Wednesday, 8 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 07 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची तत्काळ अंमलबजावणी करता यावी, यासाठी अर्थसंकल्प एक महिना आधी सादर केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते आज लोकसभेत बोलत होते. पूर्वी सायंकाळी सादर केला जाणारा अर्थसंकल्प अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात सकाळी सादर करण्यास प्रारंभ झाला, असंही पंतप्रधान म्हणाले. पूर्वी रेल्वे हेच वाहतुकीचं प्रमुख साधन असल्याने, रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होत असे, मात्र आज परिस्थिती बदलल्यामुळे रेल्वेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन केल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराचं निर्मुलन करण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय योग्यच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.

****

विमुद्रीकरणानंतर जमा केलेल्या अडीच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी कोणाचीही चौकशी केली जाणार नसल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी सांगितलं आहे. मात्र जी खाती कोणाच्याही आयकर विवरणपत्राशी मिळतीजुळती नाहीत, अशा बँक खात्यांची चौकशी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. विमुद्रीकरणानंतर अनेक अवैध बँक खाती आढळून आली असून, त्यांची चौकशी सुरु आहे. मात्र जे नागरिक नियमित कर भरतात त्यांना कर मंडळाकडून कोणताही त्रास होणार नाही, असं ते म्हणाले.

****

आय एस आय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा हस्तक शमशुल हुदा याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात कानपूर तसंच बिहारमध्ये झालेले रेल्वे अपघात हुदा यानं घडवून आणल्याची माहिती या अपघातप्रकरणी अटक केलेल्या तिघांच्या चौकशीतून समोर आली होती, रेल्वे अपघात घडवण्यासाठी आपल्याला हुदाकडून तीन लाख रुपये मिळाल्याची माहिती या तिघांकडून मिळाली होती. नेपाळ इथं हुदा याच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत, नेपाळ पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीनं हुदा याला दुबईहून नेपाळला आणलं. काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर त्याला तीन साथीदारांसह अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक नेपाळ पोलिसांच्या सहकार्यानं हुदाची चौकशी करत आहे.

****

पाकिस्तानातून घुसखोरी करणारा एक घुसखोर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत ठार झाला. पंजाबमध्ये पठाणकोट जवळ बमियाल परिसरात सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५० मीटर अंतरावर संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यानं, ही कारवाई करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्या नोबेल पदकाची चोरी झाली आहे. दिल्ली पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. सत्यार्थी सध्या परदेश दौऱ्यावर असून, या चोरीसंदर्भात तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. बालकांच्या हक्कासाठी कार्यरत असलेले सत्यार्थी यांना २०१४ साली पाकिस्तानच्या मलाला युसुफजाईसोबत नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

****

मुंबईतल्या एका २२ वर्षीय महिलेला सर्वोच्च न्यायालयानं २४ आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी दिली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयानं दिलेल्या अहवालानुसार गर्भाची वाढ योग्य नसून, त्यामुळे गर्भवतीच्या जीविताला धोका होऊ शकतो. हा अहवाल ग्राह्य धरत, न्यायालयानं या महिलेला गर्भपाताची परवानगी दिली आहे.

****

गोवा विधानसभेच्या मडगाव इथं एका मतदान केंद्रावर आज पुनर्मतदान सुरू आहे. चार तारखेला झालेल्या मतदानावेळी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं, इथं आज फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक विभागानं दिले होते. चार तारखेला गोव्यात विक्रमी ८२ पूर्णांक २३ टक्के मतदानाची नोंद झाली होती, आज या केंद्रावर मतदान झाल्यानंतर ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

****

नाशिक इथं आगामी महापालिका निवडणुकीतमतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाशिक महापालिका आणि मनपा शिक्षण मंडळ यांच्या वतीनं आज सकाळी मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरीत शालेय विद्यार्थी आणि महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून, त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद किल्याजवळ आज एक कंटेनर अपघातग्रस्त होऊन पलटला. या अपघातात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही, मात्र कंटेनर रस्त्यावर आडवा पडल्यामुळे धुळे सोलापूर राज्य मार्गावरची वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली होती.

//*******//

No comments: