Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
वस्तू
आणि सेवा कर प्रणाली यशस्वी होणं, हे नागरिकांचं यश - पंतप्रधानांचं प्रतिपादन
§
विधान
परिषदेच्या चार जागांसाठी आज
मतदान
§
प्लास्टिक
बंदी अंतर्गत कालही अनेक ठिकाणी कारवाई
§
सर्वसामान्यांचा
विकास हे ध्येय ठेऊन बँका तसंच पतसंस्थांनी योगदान द्यावं, महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांचं आवाहन
आणि
§
चॅम्पियन
चषक हॉकी स्पर्धेत भारताची अर्जेंटिनावर दोन-एक अशी मात
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली देशभरात यशस्वी
होणं, हे देशातल्या नागरिकांचं यश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या मालिकेच्या ४५व्या भागातून ते काल देश वासियांशी
संवाद साधत होते. ही कर प्रणाली आता स्थिर झाली असून, आवश्यकते नुसार त्यात बदल केले
जात आहेत, ही सुधारणा घडवून आणण्याचं सर्वाधिक श्रेय हे राज्यांना जात असं ते म्हणाले.
.
पंतप्रधान येत्या २८ तारखेला उत्तर प्रदेशात मगहर
या संत कबीर यांचं समाधीस्थळ असलेल्या गावी भेट देणार आहेत. तर सहा जुलैला डॉक्टर
श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आणि
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांचा पुढच्या वर्षी साजरा होणारा पाचशे पन्नासावा
प्रकाशपर्व सोहळा, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या सर्वांच्या कार्याचं स्मरण केलं.
भारत-अफगाणिस्तान दरम्यान नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्या नंतर भारतीय
संघानं दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचं त्यांनी कौतुक केलं.
नुकत्याच साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त जगभरातल्या लोकांनी उत्साहात योगाभ्यास केला, देशातही प्रत्येक ठिकाणी,
नागरिकांनी, तसंच शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभाग नोंदवल्याबद्दल
त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या एक जुलै रोजी साजरा होणाऱ्या डॉक्टर्स दिनानिमित्त
त्यांनी देशातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.
****
विधान
परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण
पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान
होणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीत ७१ उमेदवार रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत
युती झालेली नाही.
****
सन
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र
नसलं, तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या संबंधीच्या
कायद्यात सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांनी मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश
घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असून, ही
तरतूद फक्त या शैक्षणिक वर्षासाठीच लागू आहे.
****
सर्वसामान्य
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यात दौरे करणार असल्याचं अखिल
भारतीय महात्मा फुले समता
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. परिषदेची
राज्यस्तरीय बैठक काल
मुंबई इथं झाली, त्यावेळी
ते बोलत होते. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न, जातनिहाय
जनगणना तसंच बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
प्लास्टिक बंदी अंतर्गत कालही अनेक ठिकाणी कारवाई
करण्यात आली.
जालना नगरपालिकेनं काल सायंकाळी प्लास्टिक विरोधात
तपासणी मोहीम राबवली, यावेळी प्लास्टिक पिशव्या आणि ग्लास विक्री करणाऱ्या दोन दुकान
चालकांकडून दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला. नांदेड-वाघाळा महापालिकेनं प्लास्टिक वापरा साठी तेरा व्यावसायिकांकडून
प्रत्येक पाच हजार रुपये प्रमाणे पासष्ट हजार रुपये दंड वसूल केला.
दरम्यान, औरंगाबाद इथं आजपासून प्लास्टिक बंदी विरोधात
कारवाई केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
उस्मानाबाद इथं काल आठवडी बाजारात युवा सेनेच्या
वतीने कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं, प्लास्टिक कॅरीबॅग बंदी संदर्भात जनजागृती
तसंच या बंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय ठेऊन बँका तसंच पतसंस्थांनी
योगदान द्यावं, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणी इथं
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उदघाटन काल पाटील यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. छोट्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी पतसंस्थांनी पुढे
येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात वझूर-मरडसगाव
रस्त्यावर गोदावरी नदीवरच्या नियोजित पुलाची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते काल पायाभरणी झाली.
पाटील यांनी काल हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या
ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली. हिंगोली जिल्हा
या वर्षाअखेरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
नेदरलॅण्डमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन चषक हॉकी
स्पर्धेत काल, भारतानं अर्जेंटिनावर दोन-एक अशी मात केली. हरमनप्रीत आणि मनदीप सिंग
यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. भारताचा पुढचा सामना परवा बुधवारी
ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.
दरम्यान, अमेरिकेत सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक
स्पर्धेत अभिषेक वर्मा यानं वैयक्तिक रौप्य पदकासह सांघिक कांस्य पदक पटकावलं आहे.
जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट
नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघानं ५० मीटर फ्री पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. कोल्हापूरच्या
अनुष्का पाटील हिचा या संघात समावेश आहे.
****
अहमदनगर इथल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कौसल्याबाई
कोळसे पाटील यांचं काल राहुरी इथं निधन झालं, त्या १०३ वर्षांच्या होत्या. गुहा या
त्यांच्या मूळ गावी काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्त
न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या त्या मातु:श्री होत.
****
औरंगाबाद इथं शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे
निवृत्त प्राचार्य प्रभाकर पोहेकर यांचं काल निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या
पार्थिव देहावर काल पैठण इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
नांदेड
जिल्ह्यात कृषी विभागाच्या पथकानं सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या ३९८ पिशव्या जप्त केल्या.
शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ४४०८ वाणाचे बियाणे ज्या दुकानातून विकत घेतले असतील, तिथे परत
करावेत, असं आवाहान कृषी विभागानं केलं आहे.
****
देशातल्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान
नरेंद्र मोदी हे योगाला महत्त्व देत आहेत, ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका एमआयएमचे
खासदार असदोद्दील ओवेसी यांनी केली आहे, ते काल बीड इथं संविधान बचाव कार्यक्रमात बोलत
होते. जातीय मतभेदाचे राजकारण केलं जात असल्यानं, देशाचं सविधान धोक्यात आलं असल्याचं,
ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात
सेलू-पाथरी रस्त्यावर ट्रक आणि ॲपे रिक्षाच्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
झाले. काल सकाळी हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला सेलू पोलिसांनी ताब्यात घेतलं
आहे.
****
मराठवाड्यात कालही पावसानं अनेक भागात
जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात काल दुपारी दमदार पाऊस
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद, नांदेड सह बीड जिल्ह्यातल्या काही गावांत जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद
जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात दोन पूल वाहून गेले,
दरम्यान, येत्या छत्तीस तासात दक्षिण-मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
साहित्यातली
माणुसकी टिकवण्याची गरज निवृत्त माहिती संचालक श्रध्दा बेलसरे खारकर यांनी व्यक्त केली आहे. अंबाजोगाई इथं आयोजित
आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
पाणी फाऊंडेशन च्या वतीने नांदेड नजिक रत्नेश्वरी
माळावर वृक्षारोपण करण्यासाठी, सीड बॉल्स तयार केले जात आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन दिवसात तेरा हजार सीड बॉल्स तयार
करण्यात आले. येत्या एक जुलैपर्यंत एक लाख सीड बॉल्स तयार करण्याचं उद्दीष्ट आहे.
****
बीड जिल्ह्यात, महाराष्ट्र
राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांची अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी काल पाहणी
केली. जिल्ह्यातल्या परळीसह
धारुर तालुक्यातल्या
परचुंडी, करेवाडी आणि कोळपिंपरी गावात सुरु असलेल्या कामांचा त्यांनी
आढावा घेतला.
*****
***
No comments:
Post a Comment