Thursday, 4 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.05.2017 - 01.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०१ दुपारी .००वा.

****

बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं अकरा दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली मात्र यापैकी तिघांना मृत्यूदंड देण्याची केंद्रीय गुन्ह अन्वेषण मागणी उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. २००२ साली गोध्रा प्रकरणानंतर झालेल्या या घटनेत, बिल्किस बानो हिच्या कुटुंबातल्या आठ जणांची आरोपींनी हत्या केली होती तर बिल्किस बानो हिच्यावर बलात्कार केला होता. या सर्वांचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्यांना विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, या शिक्षेला आव्हान देणारी आरोपींची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावत त्यांची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणी डॉक्टर तसंच पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर पुराव्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्रीय गुन्ह अन्वेषण विभागाला दिले आहेत.

****

छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या सुकमा नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी चार संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या नक्षलवाद्यांना अटक केली. नक्षलवाद्यांनी गेल्या २४ एप्रिल रोजी केलेल्या भीषण हल्ल्यात २५ जवान हुतात्मा झाले तर सहा जवान जखमी झाले होते.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आलं. गस्तीवर असलेलं एक वाहन नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट करून उडवून दिलं. या स्फोटात काही जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

****

या वर्षीचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल आज नवी दिल्लीत जारी करण्यात आला. ४३४ स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातलं इंदोर प्रथम क्रमांकावर तर भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातलं गोंडा आणि महाराष्ट्रातलं भुसावळ ही शहरं या यादीत सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत ही यादी जाहीर केली.

****

भारतीय अंतराळ संसोधन संस्था इस्त्रो उद्या ‘साउथ एशिया कमुनिकेशन सॅटेलाईट - जी सॅट ९’ या संपूर्ण देशी बनावटीचा उपग्रहाचं उद्या प्रक्षेपण करणार असून त्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं इस्रोचे अध्यक्ष ए एस किरणकुमार यांनी आज सांगितलं. ते चेन्नई इथं पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण केंद्रावरून या उपग्र्हाचं प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रहाच्या प्रकल्पात सार्क देशांपैकी पाकिस्तान वगळता, इतर सात देश सहभागी असून, हा उपग्रह सर्व शेजारील राष्ट्रांमध्ये परस्पर संवाद साधायला आणि त्यांचं संरक्षण तसंच आर्थिक विकास कार्यात सहायक ठरणार आहे.

****

सरकारनं सर्व रूग्णालयं, डॉक्टर्स, आणि रूग्णांना हृदयरोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या स्टेंटसच्या कमतरतेची माहिती राष्ट्रीय औषधमूल्य निर्धारण प्राधिकरणाला तत्काळ देण्याची सूचना केली आहे. त्या सूचनेद्वारे प्राधिकरण प्राथमिकतेच्या आधारावर स्टेंटचा तुटवडा असलेल्या ठिकाणी त्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू करेल. प्राधिकरणाला याबाबतची सूचना १८०० १११ २५५ या टोल फ्री क्रमांकावर देता येईल.

****

बँकांचं कर्ज वसूल न होण्याच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्रिमडळानं नवी प्रणाली मंजूर केली आहे. या नव्या उपायात बँकेच्या विनियमन कायद्यात सुधारणेसाठी अध्यादेश जारी करण्याचा समावेश आहे. या अध्यादेशामुळे रिझर्व्ह बँक आणि तिच्या संबधित समित्यांना संबंधितांच्या बेकायदेशीर संपत्तीबद्दल निर्णय घेता येवू शकेल.

****

सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून साकारत असून या पुस्तकांच्या गावाचं आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य, स्त्रीसाहित्य, संतसाहित्य, चरित्रं अशा एकूण पंचवीस साहित्यप्रकारांची पंधरा हजारांहून जास्त पुस्तकं या गावात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातली घरं, मंदिरं, शाळा, लॉजेस अशा पंचवीस ठिकाणी ही पुस्तकं ठेवलेली आहेत.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...