Saturday, 23 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०१ दुपारी १.०० वा.

****

 भारत आणि क्युबा दरम्यान जैव-तंत्रज्ञान, पारंपरिक औषधी आणि ऊर्जा क्षेत्रात दोन सामंसस्य करार करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि क्युबाचे राष्ट्रपती मिगुल मारिओ दिआझ कॅनेल यांच्या मध्ये काल क्युबाची राजधानी हवाना मध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चे नंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी क्युबाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा मंडळा मधल्या भारताच्या कायम सदस्यत्वा साठीच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. तत्पूर्वी, हवानामध्ये एका कार्यक्रमातल्या ब्रीज भाषणामध्ये राष्ट्रपती कोविंद यांनी, विकसीत राष्ट्रांमध्ये परस्पर आदर आणि सद्भभावना हा सदर देशांच्या यशासाठी आवश्यक असल्याचं नमूद केलं.

****



 वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशा साठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा –नीट साठी पुढच्या वर्षापासून आवश्यकतेनुसार आणखी परीक्षा केंद्र स्थापन केली जाणार असून, विदयार्थ्यांना परीक्षे साठी त्यांच्या राज्या बाहेर जावं लागणार नाही, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते काल चेन्नई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. या वर्षीच्या नीटपरीक्षे साठी राज्या बाहेरची केंद्र मिळाल्याच्या तक्रारी तमिळनाडूच्या विदयार्थ्यां कडून प्राप्त झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या १०७ शहरांच्या तुलनेत यावर्षी १५० शहरांमध्ये परीक्षा आयोजित केली होती, या पुढे चार हजारा पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या जिल्ह्यात प्रवेश परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध होईल, असं जावडेकर यांनी सांगितलं.

****



 एयर कंडीशनर बनवताना त्याचं तापमान किमान २४ अंश सेल्सिअस इतकं पूर्वनिर्धारित ठेवण्याचे निर्देश सरकारनं एयर कंडीशनर बनवणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. पुढच्या काही महिन्यात एसी मध्ये अशी सेटिंग अनिवार्य करणार असल्याचं ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी सांगितलं. ते नवी  दिल्ली इथं या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. एयर कंडीशनरच्या तापमानात एक अंश सेल्सिअसनं  वाढ केल्यास सहा टक्के वीज बचत होत असल्याचं ते म्हणाले.

****



 मुंबईत इंदू मिल इथं उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचं काम प्रगती पथावर असून ते १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. बडोले यांनी काल स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीचं हस्तांतरण आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले.  

****



 नाशिक जिल्ह्यात चांदवड ते पिंपळगाव दरम्यान शिरवाडे फाटा इथं एसटी बस आणि जीप मध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना तातडीनं नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

****



 राज्य विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या अकरा जागां साठीची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या अकरा सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे. या निवडणुकीसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ४५वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यात पहाटे पासून पावसानं जोर धरला. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, लोणार, खामगाव भागात जोरदार पाऊस सुरु असून, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यातही सकाळ पासून ढगाळ वातावरण असून, संततधार सुरु आहे. औरंगाबाद शहरातही सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून, कयाधू नदीला पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक मध्येही पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप मान्सून अपेक्षे प्रमाणे बरसला नाही. जिल्ह्यात मालेगाव, दिंडोरी पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा, देवळा, निफाड या तालुक्यात सरासरी २३ टक्के पाऊस झाला असून शेतकरी चिंतातूर आहेत.

****



 दुबई इथं सुरु असलेल्या कबड्डी मास्टर्स अजिंक्य पद स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ३६-२० असा पराभव केला. ऑलिम्पिक खेळा मध्ये स्थान मिळण्यासाठीच्या आवश्यक सर्व गोष्टी कबड्डी या खेळात असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितलं.

****



 नेदरलॅन्ड्समध्ये ब्रेडा इथं हॉकी अजिंक्य पद करंडक २०१८ स्पर्धेला आज पासून सुरुवात होत असून, पहिला सामना भारत आणि पाकिस्तान संघा दरम्यान होणार आहे. नेदरलॅन्ड्स विरुद्ध अर्जेंटिना, तसंच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेल्जियम सामनेही आज होणार आहेत.

*****

***

No comments: