Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
GST अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या रिवर्स चार्ज मेकॅनिझम RCM अर्थात परतीच्या
शुल्क प्रणालीशी संबंधित तरतुदींवरची स्थगिती सरकारनं सप्टेंबर अखेरपर्यंत कायम ठेवली
आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क मंडळानं याबाबत एक अधिसूचना जारी
करुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही स्थगिती 30 जूनपर्यंत राहणार होती. RCM अंतर्गत
नोंदणीकृत डीलर्सनी बिगरनोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालावर शुल्क भरणं
अपेक्षित आहे. दरम्यान, येत्या एक जानेवारीपासून जीएसटी वस्तू आणि सेवाकर विवरणपत्राचे नवे अर्ज अंमलात
येतील, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव हसमुख अढिया यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. जीएसटीच्या
अंमलबजावणीला उद्या एक जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते.
जीएसटी परिषदेच्या चार मे रोजी
झालेल्या बैठकीत नव्या विवरणपत्रांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक
असणाऱ्या सॉफ्टवेअरवर काम सुरू असून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत त्याची चाचणी घेतली
जाईल आणि एक जानेवारीपासून हे नवे अर्ज अंमलात येतील, असे अढिया म्हणाले.
****
शेतकऱ्यांचं उत्पन्न
दुप्पट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2020 पर्यंत देशभरातल्या 22 हजार ग्रामीण
बाजारांना ई-नाम अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक कृषी बाजारपेठांशी जोडण्याची घोषणा
केंद्र सरकारनं केली आहे. भुवनेश्वर इथं काल ऍग्रीविकास 2018 या कार्यक्रमात बोलताना
केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. 22 हजार ग्रामीण
बाजार किंवा हाट यांचं रुपांतर ग्रामीण कृषी बाजारपेठांमध्ये करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना
त्यांचा माल योग्य खरेदीदाराला थेट विकता यावा, यासाठी या बाजारपेठा ई-नामशी जोडण्यात
येतील, असं ते म्हणाले.
****
भारताचे सरन्यायाधिश दीपक मिश्रा हे आज मध्यप्रदेशमधल्या
जबलपूरमध्ये धर्मशास्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा कोनशीलेचं उद्घाटन करणार आहेत.
मिश्रा हे सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल जबलपूरमध्ये जिल्हा आणि
सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. जिल्हा आणि सत्र न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा
पाया असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. न्यायव्यवस्थेच्या कामाच्या क्षमतेमध्ये वाढ
करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचं सरन्यायाधिश मिश्रा
यांनी यावेळी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असून, झेलम नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून
प्रशासनानं मध्य आणि दक्षिण काश्मीरमधे पूर घोषीत केला आहे. पाटबंधारे आणि पूरनियंत्रण
विभागानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातल्या शैक्षणीक संस्था बंद आहेत. दरम्यान, या पावसामुळं अमरनाथ यात्रा आज सकाळपासून स्थगित करण्यात आली आहे. जम्मूच्या भगवतीनगर इथल्या
आधार शिबिरातून यात्रेला जाणाऱ्या नव्या जथ्याला परवानगी देण्यात आली नसल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
दरम्यान, केंद्र सरकारनं पूरग्रस्त राज्यांसाठी ४००
कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल
प्रदेश आणि नागालँडचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी
दल्लीत झालेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा जवान
आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. त्रेहगाम भागात
दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू
केली. यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. या दहशतवादी गटानं सीमेपलीकडून
घुसखोरी केली असल्याचं संरक्षण दलातल्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दुसऱ्या एका
घटनेमध्ये सोपीअन जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात
दोन जवान जखमी झाले आहेत.
****
अरुणाचल प्रदेशमध्ये लोअर सियांग जिल्ह्यात ITBP अर्थात इंडोतिबेटन सीमा
सुरक्षा दलाच्या एका वाहनावर दरड कोसळल्यानं पाच जवानांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी
झाले. ITBP च्या 49 व्या बटालियनच्या 20 जवानांना घेऊन जाणारी बस लिकाबालीजवळ बसर-अकाजन
रस्त्यावरुन जात असताना मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळून हा अपघात झाला. या दुर्घटनेतल्या
जखमींना उपचारासाठी विशेष हेलिकॉप्टरनं दिल्लीला नेण्यात आलं आहे.
****
फिफा विश्वचषक फूटबॉल
स्पर्धेची सोळा संघांची बाद फेरी आजपासून सुरू होत आहे. अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात
या फेरीतला पहिला सामना संध्याकाळी साडेसात वाजता कझान इथं होणार आहे. तर रात्री साडेअकरा
वाजता सोची इथं उरुग्वे आणि पोर्तुगाल यांच्यात दुसरा सामना होईल. दरम्यान, बाद फेरीसाठी
नव्या प्रकारचा चेंडू वापरण्याची घोषणा फिफानं केली आहे.
****
दुबईमध्ये सुरू असलेल्या
कबड्डी मास्टर्स स्पर्धेत विश्वविजेत्या भारतीय संघानं कोरियाचा 36-20 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत
प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची लढत इराणशी होणार असून अंतिम सामना आज होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment