Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 7 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर
धन्यवाद प्रस्ताव संमत करण्यात आला. पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी धन्यवाद प्रस्ताव
मांडला होता, तर भाजपा खासदार वीरेंद्र सिंग यांनी याचं समर्थन केलं होतं. या प्रस्तावावर
झालेल्या चर्चेत काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांच्या तसंच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी
सहभाग घेत, आपली मतं मांडली, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिलं.
रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात विरोधी पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन
करताना पंतप्रधानांनी, विमुद्रीकरणासह विविध निर्णयांचं समर्थन केलं.
राज्यसभेत आज एका मुद्यावर चर्चेसाठी
मनाई केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. भाजप नेत्याकडून तृणमूल
काँग्रेसच्या सदस्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केला.
दरम्यान, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर सध्या चर्चा
सुरू आहे.
****
देशाची जनता डिजीटल आणि रोखरहित
अर्थव्यवस्थेला तसंच डिजीधन मेळाव्यांना पाठिंबा देत असल्याचं, संसदीय कार्यमंत्री
अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली भाजप संसदीय पक्षाच्या बेठकीनंतर ते
वार्ताहरांशी बोलत होते. मोठ्या संख्येनं नागरिक डिजीधन मेळाव्यात सहभागी होत असून,
विमुद्रीकरणाला त्यांचा पाठिंबा असल्याचं यावरुन स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले.
****
विनोद करण्यावर बंधनं घालणं शक्य
नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिखांवरील विनोदासंदर्भात दाखल याचिकेवरील
सुनावणी दरम्यान न्यायालयानं, लोकांनी कसं वागावं याबद्दल न्यायालयं
मार्गदर्शक तत्त्वं घालून देऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला अशा विनोदावर
आक्षेप असल्यास ती व्यक्ती कायदेशीर तक्रार दाखल करु शकते, असंही न्यायालयानं
म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी २७
मार्चला होणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा मार्गदर्शक तत्वानुसार कामाच्या ठिकाणी महिलांचा
होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात महिला तक्रार
निवारण समिती स्थापन करणं अनिवार्य असल्याचं राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ.मंजुषा
मोळवणे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं एका कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. राज्यात
सर्वत्र या समितीची स्थापना होत असून, याद्वारे पीडित महिलांना न्याय मिळवून देता येईल,
असं त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदा कर्ज वाटप
प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह १६ जणांना दोषी ठरवण्यात
आलं आहे. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी झाली असून, दोषींना
५ वर्षे तुरूंगवास आणि प्रत्येकी ६० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
घाटनांदूर इथल्या शेतकरी सहकारी तेलबिया
प्रक्रिया संस्थेला बँकेनं २००९ मध्ये दोन कोटी ७५ लाख रुपये कर्ज दिलं होतं. हे कर्ज
बेकायदा असल्याचं लेखा परीक्षण अहवालात म्हटलं होतं. या प्रकरणी न्यायालयानं ९ जणांची निर्दोष मुक्तता केली
असून यापैकी, चार जणांना संशयाच्या लाभावरून मुक्त करण्यात आलं आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये
दोन महिलांचाही समावेश आहे.
****
शिवसेना राज्यातल्या सरकारसाठी बांधील नाही,
असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक
पटेल यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी झालेल्या पत्रकार
परिषदेत ठाकरे बोलत होते. राज्य सरकारचा नोटीस पिरिएड कधी संपेल, हे लवकरच कळेल, असंही
ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना हार्दिक पटेल यांनी आपल्याला भयमुक्त
सरकार हवं आहे, असं म्हटलं आहे. शिवसेना हार्दिकसोबत असून, त्यांना आवश्यकतेनुसार मदत
करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
****
जालना आणि नांदेड इथल्या जिल्हा रुग्णालयांसाठी
आरोग्य विभागानं ७४ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी
करण्यात आला. जालना जिल्हा रुग्णालयासाठी ५४ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले असून,
याअंतर्गत रुग्णालय दुरुस्ती, अंतर्गत रस्ते तसंच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानं बांधण्यात
येणार आहेत. नांदेडच्या गुरू गोविंदसिंग स्मृती रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी
१७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राज्य वक्फ
मंडळाच्या कार्यालयासाठी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी १५ लाख ९७ हजार रूपये योजनेत्तर
अनुदान मंजूर झालं आहे. यापैकी ८० टक्के अनुदान वितरित करण्यासाठी
वित्त विभागानं मान्यताही दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment