Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 04
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ४
मे २०१७ सकाळी ६.५०
****
· हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणं गुन्हा ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·
शेतकऱ्यांकडच्या उर्वरीत तुरीच्या खरेदीबाबत मुंबई उच्च
न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
·
मुंबईचा आयकर आयुक्त आणि नांदेडच्या वैद्यकीय अधीक्षकाला
लाच घेतांना अटक
आणि
·
लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पाऊस
****
हमी भावापेक्षा कमी दरानं
शेतमाल खरेदी करणं गुन्हा ठरणार असून त्यासाठी राज्य सरकार कायदा करणार असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गट शेतीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
राज्यात गट शेतीला चालना मिळण्यासाठी
तयार करण्यात आलेल्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आलं. या धोरणाचा प्रस्ताव
मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊसाचं क्षेत्र सूक्ष्म
सिंचनाखाली आणण्यासाठी व्याज सवलत योजनेलाही बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आलं. गटशेतीमुळे
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीला अनेक ज्येष्ठ मंत्री आणि सनदी अधिकारी उपस्थित होते.
****
शेतकऱ्यांकडची उर्वरीत तुरीची खरेदी
राज्य सरकार का करत नाही, अशी विचारणा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
केली. शेतकऱ्यांकडून सर्व तूर खरेदी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका, अन्नदाता
शेतकरी संघटनेनं दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल ही विचारणा उच्च
न्यायालयानं केली. देशात एकंदरीत किती तुरीची आवश्यकता आहे, त्यापैकी किती तुरीचं उत्पादन
झालं आहे, तूट भरून काढण्यासाठी शासन तूर आयात करणार आहे का, मग तूर आयात करण्या ऐवजी
शेतकऱ्यांची तूर सरकार का खरेदी करंत नाही, असंही न्यायालयानं मुख्य सरकारी विधीज्ञांना
काल विचारलं. या याचिकेची सुनावणी आजही होणार आहे.
****
दरम्यान,
जालना जिल्ह्यातल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर तुरीची विक्री
करणाऱ्या व्यापाऱ्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याचे
निर्देश, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.आंध्रप्रदेश आणि
कर्नाटक राज्यातली तूर शेतकऱ्यांच्या नावांवर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे निर्देश लोणीकर यांनी यावेळी दिले.
****
सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव देशातलं
पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून साकारत असून या पुस्तकांच्या गावाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य, स्त्रीसाहित्य,
संतसाहित्य, चरित्रं अशा एकूण पंचवीस साहित्यप्रकारांची पंधरा हजारांहून जास्त पुस्तकं
या गावात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातली घरं, मंदिरं, शाळा, लॉजेस अशा पंचवीस
ठिकाणी ही पुस्तकं ठेवलेली आहेत. राज्यशासनाच्या आवाहनाला या गावानं दिलेल्या प्रतिसादामुळे,
पुस्तकांचं गाव, ही शासनाची कल्पना प्रत्यक्षात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी
साहित्य महोत्सवासह इतर अनेक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती
मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, यांनी दिली आहे.
****
बँकांच्या बुडीत कर्जविषयक अध्यादेशाला
केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. सध्या बँकांचं थकित कर्ज सहा लाख कोटी रूपयांपेक्षा
अधिक असून या कर्जाच्या वसुलीसाठी बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं.
****
६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते ‘के विश्वनाथ’
यांना चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात
आला. अभिनेता अक्षयकुमार याला ‘रुस्तुम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तर नीरजा
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहिती
प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह अनेक
मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. ‘कासव’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं ‘सुवर्णकमळ’ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि
सुनील सुकथनकर यांना तर ‘दशक्रिया’ चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचं ‘रजत कमळ’ प्रदान करण्यात आलं. ‘व्हँटिलेटर’ या मराठी चित्रपटाचे
दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट पुनर्ध्वनिमुद्रण, तसंच सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कारही व्हँटिलेटर
या चित्रपटाला प्रदान करण्यात आले. दशक्रिया चित्रपटाच्या संहिता लेखनासाठी संजय पाटील
यांना, मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, ‘सायकल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट
वेशभुषा पुरस्कार, ‘आबा ऐकताय ना’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मुंबईचे आयकर आयुक्त बी. बी. राजेंद्र
प्रसाद, एस्सार उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप मित्तल आणि अन्य चार अधिकाऱ्यांना,
एका मोठ्या उद्योग समुहा कडून, १९ लाख ३४ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी, केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभागानं, काल अटक केली. आयकर आयुक्त राजेंद्र प्रसाद यानं अपीलात एका
खासगी विश्वस्त निधीच्या बाजूने निकाल देण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती.
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर साहेबराव लोमटे यांच्यासह तीन जणांना
अडीच हजार रुपयांची लाच घेताना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. औषधौपचाराच्या
देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.
गुन्ह्यातल्या तपासामध्ये आरोपीला मदत
करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल मोगल
सिफल बेग बाबू बेग याला काल औरंगाबाद रेल्वे स्थानक परीसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
अटक केली.
****
राज्यात काल काही जिल्ह्यात अवकाळी
पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह तासभर अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे
अनेक झाडं मोडून पडली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. सातारा जिल्ह्यातल्या कराड आणि
पाटण तालुक्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटामुळे काही
काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. लातूर,औसा परिसरातही रिमझीम पाऊस झाला. उस्मानाबादसह जळकोट, नळदुर्ग परीसर तसंच उमरगा, तुळजापूर
आणि भूम तालुक्यात काल मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला. उमरगा तालुक्यात येणेगुर इथं अंगावर
वीज पडल्यामुळे एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. या अवकाळी पावसामुळे, जिल्ह्यातल्या
आंबा, द्रांक्ष तसंच मका या पिकांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, येत्या २४ तासात मराठवाड्यातल्या
काही भागात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रानं
वर्तवली आहे.
****
सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'
किताब मिळवलेल्या जळगावच्या विजय चौधरी यांना विशेष बाब म्हणून राज्य पोलिस दलात उपअधिक्षक
या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौधरी
यांना काल नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
****
डिजिटल इंडिया अंतर्गत ई- फेरफार प्रकल्पाची
अंमलबजावणी राज्यात सुरू असून, या योजने अंतर्गत महाराष्ट्र दिनापासून संगणकीकृत सात
बाराचं चावडी वाचन केलं जात आहे. त्यानुसार, नागरिकांनी येत्या पंधरा मे पर्यंत आपला
सात बारा अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन बीड जिल्हा प्रशासनानं केलं
आहे.
****
मुंबई- लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत
विस्तारीत करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज उस्मानाबाद जिल्हा बंद पाळण्याचा निर्णय
विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत काल घेण्यात आला. याच मागणीसाठी आज
उदगीर इथंही बंद पाळण्यात येणार असल्याचं रेल्वे
संघर्ष समितीनं सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment