Thursday, 21 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जून २०१ सकाळी .५० मि.

****



§  चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा

§  व्यावसायिक पदवी, पदविका, आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

§  मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २९ जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा

आणि

§  पावसाशी निगडित विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

****



 योग सरावात सातत्य असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त उत्तराखंडची राजधानी देहरादून इथं आयोजित योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. नियमित योग सरावा मुळे आरोग्य उत्तम राहून, वैद्यकीय खर्चात बचत होते, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. या वेळी झालेल्या योग सरावात पंतप्रधानांनी सहभागी होत, प्राणायाम आणि योगासनं केली.



 राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र साजरा झाला. मुंबईत आयोजित योग प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय तसंच राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री सहभागी झाले. औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, अनेक शाळांचे विद्यार्थी तसंच योग अभ्यासक या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी झाले.



हिंगोली इथं जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित योग दिन कार्यक्रमात योग अभ्यासकांनी योगासनं सादर केली.

****



 योग क्षेत्रातल्या योगदानासाठी दिले जाणारे २०१८ सालचे पंतप्रधान योग पुरस्कार नाशिक इथले योग गुरू विश्वास मंडलिक आणि मुंबईची योग संस्था यांना जाहीर झाले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयानं काल ही घोषणा केली. २५ लाख रुपये, सन्मान चिन्ह, आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 देशभरातल्या शेतकऱ्यांशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नमो ॲपच्या माध्यमातून संवाद साधला. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं काम करत असल्याच्या वचनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. कच्च्या मालाचा खर्च कमी करणं, शेतमालाला योग्य भाव देणं, नैसर्गिक आपत्तीं मुळे होऊ शकणारं नुकसान टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांना शेती सोबतच उत्पन्नाचे अन्य पर्याय उपलब्ध करून देणं, या चार मुद्द्यांवर सरकार विशेष लक्ष देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****



 राज्य पुरस्कृत नवीन फळबाग लागवड योजना या वर्षापासून सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फलोत्पादन योजनेला उत्तेजन देण्याच्या दृष्टीनं ही योजना राबवली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेसाठी यंदाच्या वर्षासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या फळझाडांच्या लागवडी साठी सरकार कडून मदत करण्यात येणार आहे. या शिवाय काही नवीन वृक्ष आधारित फळपिकांचा समावेश करण्याचं तसंच त्यासाठी आर्थिक मापदंड निश्चित करण्याचे अधिकार कृषी विभागास देण्यात आले आहेत.

****



 व्यावसायिक पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशा साठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रि मंडळानं घेतना आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लेखी हमी घेण्यावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली असल्यानं, प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित कायद्या मध्ये  सुधारणा करण्याचे निर्देश, आदिवासी विकास विभागास देण्याचा निर्णय राज्य मंत्रि मंडळानं काल घेतला. या निर्णयाचा वैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, आदी २० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काल मर्यादा शिथील करण्याचा हा निर्णय फक्त या वर्षापुरताच असल्याचं, सरकारकडून सांगण्यात आलं आहे.



 बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदांमधील ६१६ कार्यव्ययी- रोजंदारी कर्मचाऱ्यांना मारुफ करारा ऐवजी, कालेलकर करारातील तरतुदी लागू करणं, अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर देवस्थानाच्या व्यवस्थापना साठी स्वतंत्र कायदा करणं, राज्यातल्या १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार - ई-नामच्या पोर्टलशी जोडणं,  आदी निर्णयही कालच्या राज्य मंत्रि मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

****



 मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या २९ जून पासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. काल तुळजापूर इथं झालेल्या सकल मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५८ मूकमोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्यांची सरकारनं दखल घेतली नाही, त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी आक्रमक मोर्चे काढणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार असून, राज्याच्या इतर भागातही अशी आंदोलनं करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

****



 बँक ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या सह बँकेचे कार्यकारी संचालक माजी अध्यक्ष आणि विद्यमान विभागीय व्यवस्थापक यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकल्पा साठी अस्तित्वात नसलेली आभासी संपत्ती तारण ठेवून बेकायदा ८० कोटी रुपयांचं कर्जवाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  डीएसकेडीएल या कंपनीतल्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्यानं डी एस कुलकर्णीचे सनदी लेखापाल, कंपनीचे मुख्य अभियंता आणि उपाध्यक्षानाही अटक करण्यात आली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली तसंच राज्यात अनेक भागात काल पाऊस झाला. या पावसाशी निगडित विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, सेनगाव परिसरात तासभर दमदार पाऊस झाला. गोरेगाव, कडोळी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्या मुळे विजेचे खांब उन्मळून पडले. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. सेनगाव तालुक्यात सिनगी खांबा इथं अंगावर वीज पडून एक जण मरण पावला तर एक जण जखमी झाला.



 परभणी जिल्ह्यात जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, सेलू भागात काल आठवडाभराच्या खंडानंतर पाऊस झाला. जिल्ह्यात खळी इथं वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर जिंतूर मधल्या सावळी इथला एक शेतकरी नदीच्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



नाशिक जिल्ह्यातही काल दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात मीठसागरे इथे वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. अहमदनगर, धुळे, सातारा या जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****



 वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल, डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत, अशी मागणी करत, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद इथं झालेल्या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ भालचंद्र कानगो यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपा साठी जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय मेळाव्यांमधून आता पर्यंत सव्वा पाच कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ही माहिती दिली.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कोतवाल भानुदास पवार याला दीड हजार रुपयांची लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल अटक केली.

*****

***

No comments: