Sunday, 14 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.05.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

काश्मिरी जनतेच्या आडून दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे सैन्यदलाचं लक्ष्य असल्याचं, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. ‘घेराव घालून शोध मोहीम’ अर्थात कासो ऑपरेशन पुन्हा सुरू करण्याचं वृत्त रावत यांनी यावेळी फेटाळून लावलं. कासो ऑपरेशन राबवल्यास स्थानिक नागरिकांना त्रास होईल, असंही ते म्हणाले.
****
छत्तीसगढमध्ये सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर गेल्या महिन्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात परिसरातल्या तीन गावांतून नक्षलवाद्यांना मदत मिळाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय राखीव दलाकडून हा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे २५ जवान हुतात्मा झाले होते.
****
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं टीव्हीसेंटर परिसरात संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी केली आहे. सोलापूर इथं पारंपारिक वाद्यांच्या गजरात पदयात्रा काढून मर्दानी खेळांचं सादरीकरण होणार आहे.
****
राज्याच्या अनेक भागात काल दूपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं वृत्त आहे. काही घरावरचे पत्रे उडाले, तर वादळामुळे विजेच्या तारा तुटल्यानं रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. नांदेड, यवतमाळ, पुणे, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिगर मोसमी पाऊस झाला. खेडेगावांमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पावसाने आंब्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. पुढील चोवीस तासात मराठवाडा, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...