आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०७ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद
प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देणार आहेत. पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी हा
प्रस्ताव मांडला होता. काँग्रेसकडून
मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब, शिवसेनेचे
आनंद अडसुळ यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा आज जाहीर होणार आहे. यामध्ये रेपो
दरात पाव टक्का ते अर्धा टक्का कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरकपात झाल्यास
गृह तसंच वाहन कर्जाचे व्याजदर कमी होण्याचा अंदाजही व्यक्त होतो आहे.
****
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची महायुती झाली आहे. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष
रामदास आठवले यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. रिपब्लिकन पक्ष आठवले
गटासाठी भाजपाकडून १९ जागा सोडण्यात आल्या आहेत. या महायुतीत राष्ट्रीय समाज पक्ष आणि
शिवसंग्राम या पक्षांनाही सामावून घेण्यात आलं आहे.
****
भारतीय आयुर्विमा महामंडळ - एलआयसीनं आपल्या
प्रतिनिधींसाठी तीन लाख रुपयांपर्यंत उपअनुदान अर्थात ग्रॅज्यूइटी जाहीर केली आहे.
याचा फायदा एलआयसीच्या सुमारे दहा लाख प्रतिनिधींना होणार आहे.
****
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग यांनी काल सूत्रं स्वीकारली. या पदावर कार्यरत असणारे सुरेश पांडा परवा निवृत्त
झाले.
//******//
No comments:
Post a Comment