आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई
शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघांसाठी आज मतदान
होत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. या निवडणुकीत ७१ उमेदवार
रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती झालेली नाही. नाशिक
विभागात सकाळी नऊ वाजे पर्यंत आठ पूर्णांक ३४ टक्के मतदान झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिक्षकांच्या ऑन लाईन आणि पारदर्शक बदल्या करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेणारे
महाराष्ट्र राज्य देशात एकमेव राज्य असल्याचं ग्राम विकास आणि महिला बाल विकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शिक्षकांच्या ऑनलाईन आणि पारदर्शक बदल्या
करण्याचा निर्णय घेऊन लाखो शिक्षकांची गैरसोय दूर केल्या बद्दल मुंडे यांचा काल बीड
इथं विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं सत्कार करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.
ऑनलाईन बदली करण्याचा हा निर्णय राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निश्चितच
महत्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतल्या एम्स रुग्णलयात जाऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी
वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. वाजपेयी यांची प्रकृती सुधारत असली
तरी त्यांना अद्याप अति दक्षता विभागातच ठेवण्यात आलं असल्याचं रुग्णालय सूत्रांनी
सांगितलं.
****
सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय ठेऊन बँका तसंच पतसंस्थांनी
योगदान द्यावं, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणी इथं
जन कल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते
झालं, त्या वेळी ते बोलत होते. छोट्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी पतसंस्थांनी पुढे
येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
नांदेड नजिक रत्नेश्वरी माळावर वृक्षारोपण करण्यासाठी
पाणी फाउंडेशन च्या वतीनं सीड बॉल्स तयार केले जात आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन दिवसात तेरा हजार सीड बॉल्स तयार
करण्यात आले. येत्या एक जुलै पर्यंत एक लाख सीड बॉल्स तयार करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात
आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment