृष्य तपासण्यासाठी उच्च न्यायालयानं एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर काल न्यायालयानं हे आदेश दिले.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बेकायदा जमीन खरेदी प्रकरणी, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतचा पोलीस तपासाचा अहवाल, एका आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. या प्रकरणाचा तपास करताना कोणती पालं उचलली, याबाबत सविस्तर माहिती अहवालात द्यावी, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. खडसे यांनी पुण्यात भोसरी इथं, बाजार भावापेक्षा कमी किमतीत बेकायदा जमीन खरेदी केल्याप्रकरणी, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयानं राज्य सरकारला काल हे निर्देश दिले.

****

परभणी जिल्ह्यात वॉटरग्रीड योजना लवकरच सुरु करणार असल्याचं, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. गंगाखेड तालुक्यातल्या मौजे राणी सावरगाव इथं, जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते काल बोलत होते. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांतल्या चार महानगरपालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींमध्ये, ४६ पूर्णांक, ५२ दशलक्ष घनमीटर पाण्याचं नियोजन, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात, मराठवाड्यातल्या ४० टक्के गावांसाठी ही योजना राबवली जाणार असून, वाटूर-मंठा -जिंतूर -परभणी या मार्गासाठी साडे चारशे कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याचं ते म्हणाले.

****

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांची निवडणूक, एकाच कालावधीत येत असल्यामुळे, न्यायालयानं निवडणूक आदेश दिलेल्या, ‘आणिवर्ग सहकारी संस्था वगळून, अन्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश राज्य सरकारनं शनिवारी जारी केला, यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था - नाफेड खरेदी करत नसलेल्या, कमी दर्जाच्या तुरीची बाजार भावाप्रमाणे विक्री करण्यास, काल शेतकऱ्यांनी मान्यता दिली. नाफेडचा तुरीचा हमी भाव हा प्रतिक्विंटल पाच हजार पन्नास रूपये इतका आहे. या पार्श्वभूमीवर, लातूरच्या कृषी उत्पन बाजार समितीनं हमी भावापेक्षा कमी दरानं तुरीचे सौदे करण्यावर बंदी घातली होती. परीणामी तूर विक्रीचे सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद पडले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समिती, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या काल झालेल्या बैठकीत बाजार भावानं तुरी खरेदी करण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार काल प्रतिक्विंटल, ४६०० शे, ते ४७००शे रूपये असा बाजार भाव निघाल्याचं, समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितलं. सध्या जवळपास ५० ते ६० हजार क्विंटल तूर बाजारात पडून असल्याचं शहा म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातून निघणारं साप्ताहिक, ‘साप्ताहिक क्रांती योद्धाच्या दोन पत्रकारांना, खंडणी प्रकरणी, औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल अटक केली. सुनील लोखंडे आणि भास्कर मुदगल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक, शिवाजी वानखेडे यांना या दोघांनी वीस हजार रुपयांची खंडणी मागितली होती.

****

जालना शहरातल्या नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी, या जागांना संरक्षण भिंत बांधून, त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल, असं नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी काल सांगितलं. शहरातल्या नागरिकांनी नगराध्यक्ष गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा काल सत्कार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नागरिकांनी वेळेवर कर भरून, शहराच्या विकासाला हातभार लावावा, असं आवाहन, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलतांना केलं.

******

No comments: