Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३
जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत केंद्र सरकार संबंधित राज्य
सरकारांशी चर्चा करणार
Ø शेतकरी संपामुळे भाज्यांची आवक घटली; दूध संकलनाच्या प्रमाणातही
घट
Ø स्टार्ट अप उद्योगांना सहाय्यक असलेल्या सँडबॉक्स सॉफ्टवेअरचं
काल लोकार्पण
Ø आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीत सहभागाची अभिनेता-निर्माता
अरबाज खान याची कबुली
आणि
Ø राज्यातल्या अनेक जिल्ह्यात काल जोरदार पाऊस
****
शेतकऱ्यांनी
पुकारलेल्या संपाबाबत केंद्र सरकार त्या त्या राज्य सरकारांशी चर्चा करेल, असं
केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनायक यांनी म्हटलं आहे.
ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलक शेतकऱ्यांच्या
बहुतांशी मागण्या स्थानिक स्वरुपाच्या असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आणि
मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण
कर्जमाफी आणि शेतमालाला दिडपट हमीभाव या मागण्यांसाठी परवा एक जूनपासून १० दिवसांचा
संप पुकारला आहे.
****
दरम्यान, या संपामुळे बाजार समित्यांमध्ये होणारी
भाज्यांची आवक घटली असून, दूध संकलनही कमी झालं आहे. नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातल्या
विसापूर इथं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केल्याचं, अखिल भारतीय किसान सभेचे
कार्यकारी अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितलं. या संपाचा परिणाम बघता बाजार समित्यांना
संरक्षण पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनानं दर्शविली आहे.
****
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण
पाठिंबा असल्याचं, काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं
आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पब्लिसिटी
स्टंट संबोधून शेतकऱ्यांचा अवमान केला आहे, त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी,
अशी मागणी चव्हाण यांनी केली.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार मध्य
आणि दीर्घकालीन धोरणं ठरवत असल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यातली सिंचन क्षमता वाढत असून शेती
उत्पादनांच्या निर्यातीसाठी राज्यात पाच ठिकाणी ड्राय पोर्ट सुरु केली जात असल्याचं
गडकरी यांनी सांगितलं.
****
देशातलं अंधत्वाचं प्रमाण कमी करण्यासाठी
नेत्रतज्ञांनी स्वस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करावं, असं राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांनी म्हटलं आहे. "आयऍडव्हान्स 2018 परिषद" या कार्यक्रमात ते काल मुंबईत
बोलत होते. केवळ वैद्यकीय यंत्रणा पोहोचत नसल्यामुळे ७० टक्के अंधत्व दूर होत नाही,
याची खंत राज्यपालांनी व्यक्त केली.
****
तेली समाजाच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे
बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
काल नवी दिल्ली इथे दिली. तेली एकता महासंमेलनात ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित
होते, इतर मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या घटकांचा विकास व्हावा यासाठी, वर्गीकरण करण्यास
सरकार अनुकूल असल्याचं, आठवले म्हणाले.
****
स्टार्ट अप उद्योगांना सहाय्यक ठरेल अशा सँडबॉक्स
या सॉफ्टवेअरचं काल राज्यसरकारतर्फे लोकार्पण करण्यात आलं. मुंबईचं रूपांतर फिनटेक
हब, अर्थात तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशा आर्थिक केंद्रात करण्याच्या दृष्टीनं ही सुविधा
उपलब्ध करून दिली असून, फिनटेक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दृकश्राव्य संदेशातून दिली. ‘फिनटेक’ मुळे राज्याच्या
अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होऊन ग्राम पातळीपर्यंत विकासाला चालना मिळेल, असं ते
म्हणाले.
****
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या स्थानिक
प्रधिकरण संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांनी काल विधान
भवनात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांनी त्यांना शपथ दिली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीमध्ये
सहभागी असल्याची कबुली अभिनेता-निर्माता अरबाज खान यानं दिली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं अरबाज
खान याला समन्स बजावलं होतं, त्यानुसार काल खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात जबाब
नोंदवताना त्यानं ही कबुली दिल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे. मात्र यावर्षी झालेल्या आयपीएल हंगामात आपण सट्टा लावला नसल्याचं
त्यानं म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, राज्याच्या
शिक्षण विभागानं शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी काही दिशादर्शक सूचना जारी केल्या
आहेत. त्यानुसार, आता अशा प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं,
आणि सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रं पोलिसांकडून मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची
रोज तीन वेळा उपस्थिती घेणं अनिवार्य करण्यात आलं असून, विद्यार्थ्याला मानसिक किंवा
शारिरीक त्रास होईल, अशी शिक्षा करण्याला बंदी घालण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात जोरदार पाऊस
झाला. औरंगाबाद शहरात दुपारपासून सायंकाळी उशीरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.
जालना जिल्ह्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये पाऊस झाला, हिंगोली जिल्ह्यात
कनेरगाव, नरसी नामदेव, कळमनुरी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद तसंच जालना
परिसरात आज पहाटेपासून पाऊस सुरू आहे. काही भागात गारा पडल्याचंही वृत्त आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी,
जळगाव, वाशिम, बुलडाणा, नाशिक, अहमदनगरसह इतरही अनेक जिल्ह्यात काल पाऊस झाल्याचं वृत्त
आहे.
सोसाट्याच्या
वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झालं असलं तरीही या पावसानं शेतकरी सुखावला आहे. तापमानातही
घट झाल्यानं, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाकडून आज तीन जून रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही ३१ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार
आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत
घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा जुलै - ऑगस्ट २०१८ मध्ये होणार आहे.
या परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद महापालिका स्थायी समिती सभापतीपदी
शिवसेनेचे राजू वैद्य यांची निवड झाली आहे. राजू वैद्य यांना ११ मतं मिळाली. त्यात
शिवसेनेचे सहा, भाजप तीन तर दोन अपक्षांचा समावेश आहे. एमआयमचे चार सदस्य उशीरा आल्यानं
त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.
****
जालना इथले भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना काल काळं फासलं. प्रभागात कामं होत नसल्याचा
आरोप करत ढोबळे यांनी काळं फासल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातला बंगला
बेकायदेशीर असल्याचा अहवाल महानगर पालिका आयुक्तांनी न्यायालयात सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर
देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान, सुभाष देशमुख यांनी हे आरोप फेटाळले असून,
महानगरपालिकेनं परवानगी दिल्यानंतरच आपण या बंगल्याचं बांधकाम केलं असं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या अप्सरा चित्रपटगृहाला काल दुपारी आग लागली. अग्निशमन विभागाच्या दोन बंबानी
ही आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण आणि वित्तहानी अद्याप स्पष्ट नसल्याचं सांगण्यात
आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या
जरोडा गावाच्या जलसंधारणाच्या कामांची काल दक्षता पथकानं पाहणी केली. या कामाबाबत पथकानं
समाधानकारक अभिप्राय दिला. जरोडा गावातील पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणीही यावेळी
करण्यात आली.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे
यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन
करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यातल्या गोपीनाथगड इथे होणाऱ्या
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद इथं शासकीय
दूध डेअरी परिसरात मुंडे यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment