Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 May 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मे २०१७ दुपारी १.००वा.
****
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात भूजल
पातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात २३८ गावांना पाणी टंचाई भासत असून, या गावांसह सात वाड्यांना
२९२ टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाणी पुरवठ्यासाठी २५६ गावातल्या
३०५ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
****
मुंबई लातूर एक्सप्रेसचं
बिदरपर्यंत झालेलं विस्तारीकरण कायमचं रद्द करावं या मागणीसाठी लातूर इथं रेल्वे बचाव
समितीनं आज बंद पुकारला आहे. या बंदला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान,
आज सकाळी शहराच्या विविध भागात फिरुन दुकानं बंद करण्याचं आवाहन करत असलेल्या रेल्वे
बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं. कुर्ला बिदर ही रेल्वे नियमित
करावी, लातूर एक्सप्रेसचं विस्तारीकरण रद्द करावं या मागण्या मान्य केल्या नाहीत तर
येत्या नऊ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा समितीतर्फे देण्यात
आला आहे.
****
राज्याच्या महिला आणि बालकल्याण
विभागातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करणं गरजेचं असून रिक्त
पदे भरण्याची आणि पदोन्नतीबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे निर्देश महिला आणि
बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सहयाद्री अतिथीगृहात आपल्या विभागाच्या योजनांच्या
आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या.
****
विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर
यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हयातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्याठी
यशवंतराव चव्हाण नाटयगृह, बीड इथं जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
खरीप हंगामाबरोबरच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेल्या
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रम आणि योजनांचं येत्या ३१ मे अखेरपर्यंत नियोजन
करुन प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार
आहे. तसंच विविध प्रशासकीय विभागाच्या कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात येणार आहे.
****
जालना शहरातील जुना जालना
भागात असलेल्या सरस्वती भुवन शाळेसमोरील एका गादी घराला आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास
आग लागली. शेख मुजीब गादी घर या दुकानास शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली. या आगीत दुकानातील
कापसाचे गठाण, नवीन गाद्या, यंत्रसामुग्री आदी साहित्य जळून खाक झालं. सुमारे पाच लाखाचं
नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी
तीन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमुळे बाजुलाच असलेल्या एका फर्निचरच्या
दुकानातील ही काही साहित्य जळालं.
****
वैजापूर इथं महाराष्ट्र
बँकेला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली, अग्निशमन विभागाचा एक बंब आणि चार
टँकरच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती वैजापूर पोलिस ठाण्यातून
देण्यात आली.
****
स्वच्छता सर्वेक्षण २०१७ देशातील शहरांमध्ये स्वच्छतेच्या
भावी योजनांचं व्यापक चित्र दर्शवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
त्यांनी काल ट्विटरवर स्वच्छता सर्वेक्षणाचं समर्थन करताना याचं श्रेय देशातील सव्वाशे
कोटी जनतेला जातं ज्यांनी संपूर्ण देशाला स्वच्छ बनवण्याची शपथ घेत स्वच्छ भारत मिशन
यशस्वी करत आहेत असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीनजीकचा
खारेगाव इथला राज्यातला पहिला टोलनाका येत्या १३ मेपासून बंद होणार आहे. यामुळे आता
या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचा टोल वाचणार असून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर १९९८ पासून ही टोलवसूली सुरू होती.
*****
उत्तर प्रेदशातील एटा जिल्ह्यात झालेल्या अपघातात १४ जण ठार
तर ४३ जण जखमी झाले. लग्न समारंभातून परतत असताना ट्रक छोट्या कॅनॉलमध्ये पडून हा अपघात
झाला. यातील सर्व लोक आगरा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील होते.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल पुरोहित यांच्या
जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला
चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
यांना जामीन मंजूर करण्यात आला, मात्र पुरोहित यांना जामीन नाकारण्यात आला होता. साध्वींना
दिलेल्या जामीनाच्या आधारावर पुरोहित यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली
होती.
****
No comments:
Post a Comment