Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकार, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं
काम करत असल्याच्या वचनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. आज देशभरातल्या
शेतकऱ्यांशी नमो ॲपच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. कच्च्या मालाचा खर्च
कमी करणं, शेतमालाला योग्य भाव देणं, शेतमालाचं नैसर्गिक आपत्तींमुळे होऊ शकणारं नुकसान
टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांना शेती सोबतच उत्पन्नाचे अन्य पर्याय
उपलब्ध करून देणं, या चार मुद्द्यांवर सरकार विशेष लक्ष देत असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. राज्यातून सोलापूर, बारामती, जालना आणि नंदुरबार मधले शेतकरी या संवादासाठी
उपस्थित होते, त्यापैकी सोलापूरच्या शेतकऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद झाला.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या
बँकां संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून,
अर्थमंत्री पियुष गोयल आज नवी दिल्लीत तेरा बँक प्रमुखांबरोबर चर्चा करणार आहेत. वर्ष
२०१७-१८चे वार्षिक आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर बँक प्रमुखांसोबतची ही त्यांची पहिली
बैठक आहे. मागच्या वर्षीच्या अंतिम तिमाहीत अधिकांश बँकांनी तोटा झाल्याचं, आणि बुडित
कर्जांमध्ये वाढ झाल्याचं दर्शवलं आहे.
****
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, पश्चिम बंगाल मध्ये
बोलपूर इथं स्थापन केलेल्या, शांति निकेतन - विश्व भारती विद्यापीठाच्या परिसरात योग
ग्राम निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं पाच कोटी रुपये अनुदान दिलं आहे. या ठिकाणी
प्राचीन काळचं विशुद्ध योग विज्ञान सुरू केलं जाणार आहे. पर्यटकांनाही इथे येऊन योगाभ्यास
करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं
असून, या परिसरात औषधी वनस्पतींचं एक उपवन तयार करण्यात येत आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्तानं उद्या रत्नागिरीत
होणाऱ्या योगाच्या प्रात्यक्षिकां मध्ये जिल्ह्यातले अडीच लाख विद्यार्थी सहभागी होणार
आहेत. जिल्ह्यातल्या तीन हजार तीनशे शाळांमधले विद्यार्थी तसंच योगप्रेमी या कार्यक्रमात
सहभागी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं
योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या सकाळी सहा वाजता टाऊन हॉल मैदानावर होणार आहे, या
कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत
यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योगदिन पूर्वतयारी आढावा बैठकीत ते
बोलत होते
****
केंद्र सरकारनं सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा
योजनेची भंडारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, एकूण दहा लाख पाच हजार तीनशे
अट्ठेचाळीस लाभार्थ्यांना या योजनेतून अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या
प्रतिक्षा यादीत असलेल्या शिधा पत्रकाधारकांनाही योजनेत लवकरच समाविष्ट करून घेण्याचे
प्रयत्न प्रशासन करत आहे..
****
या वर्षीचा फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब तामीळनाडूच्या
अनुकीर्ती वास, हिनं जिंकला आहे. काल रात्री मुंबई मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात
तिला या स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आलं. या वर्षीच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत आता
अनुकीर्ती भारताचं प्रतिनिधित्व करेल.
****
रायगड जिल्ह्यात माथेरान इथं, सेल्फी काढण्याच्या
प्रयत्नात दरी मध्ये पडून एका पर्यटक महिलेचा मृत्यू झाला. दिल्लीची ही पर्यटक महिला
आज सकाळी दरीच्या टोकाशी जाऊन सेल्फी काढताना पाचशे फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी एकादशीच्या वारी सोहळ्यात वारकऱ्यांना सुरक्षा
तसंच आवश्यक त्या सगळ्या सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं, सोलापूरचे पालकमंत्री विजय
देशमुख यांनी सांगितलं आहे. आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी देशमुख
यांच्या अध्यक्षते खाली आज सोलापूर इथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी
भाविकांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत, प्रशासन आणि जिल्हा परिषद, वारीची तयारी
करत असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद महापालिकेतले
उपायुक्त रवींद्र निकम यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी मनपा आयुक्त विनायक निपुण
यांनी निलंबित केलं आहे. जय भवानी नगर इथल्या नाल्यावर अतिक्रमणामुळे काल झालेल्या
पावसात या नाल्यात पाणी तुंबलं, या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. निकम यांना
अतिक्रमण हटवून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले होते, मात्र हे
काम न झाल्यानं, निकम यांना निलंबित केल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment