Friday, 19 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.05.2017 - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 19 MAY 2017
Time - 1.00 to 1.05 pm
Language – Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मे २०१७ दुपारी १ वा
****
श्रीनगर इथं सुरु असलेल्या वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज सेवा कराचा दर निश्चित करण्यात येणार आहे. सोने, पादत्राणांसह ब्राण्डेड वस्तूंवरील दरांबाबतही आज चर्चा होणार आहे. काल पहिल्या दिवशी वस्तू आणि सेवा करातून अत्यावश्यक वस्तू आणि धान्य यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज या बैठकीचा समारोप होणार आहे. 
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, तसंच माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाकारला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्लीत यसंदर्भात झालेल्या बैठकीत पवार यांनी, या पदासाठी अन्य उमेदवाराचा विचार करावा असं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली.  
****
शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज नाशिक इथं कृषी अधिवेशन घेण्यात येत आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य मंत्री मंडळातले शिवसेनेचे सर्व मंत्री तसंच उत्तर महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रात प्रमुख वक्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी तसंच माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे समारोप करणार आहेत. यावेळी ते कर्ज मुक्ती साठी मोठ्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातल्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी येत्या २२ मे पासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधल्या सुमारे ३२ हजार कंत्राटी कामगारांना शासनानं नेमलेल्या रानडे समिती अहवालानुसार कायम करण्यात यावं, कायम होईपर्यंत त्यांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचंही कृती समितीचे नेते अण्णा देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय दुग्धशाळा विकास महामंडळ प्रकल्पाच्या मराठवाडा आणि विदर्भ प्रकल्प संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्ह्याचे पशूसंवर्धन अधिकारी डॉक्टर सतीश राजू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अमरावती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविंद्र ठाकरे यांच्याकडे होता. त्यांची पदोन्नती झाल्यामुळे रिक्तपदाचा कार्यभार डॉक्टर सतीश राजू यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत मुदत देऊनही ज्या महाविद्यालयांनी नोंदणी केली नाही,  अशी महाविद्यालये अकरावी प्रवेश प्रक्रियेतून बाद केली जातील, असा इशारा शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिला आहे.
****
वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून काल पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत मुंबई इथं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. नाशिक पाटबंधारे विभागानं बाष्पीभवनाचं कारण देत वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांसाठी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं.
****
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचं काम पूर्ण झालं असून, वाटाघाटीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जाणार आहेत. त्याकरता शेतकऱ्यांकडून हरकती आणि सूचना मागवण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...