Wednesday, 27 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक   जून २०१ सकाळी .५० मि.

****



§  भारत ही जगातली सर्वाधिक गुंतवणूकदार स्नेही अर्थव्यवस्था-पंतप्रधानांचं प्रतिपादन

§  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जादा कामाचा भत्ता बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

§  प्लास्टिक बंदीची कारवाई थांबवण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी

§  भाजप सरकारच्या काळात आर्थिक घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्था धोक्यात - खासदार राजीव सातव यांचा आरोप

आणि

§  लातूर इथं खासगी शिकवणी संचालक हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक

****



 भारत ही जगातली सर्वाधिक गुंतवणूक दार स्नेही अर्थ व्यवस्था असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईत काल आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक - ए आय आय बी च्या तिसऱ्या वार्षिक बैठकीचं औपचारिक पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही बँक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, जागतिक अर्थ व्यवस्थेत भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयाला आला असून, आपलं सरकार हे आर्थिक एकत्रीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी या वेळी नमूद केलं.

****



 १९७५ साली देशात जाहीर झालेल्या आणि - बाणीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल काळा दिवस पाळण्यात आला. त्या निमित्त मुंबईत आयोजित आणि-बाणी - लोकशाहीवर घाला या चर्चा सत्रात पंतप्रधान सहभागी झाले. लोकशाही प्रती आपल्या कटिबद्धतेचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येत असून, देशातल्या वर्तमान आणि भावी पिढीला लोकशाही आणि राज्यघटने प्रती जागरुक करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला अत्याधिक धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमी वर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्या नुसार विशेष सुरक्षा दलाच्या मान्यते शिवाय अधिकारी, मंत्र्यांनाही पंतप्रधानांच्या नजिक जाता येणार नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे नऊ वाजता विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी दूर दृष्य प्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत. डीडी न्यूज आणि नरेंद्र मोदी अॅपवर हा संवाद उपलब्ध होईल.

****



 केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा जादा कामाचा भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेवरचे कर्मचारी - ऑपरेशनल स्टाफ तसंच औद्योगिक कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. कार्मिक मंत्रालयाच्या या संदर्भातल्या आदेशानुसार, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभागांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

****



 पारपत्र सेवा दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी काल नवी दिल्लीत मोबाईल पासपोर्ट अॅपचं उद्घाटन केलं. या ॲपद्वारे देशाच्या कोणत्याही भागातून नागरिक आता पारपत्रा साठी अर्ज करू शकतात. पारपत्रात अर्जदारानं दिलेल्या पत्त्यावर पोलिस पडताळणी साठी येतील तसंच अर्जदाराच्या पत्त्यावर त्याला पारपत्र मिळणार असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

****



 सरकारनं प्लास्टिक बंदीची कारवाई थांबवून कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन आणि जनजागृती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, प्लास्टिक बंदीचा निर्णय हा शासनाचा आहे की फक्त पर्यावरण खात्याचा, असा प्रश्न उपस्थित केला. सध्या वापरात असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, प्लास्टिक किंवा इतर कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात प्रशासन अयशस्वी ठरत असल्यानं, नागरिकांना दंड आकारु नये, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

****



 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शासकीय निवासस्थानी शाहु महाराजांच्या प्रतिमेपुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.



औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या मिलकॉर्नर चौकात असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्यास महापौर नंकुमार घोडेले, महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्तानं शहरातून काल समता फेरीही काढण्यात आली.



लातूर इथंही काल शालेय विद्यार्थ्यांनी समता दिंडी काढून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या विविध निवासी शाळेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि राजर्षी शाहु गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचं वाटप यावेळी करण्यात आलं.

दीनदुबळ्या आणि वंचित घटकांच्या सामाजिक न्यायासाठी प्रत्येकानं आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी, असं अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केलं आहे. नांदेड इथं राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जालना इथं भाजपा जिल्हा कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. मराठवाड्यात सर्वत्र शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राज्यातील जिल्हा परिषदांच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देशही भुसे यांनी दिले.

****



 केंद्रातल्या भाजप सरकारच्या काळात मोठे आर्थिक घोटाळे झाल्यानं देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे़. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या वाटूर इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कॉंग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते काल बोलत होते.



 हे सरकार फक्त आश्वासनं देवून, जाहिरातबाजी करत, जनतेची दिशाभूल करत असल्याची टीकाही सातव यांनी केली.

****



 लातूर इथले खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या चंदनकुमार शर्मा याच्या सह पाच आरोपींना काल लातूर पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड यांनी प्रसार माध्यमांना काल ही माहिती दिली. व्यावसायिक स्पर्धेतूनच ही हत्या झाल्याचं राठोड यांनी सांगितलं. चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री नंतर गोळ्या झाडून हत्या झाली.

****



 औरंगाबाद शहरात गेल्या महिन्यात उसळलेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली, या निषेधार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं सिटी चौक पोलिस ठाण्यावर काल मोर्चा काढण्यात आला. आमदार इम्तियाज जलील यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं. 

****



 अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या साठी मोबाईल पोलीस स्टेशन ही संकल्पना राबवली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.  केडगाव इथून ३० जून पासून ही मोहीम सुरू होईल.

****



 परभणी इथं अमृत योजनेतंर्गत प्रभाग क्रमांक पाच मध्ये अकरा लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाचं काल महापौर मीना वरपुडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं, येत्या दीड वर्षाच्या आत या जलकुंभाचं काम पूर्ण करणार असल्याचं, महापौरांनी सांगितलं.

****

 हिंगोली इथं प्लास्टिक बंदी अंतर्गत काल चार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली, या प्रत्येकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

 आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन काल पाळण्यात आला. व्यसनाधीनतेविरोधात जनजागृतीसाठी काल औरंगाबाद इथं व्यसन मुक्ती संदेश फेरी काढण्यात आली.

     

 दरम्यान, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सरकारनं, एक आठ शून्य शून्य एक एक शून्य शून्य तीन तीन एक, हा नि:शुल्क क्रमांक सुरु केला असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं सांगितलं आहे.

****



 मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं काल हाँगकाँगच्या यिप पुई यिनवर २१-१२, २१-१६ असा विजय नोंदवला.

****



 आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा नऊ ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे.

**** 

 येत्या दोन दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जालना जिल्हा परिसरात अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

*****

*** 

No comments: